वर्ष २०२० मध्ये झालेल्या गुरुपौर्णिमा महोत्सवाच्या वेळी ऑनलाईन पद्धतीने दाखवलेल्या ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधनेसंबंधी केलेले अमूल्य मार्गदर्शन’ या विषयावर परात्पर गुरु डॉक्टरांशी साधकांच्या झालेल्या भेटींच्या वेळच्या चित्रफितींमधील संवाद येथे देत आहोत.
१. सनातनच्या ‘भावजागृतीचे प्रकार’ या ग्रंथात सांगितल्यानुसार टप्प्याटप्प्याने भावजागृतीचे प्रयत्न करावे !
साधक : मला कळत नाही की, मला भावाची स्थिती अनुभवायला का येत नाही ? मी दिवसभरात ३ – ४ वेळा भावजागृतीचे प्रयत्न करतो.
परात्पर गुरु डॉ. आठवले : ग्रंथात दिल्याप्रमाणे टप्प्याटप्प्याने प्रयत्न करा. काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. सौ. अंजली गाडगीळ (आताच्या श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ) रामनाथी आश्रमात सत्संग घेत होत्या. एकदा त्यांनी सर्व साधकांना ‘पुढच्या वेळी सत्संगात ‘भावजागृती’ हा विषय घेऊया. तुम्ही तो ग्रंथ वाचून या’, असे सांगितले. पुढील सप्ताहाच्या सत्संगात त्यांनी सर्वांना विचारले, ‘‘ग्रंथ वाचला कि नाही ?’’ सर्वांनी हात वर केले; परंतु कु. मधुरा भोसले (ज्ञानप्राप्तकर्त्या साधिका कु. मधुरा भोसले) हिने हात वर केला नव्हता. तेव्हा सौ. अंजली यांनी तिला विचारले, ‘‘तुझी प्रकृती बरी नव्हती का ? सेवा अधिक होती का ? का ग्रंथ वाचला नाहीस ?’’ तेव्हा तिने (मधुराने) सांगितले, ‘‘मी आजारी नव्हते आणि मला अधिक सेवासुद्धा नव्हती; परंतु मी जेवढे वाचले, ते आचरणात (कृतीत) आणण्याचा प्रयत्न करत होते.’’
अध्यात्माचे ग्रंथ गोष्टीच्या पुस्तकासारखे वाचून बाजूला ठेवून दिले, असे नाहीत. मधुराने त्यातील १० – १५ पाने वाचली आणि त्यात सांगितल्याप्रमाणे ती कृती करत होती. तसे टप्प्याटप्प्याने करत गेलात, तर तुम्ही पुढे जाल आणि भावजागृती होर्ईल. थोडे थोडे वाचून तशी कृती करा.
२. भगवंताचे एकदाच अत्यंत भावपूर्ण नाम घेतल्याने मुक्ती मिळते; परंतु ते करण्यासाठी प्रथम स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करणे आवश्यक आहे !
साधक : परात्पर गुरुदेव, गुणात्मक नामजप आणि संख्यात्मक नामजप यांमध्ये कशाला अधिक महत्त्व आहे ?
परात्पर गुरु डॉ. आठवले : गुणात्मक (क्वालिटी) नामजपाला !
साधक : मी जेव्हा संख्यात्मक नामजप करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा तो गुणात्मक न होता यांत्रिकपणे होतो.
परात्पर गुरु डॉ. आठवले : संख्यात्मक नामजपाला कसलाही अर्थ नाही. भगवंताचे नाम एकदा जरी भावपूर्ण घेतले, तरीसुद्धा मुक्ती मिळते; परंतु (आपला) भाव नसतो. त्यामुळे आपल्याला लक्ष-लक्ष वेळा नामजप करावा लागतो.
साधक : मुक्तीपर्यंत पोचण्यासाठी न्यूनतम किती नामजप करायला पाहिजे ?
परात्पर गुरु डॉ. आठवले : स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाला प्रथम प्राधान्य असते. हा पहिला टप्पा आहे. जसे शाळेत गेल्यावर आपण प्रथम ‘अ, आ, इ, ई …’ आणि ‘ए, बी, सी, डी…’ लिहायला शिकतो, नंतर मोठमोठी पुस्तके शिकतो; त्याच प्रकारे प्रथम स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करायचे. नंतर नामजप इत्यादी करता येईल.
३. अद्वैतात जाण्यासाठी नामजपापेक्षा ‘२४ घंटे भावाच्या स्थितीत रहाणे’, हा साधनेचा पुढचा टप्पा आहे !
साधक : परात्पर गुरुदेव, जर नामजपाच्या ऐवजी मी भगवंताचे किंवा त्याच्या लीलांचे स्मरण करत राहिलो, तर त्यात माझा वेळ वाया गेला का ? नामजप आणि स्मरण हे दोन्ही एकाच टप्प्यावरचे आहेत का ?
परात्पर गुरु डॉ. आठवले : कसले स्मरण करता ?
साधक : भगवंताच्या विविध लीलांच्या कथा किंवा त्याची गुणवैशिष्ट्ये यांविषयी वाचतो.
परात्पर गुरु डॉ. आठवले : आपल्याला ‘अनेकातून एकात’ जायचे आहे. मायेची अनेक-अनेक रूपे आहेत, तशी भगवंताचीसुद्धा अनेक अनेक रूपे झाली ना ! त्यांतील एकात जायचे आहे. भगवंत अनेक नसून एकच आहे.
भक्तीमार्गात साधक प्रथम पूजापाठ करतो. तेव्हा कुणी म्हणते, ‘‘स्थुलातील पूजा काय करतोस ? भगवंत तर सूक्ष्म आहे ना ? पूजेऐवजी मानसपूजा कर.’’ नंतर मानसपूजेत मनाने मूर्ती ताम्हनात घेतली, मूर्तीला स्नान घातले. तिला पुसले. तिला गंध, अक्षता, फूल वाहिले, तरीसुद्धा ते सर्व अनेक झाले ना ? तेव्हा म्हणतात, ‘‘अरे, आता मानसपूजा नको, तू आता नामजप कर. एका नामावर ये.’’ नंतर जीवनात आणखी कुणी येतो आणि सांगतो, ‘‘अरे, तू नामजप काय करतोस ? पोपटालासुद्धा ‘राम, राम, राम…’ म्हणायला शिकवले, तर पोपटसुद्धा बोलेल. नामजप भावपूर्ण व्हायला पाहिजे.’’ मग साधक भावपूर्ण नामजप करतो. नंतर आणखी कुणी जीवनात येऊन म्हणतो, ‘‘अरे, नामजप किती वर्षे करत रहाशील ? ते तर द्वैत आहे. तुला अद्वैतात जायचे आहे ना ? भावाच्या स्थितीत २४ घंटे रहा.’’ असे पुढचे पुढचे टप्पे टप्पे असतात.
• सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात. • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |