एस्.एस्.आर्.एफ्.चे सद्गुरु सिरियाक वाले यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या संदर्भात आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

परात्पर गुरु डॉ. आठवले

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रथम भेटीच्या वेळी त्यांच्या चरणांवर डोके ठेवून नमस्कार करतांना ‘त्यांच्या चरणांतून पुष्कळ ऊर्जा मिळत आहे’, असे जाणवून संपूर्ण शरीर थरथरणे, ‘मी तुला नवीन जीवन देत आहे’, असे त्यांनी सांगितल्यावर डोळ्यांतून भावाश्रू वाहू लागणे

(सद्गुरु) श्री. सिरियाक वाले

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी माझी सर्वप्रथम भेट डिसेंबर १९९९ मध्ये झाली. त्या वेळी मी त्यांच्या चरणांवर डोके ठेवून नमस्कार करतांना माझा संपूर्ण देह थरथरत होता. ‘त्यांच्या चरणांतून मला पुष्कळ ऊर्जा मिळत आहे’, असे मला जाणवले. त्यानंतर त्यांनी त्यांचा हात माझ्या पाठीवर ठेवत ‘मी तुला नवीन जीवन देत आहे’, असे सांगितल्याचे मला आठवते. त्या क्षणी माझी भावजागृती झाल्यामुळे माझ्या डोळ्यांतून भावाश्रू वाहू लागले. तेव्हा माझ्या दृष्टीसमोर शुभ्र प्रकाशाव्यतिरिक्त मला काहीच दिसत नव्हते. मला वेळेचेही भान उरले नव्हते. त्या प्रसंगी तेथे उपस्थित असलेल्या एका साधकाने मला धरले आणि उठायला साहाय्य केले. त्यानंतर पुढील २० मिनिटे मी निर्विचार आणि स्तब्ध अवस्थेत होतो. ही अनुभूती माझ्या अंतर्मनावर कायमस्वरूपी कोरली गेेली. त्यानंतर ज्या ज्या वेळी माझ्या साधनेत अडथळे अथवा मनात विकल्प आले, त्या त्या वेळी या अनुभूतीच्या केवळ स्मरणाने मला त्यांवर सहजपणे मात करता आली.

– (सद्गुरु) श्री. सिरियाक वाले

बोगद्यातून ५० ते ८० कि.मी. प्रतिघंटा या वेगाने चारचाकी चालवत असतांना अकस्मात् आर्ततेने नामजप होऊ लागणे, ‘शेजारच्या आसनावर परात्पर गुरु डॉ. आठवले बसले आहेत’, असे दिसणे, त्या वेळी वेगळीच शांती अनुभवणे आणि त्यांच्या अस्तित्वामुळेच प्राणघातक अपघातापासून रक्षण होणे

एप्रिल २००७ मध्ये मी फ्रान्स येथे एका आस्थापनात ‘सेल्स एग्झेक्युटिव्ह’ या पदावर नोकरी करत होतो. त्यामुळे पॅरिस आणि इल-दा-फ्रान्स या परिसरात मला प्रतिदिन सरासरी १५० कि.मी. चारचाकीने प्रवास करावा लागत असे. एकदा दुपारनंतर मी एका बोगद्यातून चारचाकी चालवत असतांना माझ्या जीवनाला कलाटणी देणारा एक विलक्षण प्रसंग घडला. त्या बोगद्यात ये-जा करण्यासाठी २ स्वतंत्र मार्ग होते. मी ५० ते ८० कि.मी. प्रतिघंटा या वेगाने गाडी चालवत होतो. त्या मार्गात कुठेही वाहन थांबवणे शक्य नव्हते. वाहन चालवतांना मी माझ्या पुढच्या विहीत कार्याविषयीच्या विचारात गर्क होतो. तेव्हा अकस्मात् माझा नामजप पुष्कळ आर्ततेने होऊ लागला. ज्या आर्ततेने माझा नामजप होत होता, त्याचे मला पुष्कळ आश्‍चर्य वाटत होते. त्यानंतर साधारण दोन मिनिटांनी ‘माझ्या उजव्या बाजूच्या आसनावर परात्पर गुरु डॉ. आठवले बसले आहेत’, असे मला दिसले. ते पाहून मी आश्‍चर्यचकित झालो. ‘परात्पर गुरु डॉक्टरांना साक्षात् स्थूल रूपात प्रकट झालेले मी पहात आहे’, असे मला वाटले. त्या वेळी मी एक वेगळीच शांती अनुभवत होतो, जी अतिशय खोलवर होती.

त्यानंतर काही सेकंदांतच एका व्यक्तीने माझ्या चारचाकी वाहनावर अकस्मात् उडी मारली. माझ्या समोरच्या काचेतून मला तिचा तोंडवळा स्पष्टपणे दिसला. या अनपेक्षित प्रसंगातही मी शांत राहू शकलो आणि माझ्या चारचाकीवर नियंत्रण ठेवू शकलो. त्या वेळी बोगद्यात वाहनांची पुष्कळ वर्दळ होती. माझे वाहनावरील नियंत्रण सुटले असते, तर निश्‍चितच माझा मोठा अपघात झाला असता. बोगद्यात असल्याने मला वाहन थांबवणे शक्य नव्हते; परंतु माझ्या वाहनाच्या बाजूच्या आरशात मी त्या व्यक्तीकडे पाहिले, तेव्हा ती व्यक्ती रस्त्याच्या मधोमध पूर्णतः सुरक्षित उभी असलेली दिसली.

या अनुभूतीमुळे माझ्या परात्पर गुरु डॉक्टरांवरील श्रद्धेत लक्षणीय वाढ झाली. त्यांंच्या अस्तित्वामुळेच या प्राणघातक अपघातापासून माझे रक्षण झाले. मी त्यांना आश्रमात भेटल्यानंतर जसे मला त्यांचे प्रत्यक्ष अस्तित्व जाणवते, तेवढ्याच प्रकर्षाने मी पॅरिस येथे असतांनाही मला त्यांचे अस्तित्व जाणवले.’

– (सद्गुरु) श्री. सिरियाक वाले, युरोप (२९.५.२०१८)

• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
• सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक