सांगली, २६ डिसेंबर (वार्ता.) – सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिका क्षेत्रात १९ डिसेंबरपासून चालू झालेल्या बेवारस वाहन जप्तीच्या मोहिमेत ८ दिवसांत ८१ वाहने जप्त करण्यात आली आहेत. २६ डिसेंबर या दिवशी सांगली शहरातील १० वाहने पथकाने जप्त केली आहेत. जप्त केलेली वाहने संबंधितांना २ दिवसांत दंड भरून न्यावीत; अन्यथा ती वाहने लिलावात काढण्यात येणार आहेत, अशी चेतावणी महापालिकेने दिली आहे.
सांगली महापालिका क्षेत्रात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात बेवारस वाहने पडून असल्याने वाहतुकीला अडथळा होत आहे, तसेच आरोग्याच्या समस्यासुद्धा निर्माण झाल्या आहेत. यामुळे बेवारस आणि रस्त्यावर विनावापर पडून असणारी वाहने जप्त करण्याचे आदेश महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिले आहेत. त्यानुसार २ पथकांद्वारे ही कारवाई चालू आहे. या मोहिमेत साहाय्यक आयुक्त सहदेव कावडे, एस्.एस्. खरात, सचिन पाटील, दत्तात्रय गायकवाड, अतिक्रमण विभाग प्रमुख दिलीप घोरपडे, स्वच्छता निरीक्षक वैभव कुदळे, प्रणील माने यांसह अन्य कर्मचार्यांचा समावेश आहे.