कोल्हापूर – आखरी रास्ता कृती समितीच्या वतीने गंगावेस-शिवाजी पूल रस्त्याच्या कामासाठी वेळोवेळी आंदोलन करण्यात आले. या संदर्भात आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी गंगावेस ते शुक्रवार गेट मार्गावरील भुयारी गटार आणि रस्ता याविषयी पहाणी करून अधिकार्यांना त्वरित काम करण्याच्या सूचना देऊनही त्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही. महापालिकेचे अधिकारी जाणीवपूर्वक काम रखडवत आहे. त्यामुळे गंगावेस-शिवाजी पूल रस्त्याचे काम हेतूपुरस्सर कासवगतीने करणार्या अधिकार्यांवर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन आखरी रास्ता कृती समितीच्या वतीने कोल्हापूर महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांना देण्यात आले.
आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या संदर्भात एकेरी मार्ग आणि अवजड वाहनांना प्रवेश बंदी यांविषयीचे वाहतूक पोलीस निरीक्षकांकडे निवेदन दिल्यावर त्याची त्वरित कार्यवाही चालू झाली. तरी या संदर्भात लक्ष घालून त्वरित काम पूर्ण करावे; अन्यथा जनतेच्या वतीने अधिकार्यांचा कासवछाप अधिकारी म्हणून सत्कार करण्यात येईल. या वेळी शिवसेना नेते आणि संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष श्री. किशोर घाटगे, सर्वश्री महेश कामत, सुरेश कदम, अनंत पाटील, रोहन जाधव आदी उपस्थित होते.