उद्या मलाही वाटेल मुख्यमंत्री व्हावे ! – शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार

कोल्हापूर – जयंत पाटील यांना मुख्यमंत्री व्हावे असे वाटते, तर गैर काय ? त्यांना शुभेच्छा ! उद्या मलाही वाटेल मुख्यमंत्री व्हावे; मात्र कोणी करणार का ?, असा प्रश्‍न राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपस्थित केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एका मुलाखतीत मलाही मुख्यमंत्री व्हावे, असे वाटत आहे, असे मत व्यक्त केले होते. २२ जानेवारी या दिवशी कोल्हापूर येथील शासकीय विश्रामगृह येथे शरद पवार यांची पत्रकार परिषद झाली. त्या वेळी ते बोलत होते.

१. धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप प्रकरणाविषयी शरद पवार म्हणाले, आरोपांच्या मुळाशी जाण्याची आवश्यकता आहे, असे मी अगोदरच सांगितले होते. सत्य समजल्याविना निष्कर्षापर्यंत पोचण्यात अर्थ नाही. आम्ही योग्य होतो, हे सिद्ध झाले आहे. (धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराची तक्रार प्रविष्ट झाल्यावर धनंजय मुंडे यांनी फेसबूक पोस्टद्वारे त्या महिलेसमवेत असलेल्या संबंधांविषयी स्वीकृती दिली होती. संबंधित महिलेने जरी तक्रार मागे घेतली असली, तरी अनैतिक आणि कायदाद्रोही पदाधिकारी असणारा पक्ष जनहित कधी तरी साधू शकेल का ? – संपादक)

२. कृषी कायद्याविषयी केंद्र सरकारची तात्पुरती स्थगिती शेतकर्‍यांना अमान्य आहे. शेतकरी कृषी कायदे रहित करण्यावर ठाम आहेत. कायद्याविषयक बनवलेल्या समितीवर शेतकर्‍यांचा विश्‍वास नाही. साखरेचा दर वाढला पाहिजे यासाठी केंद्र सरकारकडे मागणी करणार आहे. (काही वर्षांपूर्वी महाराष्ट्रात दिलेल्या एका मुलाखतीत शरद पवार यांनी शेतकर्‍यांना योग्य प्रकारे न्याय मिळत नसल्याने कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे खासगीकरण होण्याची आवश्यकता असल्याचे मत मांडले होते. तसेच त्यांच्या आत्मचरित्रातही हाच भाग अधोरेखित केला होता. असे असतांना केंद्र सरकारच्या कृषीविषयक कायद्यांना विरोध करून अगोदरच्या भूमिकेच्या विरोधी भूमिका घेतली जात असेल, तर सामान्यांनी नेमका कशावर विश्‍वास ठेवायचा ? – संपादक)

३. राज्यातील महाविकास आघाडी सरकार ५ वर्षे चालेल यात कोणतीच शंका नाही. (केवळ सरकारच चालण्यापेक्षा ते कसे चालले हे महत्त्वाचे आहे. पालघर येथे संतांची झालेली हत्या, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर सातत्याने होणारे विविध भ्रष्टाचार, बलात्कार यांचे आरोप, महिलांवरील अत्याचारांच्या वाढत्या घटना यांवरही भाष्य करण्याचे धारिष्ट्य शरद पवार यांनी दाखवावे. – संपादक)

जयंत पाटील यांना मुख्यमंत्री होण्यासाठी आमचा पाठिंबा ! – सुप्रिया सुळे, खासदार, राष्ट्रवादी काँग्रेस

जयंत पाटील यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या दावेदारीविषयी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, अजित पवारांचा जयंत पाटील मुख्यमंत्री व्हावे, यासाठी पाठिंबा असेल, तर आमचा पाठिंबा नसण्याचे कारण नाही.

आपल्या पक्षाचा, आपल्या विचारांचा मुख्यमंत्री व्हावा, अशी इच्छा असण्यात गैर काय ? खासदार सुप्रिया सुळे या कोल्हापूर दौर्‍यावर आल्या आहेत. त्या वेळी पत्रकारांनी त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता त्यांनी हे मत व्यक्त केले.