शासकीय अधिकारी आणि पार्टीचे आयोजक यांचे साटेलोटे असल्याशिवाय असे होणे अशक्यच !
पणजी, १ जानेवारी (वार्ता.) – ख्रिस्ती नववर्षाच्या स्वागतासाठी पेडणे तालुक्यात मोरजी, मांद्रे आणि आश्वे या समुद्रकिनार्यांवर शासकीय अनुमतीशिवाय ‘ई.डी.एम्.’ पार्ट्यांचे आयोजन करण्यात आले. वास्तविक मोरजी, मांद्रे आणि आश्वे या समुद्रकिनार्यांवर कासवांचे वास्तव्य असल्याने हे समुद्रकिनारे ‘शांतता विभाग’ म्हणून घोषित करण्यात आलेले आहेत. (याविषयी पर्यावरणप्रेमी, प्राणीमित्र आयोजकांच्या विरोधात याचिका प्रविष्ट करतील का ? – संपादक)
याविषयी पेडणे तालुक्याचे उपजिल्हाधिकारी रविशंकर निपाणीकर म्हणाले, ‘‘मोरजी, मांद्रे आणि आश्वे या समुद्रकिनार्यांवर ‘ई.डी.एम्.’ पार्ट्यांचे आयोजन करण्यास कुणालाही अनुमती देण्यात आलेली नाही.’’ (अनुमती देण्यात आलेली नाही, तर मग पार्टी करणार्यांवर कारवाई केली का ? कि पार्टी झाली हेच प्रशासनाला ठाऊक नाही ? असे असेल, तर राज्यात कायदा आणि सुव्यवस्था कशी काय टिकून रहाणार ? – संपादक) पार्टीच्या आयोजकांच्या मते मात्र त्यांना पार्टीचे आयोजन करण्यासाठी वरिष्ठांचे सहकार्य आहे. पार्टीचे आयोजक पार्टीच्या आयोजनाशी संबंधित शासकीय अनुमतीची कागदपत्रे दाखवू शकत नाहीत. (यावरून सामान्य जनतेने शासकीय अधिकारी आणि पार्टीचे उद्दाम आयोजक यांचे साटेलोटे आहे, असे समजायचे का ? ही परिस्थिती पालटायला हवी ! – संपादक)
ख्रिस्ती नववर्षाच्या निमित्ताने गोव्यात आलेल्या लाखो पर्यटकांनी मार्गदर्शक तत्त्वांना दिली तिलांजली !
ख्रिस्ती नववर्षाच्या निमित्ताने गोव्यात देशातील विविध भागांतून आलेल्या लाखो पर्यटकांनी कोरोना महामारीशी संबंधित सामाजिक अंतर पाळणे, मास्क घालणे आदी मार्गदर्शक तत्त्वांना तिलांजली दिल्याचे लक्षात आले. पेडणे तालुक्यातील समुद्रकिनार्यांसह राज्यातील इतर समुदकिनार्यांवरही अशीच स्थिती होती. तसेच पर्यटकांनी समुद्रकिनार्यावर जातांना त्यांची वाहने कुठेही उभी केल्याने सार्वजनिक वाहतुकीला मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण झाला. (प्रशासन नावाची काही गोष्ट आहे कि नाही ? असाच प्रश्न यामुळे निर्माण होतो ! – संपादक)
सासष्टी तालुक्यात ३१ डिसेंबरला‘ओल्ड मॅन’ प्रथेच्या निमित्ताने वाटमारी
सासष्टी तालुक्यात मडगाव, बोर्डा, आगाळी, पाजीफोंड, आके आदी भागांत ‘ओल्ड मॅन’ प्रथेच्या निमित्ताने रस्त्यावरून ये-जा करणारे वाहनचालक आणि पादचारी यांच्याकडून पैसे उकळण्यात आले. या वेळी रस्त्यावरील वाहतुकीवर परिणाम झाला. पर्यटकांवर नियंत्रणासाठी असलेल्या पोलिसांनी ‘ओल्ड मॅन’ प्रथेच्या निमित्ताने होणार्या वाटमारीकडे दुर्लक्ष केले.
वागातोर येथे टाळे ठोकलेल्या ‘सनबर्न बीच क्लब’मध्ये मोठ्या आवाजात पार्टीचे आयोजन
प्रशासनाचे समाजद्रोह्यांवर जराही नियंत्रण नसल्याचे हे उदाहरण आहे !
ओझरान, वागातोर येथील वादग्रस्त ‘सनबर्न बीच क्लब’मध्ये ख्रिस्ती नववर्षाच्या निमित्ताने मोठ्या आवाजात पार्टी करून ध्वनीप्रदूषण करण्यात आले. स्थानिकांच्या मते या ठिकाणी ३० डिसेंबरला मध्यरात्रीनंतर चालू झालेली पार्टी दुसर्या दिवशी पहाटे ५ वाजेपर्यंत चालली. या वेळी अखंडपणे मोठ्या आवाजात ध्वनीप्रदूषण करण्यात आले. या ध्वनीप्रदूषणाविषयी स्थानिक पंचायतीचे पंचसदस्य सुरेंद्र गोवेकर यांनी हणजूण पोलीस ठाणे आणि म्हापसा येथील उपजिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली; मात्र याची नोंद घेण्यात आली नाही. (पोलीस आणि प्रशासन यांचे साटेलोटे आहे कि पोलीस आयोजकांना घाबरत आहेत ? प्रशासनाला स्वतःहून पार्टी असल्याचे समजतच नाही, वरून कुणी तक्रार केल्यास त्याची नोंदही घेतली जात नाही. अशा परिस्थितीत स्थानिकांनी पार्ट्यांना विरोध केला असता, तर पोलीस नक्कीच धावून गेले असते ! पोलीस जनतेचे रक्षक आहेत कि केवळ व्यावसायिकांचे ? – संपादक)
म्हापसा येथील उपजिल्हाधिकार्यांनी मागील मासात ‘गोवा समुद्रकिनारपट्टी विभाग व्यवस्थापन प्राधीकरणा’च्या (जी.सी.झेड्.एम्.ए.) आदेशावरून ‘सनबर्न बीच क्लब’ला टाळे ठोकले आहे. ‘सी.आर्.झेड्.’चे उल्लंघन केल्याच्या कारणावरून ही कारवाई करण्यात आली. क्लबच्या व्यवस्थापनाने २८ डिसेंबर २०२० या दिवशी ‘जी.सी.झेड्.एम्.ए.’ला पत्र लिहून ‘सनबर्न बीच क्लब’च्या परिसरात साठवणूक केलेले खाद्यपदार्थ खराब होऊ नये, यासाठी ‘क्लब’चे टाळे काढण्याची विनंती केली. ‘जी.सी.झेड्.एम्.ए.’ने ही मागणी मान्य करून ४८ घंट्यांच्या आत ‘क्लब’चे टाळे खोलण्याचा आदेश म्हापसा येथील उपजिल्हाधिकार्यांना दिला. प्राप्त माहितीनुसार वास्तविक ‘जी.सी.झेड्.एम्.ए.’ला आदेशात सुधारणा करण्याचा अधिकार नाही.