साधनेमुळे खर्‍या अर्थाने व्यक्तीमत्त्व विकास साधता येतो ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये

सोलापूर येथील ‘ऑनलाईन’ सत्संग सोहळ्यात २४५ जिज्ञासूंचा सहभाग

(सद्गुरु) कु. स्वाती खाडये

सोलापूर – अध्यात्म हे अनंताचे शास्त्र आहे. आपल्यातील दोष गेल्यावर ईश्‍वराचे आशीर्वाद लाभतात. दोष आणि अहं यांचे निर्मूलन झाल्यानंतर ईश्‍वरी गुण येण्यास साहाय्य होते. साधना केल्याने आपल्यावरील दोषांचा पगडा न्यून होण्यास प्रारंभ होतो. दैनंदिन कृती करतांना कृतीला प्रार्थना आणि कृतज्ञता यांची जोड द्या. साधनेमुळे खर्‍या अर्थाने व्यक्तीमत्त्व विकास साधता येतो. त्यामुळे नियमित साधना करून ईश्‍वराचा आदर्श भक्त व्हा, असे प्रतिपादन सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी केले.

सोलापूर जिल्ह्यात मागील ८ मास सनातन संस्थेच्या माध्यमातून साधना सत्संग घेतले जात आहेत. या सत्संगांच्या माध्यमातून जोडलेल्या जिज्ञासूंना साधनेची पुढील दिशा मिळावी, यासाठी नुकतेच ‘ऑनलाईन सत्संग सोहळ्या’चे आयोजन करण्यात आले होते. तेव्हा त्या बोलत होत्या. या सोहळ्याला २४५ जिज्ञासू उपस्थित होते. या सोहळ्याचे सूत्रसंचालन कु. वर्षा जेवळे यांनी केले. सोहळ्याचा उद्देश हिंदु जनजागृती समितीच्या सौ. राजश्री तिवारी यांनी सांगितला, तर सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु (डॉ.) जयंत आठवले यांच्या अद्वितीय कार्याचा परिचय श्री. अमोल कुलकर्णी यांनी करून दिला.

विशेष

१. सोहळ्यात अनेक जिज्ञासूंनी उत्स्फूर्तपणे अनुभूतीकथन केले.

२. सोहळ्याच्या समारोपप्रसंगी उपस्थितांनी ‘सत्संग ऐकून पुष्कळ चांगले वाटले’, असे संदेशाद्वारे लिहून पाठवले.

अनुभूतीकथन

१. सौ. लता काळे (धाराशिव) – सत्संग चालू झाल्यापासून मनाची चिडचिड न्यून झाली. नामजप भावपूर्ण होऊ लागला. घरातील वातावरणातील उत्साह वाढून नकारात्मकता न्यून होत आहे. मला आता लहान-मोठ्या संकटांची भीती वाटणे बंद झाले आहे.

२. डॉ. मनीषा चव्हाण (आष्टी, जिल्हा सोलापूर) – सनातन संस्थेच्या संपर्कात आल्यापासून माझा साधनाप्रवास अनुभूतीमय झाला आहे. सत्संगामध्ये स्वभावदोष आणि अहं यांचे पैलू समजल्याने त्यावर आता नियंत्रण आणता येते.

३. सौ. रेखा येळे (निमगाव, जिल्हा सोलापूर) – सत्संगात दोष आणि अहं कसे दूर करावेत, हे समजले. अहं-निर्मूलनाचे प्रयत्न केल्याने शरिरावरील जडत्व न्यून झाले. आता मी मला भेटणार्‍या नवीन व्यक्तींनाही साधना सांगते.

४. रत्नमाला गायकवाड (बार्शी, जिल्हा सोलापूर) – सत्संग ऐकण्यापूर्वी मला कोणत्याही गोष्टीचा ताण यायचा; मात्र आता कितीही अडचणी आल्या, तरी ताण येत नाही.

जिज्ञासूंचा अभिप्राय

१. सौ. सुनिता घोंगडे, (तुळजापूर, जिल्हा धाराशिव) – सत्संग सोहळ्यात उपस्थित असतांना ‘जणूकाही देवलोकातच बसलेलो आहोत आणि साक्षात देवच बोलत आहे’, असे जाणवले आणि डोळ्यांत अश्रू आले. सद्गुरु ताई बोलतांना त्यांचा प्रत्येक शब्द अंतर्मनामध्ये जात होता.

२. सौ. अमरजा चव्हाण (तुळजापूर, जिल्हा धाराशिव) – सत्संगात सद्गुरु स्वाती ताईंची वाणी ऐकतांना ‘साक्षात परात्पर गुरु (डॉ.) जयंत आठवले मार्गदर्शन करत आहेत’, असे जाणवत होते.

३. डॉ. राजबळीसिंह हजारी, (जल योग साधना प्रशिक्षक, अंबाजोगाई) – सत्संग सोहळा ऐकून जीवनाचे सार्थक झाल्यासारखे वाटले.