परात्पर गुरु डॉक्टर ‘स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशन’ या संस्थेचे प्रेरणास्रोत आहेत. त्यांनी जगभरात अध्यात्माचा प्रसार करण्यासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ची स्थापना केली आहे. या विश्वविद्यालयाकडून गोवा, भारत येथील आध्यात्मिक संशोधन केंद्रात ५ दिवसांच्या आध्यात्मिक कार्यशाळा आयोजित करण्यात येतात. या कार्यशाळांचा उद्देश ‘जिज्ञासूंना साधनेच्या प्रायोगिक अंगाविषयी माहिती देऊन त्यांच्या साधनेला गती देणे’, असा आहे. परात्पर गुरु डॉक्टरांनी या कार्यशाळेतील जिज्ञासूंना केलेले मार्गदर्शन पुढे दिले आहे.
(भाग १७)
भाग १६ वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/434235.html
५. ‘एस्.एस्.आर्.एफ्.’चे आध्यात्मिक संशोधन केंद्र
५ अ. रामनाथी (गोवा) येथील आध्यात्मिक संशोधन केंद्राच्या वास्तूत संतांच्या चैतन्याचा परिणाम अधिक प्रमाणात असणे
सौ. श्वेता क्लार्क : सलोनीताईंमध्ये पुष्कळ भाव आहे. कार्यशाळेतील सत्रांच्या वेळी त्यांना सातत्याने श्रीकृष्णाचे दर्शन होत होते. येथे आल्यावर त्यांना पुष्कळ अनुभूती आल्या. त्यांना गुडघा आणि पाय यांचे दुखणे आहे. आश्रमातील पूर्वी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे वास्तव्य होते त्या खोलीत बसून नामजप केल्यावर त्यांचा हा त्रास न्यून झाला. तसेच येथे आल्यावर आध्यात्मिक त्रासामुळे त्यांचा घसा दुखत होता. अमेरिकेत असा त्रास होत असतांना तो न्यून होण्यास किमान एक घंटा नामजपादी उपाय करावे लागतात; मात्र येथे या खोलीत बसून नामजप केल्यावर तो काही मिनिटांतच न्यून झाला.
परात्पर गुरु डॉ. आठवले : हे तुम्हाला कसे जमले ?
सौ. सलोनी तिवारी : देवाच्या कृपेमुळे जमले !
परात्पर गुरु डॉ. आठवले : अमेरिकेत देव तुमच्यावर कृपा करत नाही का ? केवळ येथेच करतो का ?
सौ. सलोनी तिवारी : ही सर्व तुमचीच कृपा आहे.
परात्पर गुरु डॉ. आठवले : येथील (आश्रमातील) सूक्ष्मातील वातावरण सकारात्मक असल्यामुळे असे झाले. अन्य ठिकाणी सर्वत्र नकारात्मकता आहे. एखाद्या संतांच्या सभोवताली अनिष्ट शक्तींचा त्रास असणारे शिष्य असतील, तर त्या शिष्यांच्या नकारात्मकतेमुळे संतांच्या चैतन्यावरही परिणाम होतो. सामान्यतः संत १०० टक्के चैतन्य प्रक्षेपित करू शकतात; मात्र त्यांच्या सभोवती असलेल्या नकारात्मकतेमुळे त्यांच्याकडून केवळ २० टक्के, ३० टक्के किंवा ४० टक्के एवढेच चैतन्य प्रक्षेपित होते. आश्रमात सर्वत्र चैतन्य आहे. तुम्ही त्याची अनुभूती घेतली आहे. चांगले आहे. असे असूनही लोकांना अमेरिकेला जायचे असते !
सौ. सलोनी तिवारी : मला अमेरिकेला जाण्याची इच्छा नाही; पण माझे यजमान तेथेच नोकरी करतात. त्यामुळे मला तेथे रहावे लागते.
परात्पर गुरु डॉ. आठवले : तुम्ही साधना करून स्वतःभोवती सकारात्मक वातावरण अथवा संरक्षककवच सिद्ध करा. त्यामुळे तुम्ही कुठेही राहिलात, तरी काही फरक पडणार नाही. चिंता करू नका.
५ आ. गोवा येथील सनातनच्या आश्रमात तीर्थक्षेत्रांतील चैतन्यापेक्षा अधिक चैतन्य असल्याचे जाणवणे
सौ. श्वेता क्लार्क : ‘श्री. नीलेश नार्वेकर यांच्याभोवती त्रासदायक शक्तीचे आवरण असून त्यांना थोडासा आध्यात्मिक त्रास आहे’, असे आम्हाला जाणवले. ते गेले काही दिवस येथे आश्रमात रहात आहेत. आता त्यांच्या तोंडवळ्यावर चांगले पालट जाणवत आहेत. पूर्वी नीलेशदादांना पुष्कळ समस्या होत्या. दादांनी एक तीर्थयात्रा केली होती. त्यात त्यांनी दत्तात्रेयांच्या स्थानांचे दर्शन घेतले. या यात्रेच्या वेळी एकदा ते एका दत्ताच्या देवळातील गाभार्यात बसून नामजप करत होते; पण त्यांना तेथे थोडा त्रास जाणवला. त्या देवळाच्या तुलनेत त्यांना आश्रमात अधिक चांगले वाटले. येथे चांगली शक्ती अधिक असल्याचे त्यांना जाणवले.
परात्पर गुरु डॉ. आठवले : ‘आश्रमात तुम्हाला तीर्थक्षेत्रापेक्षा चांगले वाटले’, ही अनुभूती एका अर्थाने योग्य आहे. बार्शी येथील एक संत प.पू. नाना काळे यांना एक यज्ञ करायचा होता. ते संत असल्यामुळे ते जेथे आहेत, तेथूनच ‘यज्ञासाठी कोणते स्थळ सात्त्विक आहे ?’, हे जाणू शकत होते. त्यांनी त्या यज्ञासाठी गोव्यातील सनातन आश्रमाची निवड केली. त्यापूर्वी त्यांनी कधीही सनातन संस्थेचे नाव ऐकले नव्हते. देवाने त्यांना येथे यज्ञासाठी यायला सांगितले. त्याच रात्री त्यांच्या गुरूंनीही स्वप्नात येऊन गुरु म्हणाले, ‘सनातन आश्रमात जाण्याचा तुझा निर्णय योग्य आहे.’ त्या वेळी प.पू. नानांचे वय ८२ वर्षे होते आणि त्यांच्या गुरूंनी ५० वर्षांपूर्वीच देहत्याग केला आहे. त्यानंतर ते येथे आले. त्यांना अश्वमेध यज्ञ करायचा होता. मी त्यांना विचारले, ‘‘तुम्ही ८२ वर्षांचे आहात. यज्ञासाठी तुम्हाला घोडा आणि यज्ञसामुग्री घेऊन येथे यावे लागते. बार्शीपासून ५०० किलोमीटर दूर येथे येण्याचा निर्णय तुम्ही का घेतलात ?’’ त्यावर ते म्हणाले, ‘‘मी इतर कोणत्याही स्थळी यज्ञ केला असता, तर या यज्ञापासून निर्माण झालेल्या चैतन्यापैकी ३० टक्के चैतन्य जेथे यज्ञ झाला, तेथील भूमी शुद्ध करण्यासाठी आणि ४० टक्के चैतन्य तेथील वातावरणाच्या शुद्धीसाठी वापरले गेले असते. मला त्या यज्ञाच्या चैतन्याचा केवळ ३० टक्केच लाभ झाला असता. येथे यज्ञ केल्यामुळे मला यज्ञाच्या चैतन्याचा १०० टक्के लाभ मिळेल. मी स्वार्थी आहे.’’ त्यामुळे तुम्हाला जी अनुभूती आली, ती योग्य आहे. इतर काही तीर्थक्षेत्रांपेक्षा आश्रमातील चैतन्य पुष्कळ अधिक आहे.
(समाप्त)
• वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत. • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात. • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात. • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या आणि संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |