चि. सुनील नाईक अन् ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या चि.सौ.कां. सुषमा पेडणेकर यांची गुणवैशिष्ट्ये !

स्थिर आणि परिपूर्ण सेवा करणारे चि. सुनील नाईक अन् प्रेमळ आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर दृढ श्रद्धा असणार्‍या ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या चि.सौ.कां. सुषमा पेडणेकर यांची गुणवैशिष्ट्ये !

चि. सुनील नाईक यांची गुणवैशिष्ट्ये

अ. चि.सौ.कां. सुषमा पेडणेकर (भावी पत्नी)

अ १. ‘श्री. सुनील यांचे रहाणीमान साधे आहे. त्यांच्या बोलण्यात आणि वागण्यात कुठेही अहं जाणवत नाही.

अ २. शांत आणि स्थिर : आमच्या लग्नाच्या संदर्भात काही अडचणी येत होत्या. त्या वेळीही श्री. सुनील स्थिर आणि शांत होते. काही प्रसंग घडल्यास ते शांत आणि स्थिर असतात. स्वतःकडे कमीपणा घेऊन ते सतत इतरांना समजून घेतात.

अ ३. तत्त्वनिष्ठता : मी एका प्रसंगात घरातील माणसांशी अयोग्य पद्धतीने वागले. मी हा प्रसंग त्यांना सांगितला. तेव्हा त्यांनी मला माझ्या चुकीची जाणीव करून दिली आणि एका संतांनीही मला त्याच चुकीची जाणीव करून दिली.

अ ४. भावी पत्नीच्या मताचा आदर करणे

अ. मी त्यांना म्हणाले, ‘‘आपले प्रेम क्षणभंगूर आहे. आपण एकमेकांमध्ये अडकायचे नाही. ‘ईश्‍वरप्राप्ती’ हे आपले जीवनातील ध्येय आहे. त्यासाठी आपण प्रयत्न करूया.’’ यासाठी त्यांनी सकारात्मक राहून संमती दर्शवली.

अ ५. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावरील दृढ श्रद्धा आणि भाव

अ. मी श्री. सुनील यांना विचारले, ‘‘तुम्ही एवढी वर्षे साधनेत आहात, तरी अजून तुमची प्रगती झाली नाही. याविषयी तुमच्या मनात विचार येतो का ?’’ तेव्हा ते शांतपणे म्हणाले, ‘‘आपण साधना करत रहायची. प्रगतीचा विचार करायचा नाही. परात्पर गुरु डॉक्टर आपली प्रगती करून घेणारच आहेत.’’

आ. एकदा मी रुग्णालयात होते. तेव्हा त्यांनी माझी विचारपूस केली. नंतर ते म्हणाले, ‘‘तुझी खरी काळजी परात्पर गुरु डॉक्टरच घेत आहेत. मी तुला केवळ मानसिक आधार देऊ शकतो.’’

इ. एकदा मी त्यांना त्यांच्यातील गुण सांगितले. तेव्हा ते मला पटकन म्हणाले, ‘‘ही परात्पर गुरु डॉक्टरांची कृपा आहे.’’

ई. परात्पर गुरु डॉक्टर यांनी सांगितलेली सूत्रे सांगितल्यावर त्यांना पुष्कळ आनंद होतो. ते परात्पर गुरु डॉक्टरांविषयीचे प्रसंग ऐकतांना देहभान विसरून जातात. त्यांच्याविषयी बोलतांना श्री. सुनील यांचा भाव जागृत होतो.

अ ६. जाणवलेले पालट

अ. त्यांचा स्वभाव अबोल आहे. मी त्यांना मनमोकळेपणाने बोलण्यास सांगितले. तेव्हापासून ते मोकळेेपणाने बोलतात.

‘हे ईश्‍वरा, तुमच्या कृपेमुळे मला श्री. सुनील यांची साथ मिळाली’, यासाठी मी तुझ्या चरणी कृतज्ञ आहे.’ (२८.१२.२०२०)

आ. श्री. गौतम गडेकर

आ १. सेवेची तळमळ

आ १ अ. पूर्वी कधी न केलेल्या सेवा अल्पावधीत चांगल्या प्रकारे करणे : ‘श्री. सुनील नाईक हे पूर्वी नेसाई येथील मुद्रणालयात छपाईयंत्रावर सेवा करत होते, तसेच त्यांनी ‘फॅब्रिकेशन’ची सेवाही केली आहे. या सेवा त्यांनी यापूर्वी कधीच केल्या नव्हत्या आणि पाहिल्याही नव्हत्या. ते या सेवा अल्पावधीत चांगल्या प्रकारे करू लागले. हे केवळ त्यांना त्यांच्यातील गुरुदेवांप्रती असलेल्या भावामुळेच शक्य झाले.

आ १ आ. शारीरिक त्रासातही सेवा चालू ठेवणे : छपाईयंत्रावर सेवा करतांना त्यांना अनेक वेळा पोटात तीव्र वेदना चालू व्हायच्या. तेव्हा ते औषध घ्यायचे, थोडा वेळ नामजप करायचे आणि वेदना न्यून झाल्यावर ते पुन्हा सेवा चालू ठेवायचे. गुरुपौर्णिमेच्या कालावधीत ते रात्री उशिरापर्यंत सेवा करत रहायचे.

आ २. प.पू. गुरुदेवांवरील दृढ श्रद्धा : आर्थिक आणि अन्य अडचणींमुळे त्यांनी काही दिवस नोकरी केली; परंतु त्यांचे त्यात मन लागत नव्हते. त्यांची ओढ आश्रमातील सेवेकडे असायची. त्यांना पूर्णवेळ साधना करण्याचा निर्णय घेणेही अवघड होते; परंतु या वेळीही गुरुदेवांवरील श्रद्धेेमुळेच या सर्व अडचणींवर मात करून ते परत पूर्णवेळ साधना करू लागले.

‘गुरुदेवांप्रती असलेला त्यांचा भाव उत्तरोत्तर वृद्धींगत होऊन त्यांची आध्यात्मिक प्रगती होऊ दे’, अशी परात्पर गुरुदेवांच्या चरणी प्रार्थना !’

इ. श्री. सीताराम (नाना) आंग्रे

इ १. शिकण्याची वृत्ती : ‘श्री. सुनील नाईक रामनाथी आश्रमात ‘फॅब्रिकेशन’ची सेवा करतात. त्यांना या सेवेच्या संदर्भात काही ठाऊक नसतांनाही त्यांनी ‘वेल्डिंग’ आणि अन्य सेवा चांगल्या प्रकारे शिकून घेतल्या. त्यांना ‘फॅब्रिकेशन’च्या संदर्भातील एखादी सेवा दिली, तर ते तिच्यातील बारकावे विचारतात आणि ती सेवा अधिकाधिक चांगली करण्याचा प्रयत्न करतात.

इ २. विचारण्याची वृत्ती : एखाद्या सूत्राविषयी त्यांना काही ठाऊक नसेल, तर ते तसे स्पष्टपणे सांगतात आणि उत्तरदायी साधकांना विचारून अडचण सोडवण्याचा प्रयत्न करतात.’

ई. श्री. रामचंद्र (दादा) कुंभार

१. ‘श्री. सुनील यांचा स्वभाव शांत आहे.

२. ते सेवा परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करतात.

३. अनेक वेळा ते सहसाधकांच्या चुका शांतपणे सांगून त्यांना साहाय्य करतात.’

उ. श्री. सुनील निनावे

उ १. जाणवलेला पालट – दायित्व घेऊन सेवा करू लागणे : ‘पूर्वी त्यांना दायित्व घेऊन सेवा करण्याची भीती वाटायची. ‘सेवेत चुका होऊन गुरुकार्याची हानी होऊ नये’, असा त्यांचा विचार असे. त्यानंतर ‘फॅब्रिकेशन’ची सेवा करतांना काही वेळा ते एकटेच असायचे. त्यामुळे मिळालेल्या सेवेचा ते स्वतःच अभ्यास करत असत आणि त्याविषयी उत्तरदायी साधकांना विचारत असत. आता ते सेवांचे नियोजन करतात आणि दायित्व घेऊन सेवा करू लागले आहेत.’

ऊ. श्री. प्रकाश मराठे

‘श्री. सुनील नाईक मितभाषी आहेत. ‘कष्टाळूपणा, विचारून करणे आणि आज्ञाधारकपणा’ असे अनेक गुण त्यांच्यात उपजत आहेत.’

ए. श्री. भूषण मिठबावकर

‘श्री. सुनील नाईक यांच्याकडून ‘वेळेचे पालन करणे, इतरांना साहाय्य करणे, विचारून करणे, व्यवस्थितपणा आणि कठीण प्रसंगाला स्थिर राहून सामोरे जाणे’, असे गुण मला शिकायला मिळाले.’

चि.सौ.कां. सुषमा पेडणेकर यांची गुणवैशिष्ट्ये !

अ. कु. कविता राठीवडेकर

१. ‘सुषमा तिच्या घराचे दायित्व उत्तम प्रकारे सांभाळते.

२. गेल्या काही वर्षांमध्ये सुषमावर अनेक कठीण प्रसंग आले. काही दिवस तिला घरी राहूनही साधना करावी लागली. या प्रसंगांना ती धिराने सामोरी गेली.

३. परात्पर गुरु डॉक्टरांचे आज्ञापालन म्हणून ती अनेक अडथळ्यांवर मात करून दुचाकी चालवण्यास शिकली.’

आ. सौ. पल्लवी हंबर्डे

आ १. ‘काही मासांपूर्वी ताईच्या शारीरिक त्रासांचे प्रमाण पुष्कळ वाढले होते, तरीही ती ग्रंथांची सेवा आणि अल्पाहार सेवा करण्याचा प्रयत्न करत होती.

आ २. सेवा परिपूर्ण करणे

अ. ताई ग्रंथांची सेवा चालते, त्या ठिकाणी येणार्‍या विविध मासिकांच्या नोंदी करण्याची सेवा करते. ती ही सेवा परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करते.

आ ३. शिकण्याची वृत्ती : मी तिला टंकलेखन केलेल्या धारिका पडताळण्यासाठी द्यायचे. तिची बोली भाषा वेगळी असल्याने नवे-जुने करून झाल्यावर ती मला ‘धारिकेत काही चुका राहिल्यास सांग’, असे आवर्जून सांगत असे.

आ ४. जाणवलेला पालट : पूर्वी ती सर्व साधकांशी फार बोलत नसे; पण आता ती सर्वांशी बोलते आणि आनंदी असते.’

इ. कु. राजश्री मामलेदार

‘तिची परात्पर गुरु डॉक्टरांवर दृढ श्रद्धा असल्याने त्या श्रद्धेच्या बळावर ती येणार्‍या प्रत्येक कठीण प्रसंगावर मात करते.’

ई. श्री. प्रकाश मराठे

‘सुषमा या पुष्कळ वर्षांपासून साधनेत आहेत. त्या प्रेमळ आहेत, तसेच त्यांना इतरांना साहाय्य करण्याची आवड आहे. कठीण परिस्थितीतही त्यांनी चिकाटीने साधना करून ६२ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली आणि जीवनाचे सार्थक करून घेतले.’ (३१.१२.२०२०)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रती उत्कट भाव असलेल्या चि.सौ.कां. सुषमा !

१. सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता असणे

‘वर्ष २००७ ते २००९ या कालावधीत मला कु. सुषमा पेडणेकर यांच्या समवेत प्रसाद-भांडारात सेवा करण्याची संधी मिळाली. तिची सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता चांगली असल्याने तिचे सूक्ष्म परीक्षणही अचूक असायचे.

२. नामजपासह प्रत्येक कृती करणे

कु. सुषमा प्रसाद-भांडारात जिथे सेवेला बसायची, त्या जागेवर मी बसल्यावर माझा नामजप सतत व्हायचा. ती सतत नामजपासह प्रत्येक कृती करत असल्याने जागेतही चैतन्य निर्माण झाले असल्याचे मला जाणवले. ती मलाही सतत नामजप करण्याची आठवण करून द्यायची.

३. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रती सुषमाचा उत्कट भाव असल्याचे मी अनुभवत होते. रामनाथी आश्रमाचे बांधकाम चालू असतांना आश्रम परिसरात कचरा पडलेला असायचा. त्या वेळी परात्पर गुरु डॉक्टर आश्रमाच्या बांधकामाची पहाणी करण्यासाठी यायचे. ते आल्यावर ‘त्यांच्या चरणांना काही लागायला नको’, या भावाने ती त्यांच्या वाटेतील कचरा उचलून गोळा करायची.

४. ‘घरातील कामे ही गुरूंची सेवा आहे’, असा भाव ठेवून कृती करणे

सुषमाने पूर्वीपासून एकलव्याप्रमाणे साधना केली आणि स्वतःत पालट करून ६२ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली आहे. घरी असतांना परात्पर गुरु डॉक्टरांना सतत आत्मनिवेदन करणे, प्रार्थना करणे, यांसह ‘घरातील कामे ही गुरूंची सेवा आहे’, असा भाव ठेवून करण्याचा प्रयत्न केला. सुषमाने मला ‘सेवा भावपूर्ण कशी करायची ?’, ते शिकवले.

५. ‘गुरूंनी शिकवलेल्या सर्व सेवा यायला पाहिजेत’, अशी सुषमाची तळमळ असणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी तिला शिकवलेली प्रत्येक सेवा तिने मला समजावून सांगितली. ‘गुरूंनी शिकवलेल्या सर्व सेवा यायला पाहिजेत’, अशी तिची तळमळ असायची. ‘प्रसादाची सेवा पूर्ण करून आपण ग्रंथाची सेवा करायला जायला पाहिजे’, असे तिला सतत वाटायचे. तसे ती मला सतत सांगायची.

६. विवाह कुठेही झाला, तरी तो पवित्र अशा रामनाथी आश्रमातच पार पडत असल्याचा भाव ठेवणार असल्याचे सुषमाने सांगणे

‘विवाह पवित्र अशा रामनाथी आश्रमात व्हावा’, अशी सुषमाची इच्छा होती; परंतु ‘कोरोना’ विषाणूमुळे निर्माण झालेल्या संकटामुळे आश्रमात विवाह होऊ शकणार नसल्याचे तिने स्वीकारले आणि तिने ‘विवाह कुठेही झाला, तरी रामनाथी आश्रमात पार पडणार आहे’, असा भाव ठेवला.’

– कु. कल्याणी गांगण, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (६.१.२०२१)

उखाणे 

वधू आणि वर या दोघांसाठी उपयोगी पडतील, असे उखाणे 

  • जीवनाचे अंतिम ध्येय मोक्ष l
    …..चे नाव घेते, कुलदेवतेची साक्ष ll
  • नाते जुळले माझे आणि ….चे l
    साकार होण्या स्वप्न हिंदु राष्ट्राचे ll
• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
• सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक