राममंदिराचा सर्व व्यय उचलण्याची एका उद्योगपतीची सिद्धता; मात्र सामान्यांचा निधी लागावा, ही आमची भूमिका ! – गोविंद देवगिरी महाराज, कोषाध्यक्ष

पुणे – देशातील एका उद्योगपतीने माझ्याकडे राममंदिर उभारणीसाठी येणारा सर्व व्यय करण्याची सिद्धता दर्शवली; मात्र ‘सामान्यांतील सामान्यांचा निधी तिथे लागला पाहिजे’, अशी आमची भूमिका आहे, अशी माहिती गोविंद देवगिरी महाराज कोषाध्यक्ष, श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट, अयोध्या यांनी दिली.

या वेळी गोविंद देवगिरी महाराज म्हणाले, ‘‘मंदिर उभारण्याचा सर्व व्यय करण्यास सिद्ध असलेल्या या उद्योगपतीने त्यांचे नाव घोषित करण्यास नकार दिला. अयोध्येतील राममंदिराच्या उभारणीसाठी हातभार लागावा, यासाठी अनेक जण पुढे येत आहेत. मंदिराच्या उभारणीसाठी मुंबई, गुवाहाटी आणि धाराशीव येथील भारतीय तंत्रज्ञान संस्थाच्या (आय्.आय्.टी.) साहाय्याने तज्ञांची एक समिती नेमण्यात आली आहे. मंदिर दगडांच्या आधारे उभे राहील आणि ते सहस्र वर्ष टिकेल. मुख्य मंदिरासाठी ३००-४०० कोटी रुपये इतका व्यय येईल. बाहेरील परिसरात होणारा विकास पकडून एकूण व्यय १ सहस्र १०० कोटी रुपयापर्यंत होईल, असे अनुमान आहे.’’