साधकाने ‘व्ही.आय.’ आस्थापनाकडे तक्रार केल्यावर त्याला पैसे परत मिळाले
काही दिवसांपूर्वी मी माझ्या भ्रमणभाषचे ‘सिमकार्ड’ खराब झाल्याने व्ही.आय. (व्होडाफोन-आयडिया) आस्थापनाच्या एका दुकानातून ते पालटून घेतले. तेव्हा दुकानदाराने माझ्याकडून सिमकार्डचे १०० रुपये आकारले. त्या वेळी मी त्याच्याकडे पावतीची मागणी केल्यावर त्याने ‘पैसे थेट आस्थापनाकडे जातात. त्यामुळे पावती देऊ शकत नाही’, असे सांगितले. याविषयी आस्थापनाकडे तक्रार केल्यावर प्रत्यक्षात असे नसल्याचे व्ही.आय. आस्थापनाच्या अधिकार्यांकडून कळले आणि त्यांनी संबंधित तक्रारीची योग्य चौकशी करून तिसर्या दिवशी माझ्याकडे दिलगिरी व्यक्त केली आणि १०० रुपयांचे रिचार्ज करून दिले.
‘व्ही.आय.’ (व्होडाफोन-आयडिया) आस्थापनाकडून नवीन भ्रमणभाष क्रमांक घेत असतांना आपल्याला या आस्थापनाच्या दुकानातून ‘सिमकार्ड’ दिले जाते किंवा एखाद्या वेळेस जुने ‘सिमकार्ड’ खराब झाल्यास आपण ते पालटून घेतो. अनेकदा या दुकानांमध्ये या ‘सिमकार्ड’साठी १०० रुपयांची मागणी केली जाते. त्या वेळी हे ‘सिमकार्ड’ मुख्य आस्थापनाकडून विनामूल्य दिले जात असल्याचे लक्षात घेऊन ‘सिमकार्ड’साठी कुठलेही मूल्य देऊ नये. जर दुकानदार पैसे मागत असल्यास त्यावर पुढील कार्यवाही करता येईल.
१. संबंधित दुकानदार पैशांसाठी आग्रही असल्यास अधिकृत पावतीची मागणी करावी. तरीही न ऐकल्यास आपण ‘व्ही.आय.’ आस्थापनाकडे संबंधित दुकानदारांविरुद्ध तक्रार नोंद करू शकतो.
२. तक्रार नोंद केल्यानंतर आपल्याला आस्थापनाकडून तक्रार क्रमांक पाठवला जातो आणि ‘त्या तक्रारीचे कधीपर्यंत निराकरण केले जाईल’, याची समयमर्यादाही सांगितली जाते. यासाठी ‘संबंधित दुकान हे आस्थापनाचे अधिकृत असायला हवे’, हे लक्षात घ्यावे.
३. व्ही.आय.च्या ‘सिमकार्ड’चे अधिकृत विक्रेते नसलेल्या छोट्या दुकानदारांची बांधिलकी आस्थापन स्वीकारत नाही. एरव्हीही अधिकृत विक्रेते नसलेल्या अशा छोट्या दुकानदारांकडे जरी ‘व्ही.आय.’चे खराब झालेले ‘सिमकार्ड’ पालटून घेतले, तर त्याचे सध्याचे मूल्य ७५ रुपयेच आहे, हे लक्षात घ्यावे. या दुकानदारांकडेही आपण पावती आवर्जून मागू शकतो. नवीन क्रमांक घेतल्यास त्यासाठी पैसे देण्याची आवश्यकता नाही, असे ‘व्ही.आय.’ आस्थापनाच्या अधिकार्याने सांगितले.
– अधिवक्ता योगेश जलतारे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
पैसे आकारल्याविषयी तक्रार करण्याची प्रक्रिया१. सिमकार्डचे पैसे आकारल्यास ‘व्ही.आय.’ आस्थापनाकडे ‘१९८’ या क्रमांकावर तक्रार नोंदवता येते. त्या वेळी आस्थापनाच्या संबंधित कर्मचार्याकडे आपण तक्रार क्रमांक मागून घेऊ शकतो. तसेच या आस्थापनाकडे व्हॉट्सअॅपच्या माध्यमातूनही तक्रार नोंदवता येते. २. व्हॉट्सअॅपवर आरंभी ते त्यांच्या कार्यपद्धतीप्रमाणे संगणकात नोंदवलेली उत्तरे देतात. संगणकीय पद्धत अवलंबत राहिल्यास संगणकाला आपली अडचण समजत नसल्याने तो फारसे साहाय्य करू शकत नाही, हे लक्षात घ्यावे. त्यामुळे आपण ‘आता आम्ही सिमकार्ड पोर्ट करत आहोत (म्हणजे हाच क्रमांक ठेवून अन्य आस्थापनाचे सिमकार्ड घेत आहोत)’, असे लिहावे. त्यानंतर ते आपल्याला मानवी साहाय्य जोडून देतात. त्यानंतर संबंधित व्यक्ती आपली बाजू समजून घेऊन आपल्या तक्रारीची नोंद घेते. ३. आपल्याला जोडून दिलेल्या व्यक्तीशी संवाद साधून आपण आपली तक्रार नोंदवू शकतो. संबंधित व्यक्तीकडून समाधानकारक तक्रार निवारण न झाल्यास त्याविरुद्ध पुढच्या स्तरावर ‘अपिल’ (तक्रार) करता येते. अपिल करण्यासाठी ते त्यांच्या संदेशामध्ये क्रमांक देतात. त्यावर आपण संपर्क करू शकतो. ४. अधिकार्यांशी संयमाने आणि सभ्य भाषेत त्यांचा मान ठेवून संवाद साधावा. असे केल्याने आपली नेमकी समस्या सोडवण्यास त्यांनाही साहाय्य होते.’ |