नगर – नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेत ३ कोटी रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी भाजपचे नेते, माजी खासदार तथा बँकेचे माजी अध्यक्ष दिलीप गांधी, मुख्य शाखेचे तत्कालीन शाखाधिकारी घनशाम बल्लाळ, कर्जदार मे. टेरासॉफ्ट टेक्नॉलॉजीचे प्रोप्रायटर आशुतोष लांडगे यांसह बँकेच्या तत्कालीन संचालक मंडळाच्या सदस्यांवर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. हा पैशांचा अपहार ७ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर २०१७ या कालावधीत झाला आहे. या प्रकरणी बँकेचे अधिकारी मारुती औटी यांनी तक्रार प्रविष्ट केल्यानंतर गुन्हा नोंद करण्यात आला.
बँकेतील अपहाराविषयी चौकशी करून गुन्हा नोंद करण्याची मागणी बँकेच्या काही सभासदांनी केली होती. त्यांनी बँकेच्या प्रशासकांच्या दालनात आंदोलनही केले. ‘गुन्हा नोंद झाल्याविना दालनातून उठणार नाही’, अशी भूमिका त्यांनी घेतली. बँकेचे प्रशासक एस्.सी. मिश्रा यांनी कोट्यवधी रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी दोषी असणार्यांविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार करण्याचे आदेश दिले. त्यानंतर तक्रार देण्यात आली. (अपहाराविषयी तक्रार देण्यासाठी सभासदांवर आंदोलनाची वेळ येणे हे बँक प्रशासनासाठी लज्जास्पद ! – संपादक) आरोपींनी स्वतःच्या अधिकारांचा अपवापर करून अवास्तव आणि १३ खोटी कर्ज प्रकरणे संमत केलेली आहेत.