२८ ते ३१ जानेवारी २०२१ या कालावधीत पन्हाळगड ते विशाळगड गडकोट मोहीम होणार !
सांगली – वर्ष २०२१ ची धारातीर्थ यात्रा अर्थात मोहीम ही ‘पन्हाळगड ते विशाळगड’ (मार्गे पावनखिंड) २८ ते ३१ जानेवारी २०२१ या कालावधीत होत आहे. ६ डिसेंबरला केवळ मोहिमेची घोषणा झाली होती. दिनांक घोषित झाला नव्हता. त्यामुळे प्रत्येक धारकरी, शिवप्रेमी डोळ्यांत प्राण आणून दिनांकाची वाट पहात होता. अखेर दिनांक घोषित झाल्याने धारकरी मोहिमेच्या पूर्वसिद्धतेला लागले आहेत. वर्ष २०१७ मध्ये ही मोहीम झाली होती.
श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानचे अध्यक्ष श्री. रावसाहेब देसाई यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे…
१. २८ जानेवारी २०२१ या दिवशी दुपारी १२ वाजता विशाळगडावरील नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या समाधीस्थानापाशी मोहिमेचा प्रारंभ होईल. समारोपाच्या प्रसंगी म्हणजे ३१ जानेवारी या दिवशी प्रत्येकाने भगवा फेटा परिधान करावा. मोहिमेसाठी प्रत्येकाने ८ वेळ पुरेल एवढी शिदोरी, जलकुंभ, पातळ सतरंजी-चादर आणणे आवश्यक आहे.
२. प्रत्येक धारकर्याने ५० रुपये शुल्क भरणे आवश्यक आहे.
३. मोहिमेची पूर्वसिद्धता म्हणून प्रत्येक धारकर्याने नित्य पळणे, जोर-बैठका, सूर्यनमस्कार असा व्यायाम तात्काळ चालू करावा, तसेच ‘राजा श्रीशिवछत्रपती’ ग्रंथाचे नित्य वाचन चालू करावे.