सावंतवाडी – अवैध मद्याची वाहतूक करतांना उत्पादन शुल्क विभागाच्या विशेष कृतीदलाचे निरीक्षक पांडुरंग पाटील यांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी बांदा पोलिसांनी २२ डिसेंबरला सावंतवाडी येथील तिघांना अटक केली होती. या तिघांना येथील न्यायालयाने २ दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे. या प्रकरणातील एक संशयित पसार झाला आहे.
नाताळ आणि नवीन वर्ष यांच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैधरित्या मद्याची वाहतूक करणार्या वाहनांवर कारवाई करण्यास प्रारंभ केला आहे. या पार्श्वभूमीवर २० डिसेंबरला राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विशेष कृतीदल त्यांना मिळालेल्या माहितीनुसार मद्यवाहतूक करत असलेल्या वाहनांचा पाठलाग करत होते. या वेळी मद्यवाहतूक करणार्या २ वाहनांपैकी एका वाहनाने उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाच्या गाडीला सातजांभळी, इन्सुली येथे धडक देऊन पलायन केले, तर दुसर्या वाहनातील साहाय्यकाने कृतीदलाचे निरीक्षक पांडुरंग पाटील यांना धक्काबुक्की करून पलायन केले होते. अटक केलेल्यांमध्ये सावंतवाडी येथील तुषार विनायक तुळसकर, विठ्ठल संतोष चौगुले आणि सलीम हिसार नदाफ यांचा समावेश असून एक जण पसार झाला आहे.
नांदगाव येथे १४ लाखांचे अवैध मद्य पोलिसांच्या कह्यात
कणकवली – गोव्याहून कोल्हापूरला जाणार्या एका टेम्पोतून उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने १४ लाख ४० सहस्र रुपयांचे गोवा बनावटीचे अवैध मद्य कह्यात घेतले. मुंबई-गोवा महामार्गावर नांदगाव येथे ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी टेम्पोसह चालकालाही पथकाने कह्यात घेतले आहे.
एका टेम्पोतून अवैध मद्याची वाहतूक होणार असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून हे अवैध मद्य कह्यात घेण्यात आले.