१. श्री. अमित लिमकर, ठाणे
१ अ. पती-पत्नीला खोकल्याचा त्रास चालू होऊन चव आणि गंध येणे बंद होणे, पत्नीमध्ये ही लक्षणे अधिक असल्याने तिला वेगळ्या खोलीत ठेवून विलगीकरणाचे सर्व नियम पाळणे आणि आधुनिक वैद्यांनी ही कोरोनाची लक्षणे असल्याचे सांगणे : ‘२६.७.२०२० पासून मला आणि माझ्या पत्नीला खोकल्याचा त्रास चालू झाला. आम्हाला चव कळणे आणि गंध येणेही बंद झाले होते. पत्नीमध्ये ही लक्षणे अधिक प्रमाणात असल्याने आम्ही तिला एका वेगळ्या खोलीत ठेवून विलगीकरणाचे सर्व नियम पाळू लागलो. आधुनिक वैद्यांनी ही कोरोनाची लक्षणे असल्याचे सांगितले; परंतु आमची ‘लॅब’मध्ये जाऊन कोरोनाची चाचणी करण्याची मनाची सिद्धता होत नव्हती; कारण ‘आम्हा दोघांचा अहवाल सकारात्मक आल्यास आमच्या लहान मुलीला कुठे ठेवायचे ?’, या विचाराने आम्हाला ताण आला होता. अखेर आधुनिक वैद्यांच्या सल्ल्यानुसार आम्ही विलगीकरणाचे सर्व नियम पाळून घरीच औषधे घेण्याचा निर्णय घेतला.
१ आ. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळकाकांनी दिलेला जप करतांना पुष्कळ ऊर्जा मिळणे आणि नामजपादी उपाय केल्याने कोरोनामुळे होणार्या त्रासांची तीव्रता पुढील दोनच दिवसांत न्यून होणे : २९.७.२०२० या दिवशी सद्गुरु गाडगीळकाकांनी आमच्यासाठी सांगितलेला जप साधकांद्वारे आम्हाला मिळाला. ‘परात्पर गुरु डॉक्टरांचे आमच्याकडे लक्ष आहे आणि त्यांनीच आमच्यासाठी हा जप पाठवला आहे’, या भावाने आम्ही तो करण्यास आरंभ केला. ‘हा जपच आम्हाला यातून बाहेर काढणार’, याविषयी आमची श्रद्धा असल्याने ‘प्रतिदिन जप पूर्ण कसा होईल ?’, याकडे आम्ही कटाक्षाने लक्ष देत होतो. जप करतांना पुष्कळ ऊर्जा मिळत असल्याचे जाणवत होते. नामजपादी उपायांतून चैतन्य मिळाल्याने कोरोनामुळे होणार्या त्रासांची तीव्रता पुढील दोनच दिवसांत न्यून झाली. पत्नीचा तापही दोन दिवसांत पूर्णपणे गेला. पाच-सहा दिवसांतच मी घरातील सर्व कामे करून घरून कार्यालयाची कामेही करू लागलो. ‘प्रतिदिन नामजप करतांना ईश्वराचे आपल्याकडे सतत लक्ष आहे’, असा भाव ठेवल्याने मनाची सकारात्मकता वाढली.’
२. सौ. कौसल्या पवार, कांदिवली, मुंबई
२ अ. कोरोना चाचणीचा अहवाल ‘सकारात्मक’ (पॉझिटिव्ह) आल्यावर रुग्णालयात भरती करणे आणि थोड्याच वेळात उत्तरदायी साधिकेने सद्गुरु गाडगीळकाका यांनी सांगितलेला नामजप करावयास सांगणे अन् ६ घंटे नामजप पूणर्र् करण्यासाठी तळमळीने प्रयत्न करणे : २३.८.२०२० या दिवशी माझा कोरोना चाचणीचा अहवाल सकारात्मक आल्यावर मला रुग्णालयात भरती करण्यात आले. याविषयी केंद्रातील उत्तरदायी साधिकेला कळवल्यावर तिने थोड्याच वेळात सद्गुरु गाडगीळकाका यांनी दिलेला नामजप मला सांगितला. नामजप मिळाल्यावर माझी गुरुमाऊलींच्या चरणी पुष्कळ कृतज्ञता व्यक्त झाली. त्या दिवसापासूनच मी ६ घंटे नामजप पूणर्र् करण्यासाठी तळमळीने प्रयत्न करू लागले. नामजप, प्रार्थना, कृतज्ञता आणि व्यष्टीचे अन्य प्रयत्न यांमुळे मला आजाराची झळ पोचली नाही.
२ आ. रुग्णालयात असूनही भगवंताच्या कवचामध्ये असल्याचे जाणवणे आणि पुढचे सर्व अहवाल ‘सामान्य’ आल्याने मला दहाव्या दिवशी घरी पाठवणे : मला ‘सीटी स्कॅन’ करायला सांगितल्यावर आरंभी भय वाटले; मात्र ‘सीटी स्कॅन’ करायला जातांना एका बाजूला परात्पर गुरुदेव आणि दुसर्या बाजूला भगवान श्रीकृष्ण बसला आहे’, असा भाव ठेवल्यामुळे मला जराही भय जाणवले नाही. ‘रुग्णालयात असूनही मी भगवंताच्या कवचामध्ये आहे’, असे मला जाणवत होते. त्यामुळे मनात सातत्याने व्यष्टी साधनेचेच विचार येत असत. केवळ भगवंताच्या कृपेमुळे या काळात मला कोणताच त्रास झाला नाही. माझे पुढचे सर्व अहवाल सामान्य (कोरोनाच्या संदर्भात ‘नकारात्मक’) आल्याने मला दहाव्या दिवशी घरी पाठवण्यात आले.
२ इ. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले बाजूला बसले असून श्रीकृष्ण सुदर्शनचक्राने संरक्षककवच निर्माण करत आहे आणि त्यामुळे शरिरातील सर्व विषाणू नष्ट होत आहेत’, असा भाव ठेवल्यावर प्रत्यक्षातही तसेच घडत असल्याचे जाणवणे : मी रुग्णालयात प्रार्थना करतांना ‘परात्पर गुरुदेव माझ्याजवळ येऊन बसले आहेत. श्रीकृष्ण सुदर्शनचक्राने माझ्याभोवती संरक्षककवच निर्माण करत आहे. परात्पर गुरुदेव माझ्याकडे स्मितवदनाने पहात आहेत आणि माझ्या शरिरातील सर्व विषाणू नष्ट होत आहेत’, असा भाव ठेवल्यावर प्रत्यक्षातही तसेच घडत असल्याचे मला जाणवायचे.
२ ई. आलेली अनुभूती
२ ई १. भगवान श्रीकृष्णाच्या हातातून दिव्य प्रकाश येऊन संरक्षककवच निर्माण होणे : मी रुग्णालयात असतांना ‘भगवान श्रीकृष्णाच्या हातातून दिव्य प्रकाश येत आहे आणि माझ्याभोवती संरक्षककवच निर्माण होत आहे’, अशी मला अनुभूती यायची. भगवंताच्या कृपेने ही अनुभूती मी घरी आल्यावरही मला घेता येत आहे.’
३. सौ. अनुपमा दळवी, भांडुप, मुंबई
३ अ. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेला जप केल्यामुळे १० दिवसांत केस गळण्याचे प्रमाण ७० टक्यांनी उणावणे
३ अ १. वर्ष २०२० च्या गुरुपौर्णिमेच्या काही दिवस आधी केस गळू लागणे, झोपतांना केसांच्या मुळांशी वेदना होणे आणि ‘असेच केस गळत राहिल्यास टक्कल पडेल’, या विचाराने ताण येणे अन् याविषयी संतांना सांगितल्यावर सद्गुरु गाडगीळकाकांनी नामजप देऊन तो करावयास सांगणे : ‘वर्ष २०२०च्या गुरुपौर्णिमेच्या काही दिवस आधी माझे केस गळू लागले. मला रात्री झोपतांना केसांच्या मुळाशी पुष्कळ वेदना व्हायच्या. त्यानंतर केस गळण्याचे प्रमाण वाढले. ‘असेच केस गळत राहिले, तर थोड्याच दिवसांनी टक्कल पडेल’, या विचाराने मला ताण येऊ लागला. २५ ते ३० दिवसांनंतर मी या त्रासाविषयी संतांना कळवले. गुरुदेवांच्या कृपेने २७.७.२०२० या दिवशी सद्गुरु गाडगीळकाकांनी यावर सांगितलेला जप मला सांगण्यात आला. हा जप मला प्रतिदिन २ घंटे असा १० दिवस करण्यास सांगितले होते.
३ आ २. पहिल्या दिवशी उपायांचा नामजप करत असतांना मी परात्पर गुरुदेवांच्या समोर बसले असून ‘ते केसांवर उपाय करत आहेत’, असे जाणवणे आणि दुसर्या दिवशी कुणीतरी टाळूवरचे केस जोराने खेचत असल्याचे जाणवणे अन् नंतर नऊ दिवस जप चांगला होणे : ‘पहिल्या दिवशी उपायांचा नामजप करत असतांना मी परात्पर गुरुदेवांच्या समोर बसले आहे आणि ते माझ्या केसांवर उपाय करत आहेत’, असे मला जाणवले. ‘दुसर्या दिवशी नामजप करतांना मात्र कुणीतरी माझ्या टाळूवरचे केस जोराने खेचत आहे’, असे मला जाणवत होते. त्यापुढील ९ दिवस माझा नामजप चांगला झाला. सद्गुरु गाडगीळकाकांनी सांगितलेला जप केल्यामुळे गुरुदेवांच्या कृपेने केस गळण्याचे प्रमाण ७० टक्के न्यून झाले, तर केसांच्या मुळाशी असलेले दुखणे पूर्णत: बंद झाले.’
४. श्री. प्रवीण राऊळ, गोरेगाव, मुंबई
१ अ. प्रारंभी मुलीला आणि नंतर स्वतःलाही ताप येणे : १५.६.२०२० या दिवशी माझ्या मुलीला आणि नंतर मला ताप आला. आधुनिक वैद्यांनी दिलेल्या औषधाने ताप थोडा उणावला.
१ आ. ‘श्री दुर्गादेव्यै नमः ।’ हा नामजप १०८ वेळा करतांना प्रारंभी पाठ दुखून पुष्कळ त्रास होणे, नंतर ३ – ४ दिवस सतत नापजप केल्यावर चांगले वाटणे अन् नामजपासाठी लागणारा कालावधी न्यून होणे : मी साधकांना याविषयी कळवल्यावर त्यांनी (सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना विचारून) २०.६.२०२० या दिवशी आम्हाला ‘श्री दुर्गादेव्यै नमः ।’ हा नामजप करायला सांगितला. हा नामजप १०८ वेळा करतांना माझी पाठ दुखून मला पुष्कळ त्रास झाला. हा नामजप पूर्ण करायला मला दीड घंटा लागला. दुसर्या दिवशीही नामजप करतांना मला त्रास झाला; परंतु ३ – ४ दिवस सतत नापजप केल्यावर मला चांगले वाटू लागले आणि नामजप करण्यासाठी लागणारा कालावधी न्यून झाला.
१ इ. मंत्रजप, काढा आणि औषधे यांमुळे थोड्याच दिवसांत पूर्णपणे बरे होणे अन् या काळात वेळ मिळाल्याने अधिक काळ नामजप करता येणे : कोरोना काळात आत्मबळ वाढण्यासाठी दिलेल्या ३ मंत्रजपांपैकी माझा गायत्री मंत्राचा नामजप चालू होता, तसेच आम्ही काढा आणि औषधेही घेत होतो. त्यामुळे आम्ही थोड्याच दिवसांत पूर्णपणे बरे झालो. या दिवसांत मला पुष्कळ वेळ मिळाल्याने अधिक काळ नामजप करता आला.
५. सौ. सीमा धुरी, सानपाडा, नवी मुंबई
२ अ. यजमानांना ‘कोरोना’ची लागण झाल्याने त्यांना रुग्णालयात भरती करणे, स्वतःलाही ताप येऊन डोकेदुखीचा त्रास होणे आणि नामजपादी उपाय केल्याने ताप न्यून होणे : माझ्या यजमानांना ‘कोरोना’ची लागण झाल्याने त्यांना रुग्णालयात भरती केले. ते रुग्णालयातून घरी येण्याआधी ३ दिवस मला ताप येऊन डोकेदुखीचा त्रास होऊ लागला. माझ्या मनातील नकारात्मक विचारांचे प्रमाणही वाढले होते. माझ्या मनातील विचारांचे प्रमाण अल्प होण्यासाठी मी प्रार्थना आणि ३ घंटे नामजप पूर्ण करण्याचा प्रयत्न करत होते. सौ. विद्यागौरी गुजर यांनी ‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ या ग्रंथाचे वाचन आणि आवरण काढायला सांगितल्यावर मी तसे करणे चालू केले. मी याप्रमाणे केल्यावर माझा ताप न्यून झाला.
२ आ. नामजपादी उपाय केल्यावर ‘कोरोना’ची लक्षणे नष्ट होऊन प्रकृतीत झपाट्याने सुधारणा होऊ लागणे : माझी डोकेदुखी वाढली होती. डोकेदुखीमुळे भ्रमणभाषवर लावलेला नामजप ऐकतांना मला त्रास होत होता; म्हणून मी नामजप बंद करून सभोवती खोके लावले आणि प्रार्थना केली. मी उशीवर परात्पर गुरुदेवांचे रंगीत छायाचित्र असलेला दैनिक ‘सनातन प्रभात’चा अंक ठेवला. मी ‘हिंदु जनजागृती समिती’ची टोपी परिधान केली. ‘माझ्या शरिरातील नकारात्मक शक्ती आणि किटाणू नष्ट होऊ देत. ग्रंथामधून प्रक्षेपित होणार्या चैतन्याने माझ्या देहाची शुद्धी होऊ दे’, अशा प्रार्थना मी केल्या. मी ‘प.पू. भक्तराज महाराज’, असा नामजप चालू केला. नंतर १५ ते २० मिनिटांनी मी भावावस्थेत गेले आणि माझे डोके दुखणे थांबले. माझ्या प्रकृतीत झपाट्याने सुधारणा होऊ लागली.
२ इ. रुग्णालयात कोरोनाची लक्षणे न आढळल्याने ४ दिवसांत घरी पाठवणे : मला रुग्णालयात भरती केले होते. त्या वेळी माझ्यात ‘कोरोना’ची कोणतीही लक्षणे आढळली नाहीत. मला ४ दिवसांत घरी पाठवण्यात आले. परात्पर गुरुदेवांना अशक्य असे काहीच नाही. माझ्या मनात त्यांच्याप्रती श्रद्धा दृढ झाली. परात्पर गुरुदेव यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |