
इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) – ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’च्या पुढाकाराने शहरातील नामदेव भवन येथे १ सहस्र वर्षांपूर्वीचे ऐतिहासिक आणि पवित्र सोमनाथ शिवलिंग भाविकांना दर्शनासाठी ठेवण्यात आले होते.
प्रारंभी धनगरी ढोलांच्या गजरात, पारंपरिक वेशभूषेत आणि ‘हर हर महादेव’च्या जयघोषात शिवलिंगाचे स्वागत करण्यात आले. या प्रसंगी श्री श्री रविशंकर यांचे शिष्य आणि वरिष्ठ प्रशिक्षक, तसेच वेद विज्ञान महाविद्यापीठ, बेंगळुरू येथील वैदिक पंडितांचीही उपस्थिती होती. शहरातील विविध भाविकांनी याचे दर्शन घेतले.
सायंकाळी भजन, प्रार्थना आणि ध्यान यांचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे वरिष्ठ प्रशिक्षक विनायक मुरदंडे, स्वयंसेवक नमिता हूल्ले, राहुल रायनाडे, नारायण जोशी, विशाल आणि विद्या पाटील, कमलेश्वर कदम यांसह अन्य उपस्थित होते. हे दर्शन इचलकरंजीकरांसाठी एक अद्वितीय आणि अविस्मरणीय आध्यात्मिक पर्वणी ठरली.