चिखली (जिल्हा बुलढाणा) मतदारसंघात ब्राह्मण समाजावर कधीही अन्याय होणार नाही ! – आमदार श्‍वेता महाल्ले 

बैठकीत बोलतांना आमदार श्‍वेता महाल्ले आणि उपस्थित अन्य मान्यवर

चिखली (जिल्हा बुलढाणा) – ब्रह्मांडाचे ज्ञान असलेला आणि ईश्‍वराच्या पुष्कळ जवळ असलेला, म्हणजे ब्राह्मण. अशा ब्राह्मण समाजावर चिखली मतदारसंघात कोणताही अन्याय होऊ देणार नाही, असे प्रतिपादन चिखली येथील लोकप्रिय आमदार सौ. श्‍वेता महाल्ले यांनी केले. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने एक दिवसीय महाराष्ट्र राज्यस्तरीय चिंतन बैठकीचे आयोजन येथील ‘स्वरांजली हॉटेल’ येथे करण्यात आले होते. या बैठकीच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.

१. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. गोविंद कुळकर्णी, प्रदेशाध्यक्षा मोहिनी पत्की, कार्याध्यक्ष निखिल लातूरकर, जिल्हाध्यक्ष अशोक व्यास, चिखली येथील नगराध्यक्षा सौ. प्रिया बोन्द्रे, तसेच कुणाल बोन्द्रे, संजय चेके, पंडितराव देशमुख, नीलेश अंजनकर, संजूभाऊ गाढेकर आदी मान्यवर मंचावर अपस्थित होते, तसेच या बैठकीला महाराष्ट्र राज्यातून प्रत्येक जिल्ह्यातून १ प्रतिनिधी उपस्थित होते.

२. या वेळी आमदार महाल्ले म्हणाल्या की, आपल्या समाजासमवेत अन्य समाजातील वंचितांना साहाय्य करण्याची अखिल भारतीय ब्राह्मण समाजाची भूमिका अभिनंदनीय आहे. सर्व समाजाने एकत्र आल्याविना देशाची प्रगती शक्य नाही.

या वेळी ब्राह्मण महासंघाच्या पुढील कार्यास आमदार महाल्ले यांनी शुभेच्छा दिल्या.