तमिळनाडूमध्ये चाकूचा धाक दाखवून बलात्काराचा प्रयत्न करणार्‍या नराधमाला तरुणीने केले ठार !

देशातील वाढत्या बलात्काराच्या घटना पहाता आता तरुणींना स्वसंरक्षणार्थ शस्त्र बाळगण्याची अनुमती देण्याविषयी सरकारने विचार करायला हवा, असेच या घटनेतून लक्षात येते !

थिरूवेल्लूर (तमिळनाडू) – येथे एका १९ वर्षीय तरुणीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न करणार्‍या २४ वर्षीय नराधमाला तरुणीने स्वसंरक्षणार्थ चाकूने गळ्यावर वार करून  त्याला ठार मारले. या तरुणाने या तरुणीवर चाकूचा धाक दाखवून बलात्कार करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा झालेल्या झटापटीमध्ये या तरुणाकडील चाकूद्वारेच तरुणीने त्याला भोसकले. रात्री ही तरुणी शौचासाठी घराबाहेर गेली असता ही घटना घडली. पोन्नारी येथील पोलीस उपअधीक्षक कल्पना दत्त यांनी ‘या प्रकरणामध्ये पोलीस खात्याने कायदेशीर सल्ला मागवला असून या तरुणीला अटक केली जाण्याची शक्यता अतिशय अल्प आहे’, असे म्हटले आहे.

१. पोन्नारी येथेच रहाणारा एस्. अजितकुमार हा याच मुलीच्या नात्यातील तरुण असून तो तिचा पाठलाग करत होता. या वेळी तो अचानक बियरची बाटली हातात घेऊन या तरुणीच्या समोर आल्याने ती घाबरली. अजितकुमार याने तिच्या गळ्यावर चाकू ठेवून बलात्कार करण्याची धमकी दिली. त्यानंतर त्याने स्वतःचे कपडे काढण्यास चालू केल्यावर तरुणीने घरी जाऊ देण्याची विनंती केली; मात्र त्याने नकार दिल्यावर आणि अजितकुमार नशेत असल्याने तरुणीने त्याला धक्का देऊन पळण्याचा प्रयत्न केला. धक्का दिल्याने तो झाडावर आदळला आणि त्याच्या हातातील चाकू खाली पडला. हा पडलेला चाकू उचलून या तरुणीने अजितकुमारच्या गळ्यावर अनेकदा वार केले. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवला असला, तरी अद्याप तरुणीसह कुणालाही अटक केलेली नाही.

एस्. अजितकुमार (चित्र सौजन्य hindi.news18)

२. अजितकुमार याला २ मुले असून तो या तरुणीच्या मावशीचा मुलगा होता. घरगुती वादामुळे काही मासांपूर्वीच अजितकुमार त्याच्या पत्नीपासून वेगळा झाला होता. तो बेरोजगार असून त्यालला दारूचे व्यसन होते. यापूर्वी त्याच्या विरोधात चोरीचे गुन्हे नोंद होते. त्याच्याजवळ नेहमीच चाकू असायचा.

३. पोलिसांनी सांगितले की, सध्या तरी घडलेला सर्व प्रकार हा स्वसंरक्षणासाठी घडल्याचे दिसून येत आहे. याखेरीज या प्रकरणामध्ये दुसरा कोणताही हेतू दिसून येत नाही. या प्रकरणाचा अहवाल न्यायालयासमोर सादर करण्यात येणार असून त्यानंतरच पुढे काय करायचे, हे ठरवले जाणार आहे.