कुडाळ – दोडामार्ग तालुक्यातील आडाळी एम्.आय.डी.सी. येथे आयुर्वेद संशोधन प्रकल्प संमत करण्यात आला; मात्र तो लातूर येथे हालवण्याच्या हालचाली चालू होत्या. या पार्श्वभूमीवर आयुर्वेद संशोधन प्रकल्प आता दोडामार्ग तालुक्यातील आडाळी येथेच होणार आहे. यासाठी आवश्यक असलेली अनुमती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे, अशी माहिती खासदार विनायक राऊत यांनी दिली.
आडाळी एम्.आय्.डी.सी.च्या ५० एकर भूमीत हा प्रकल्प होणार आहे. पश्चिम घाट संरक्षित क्षेत्रातील दोडामार्ग भागात विविध प्रकारच्या वनस्पती असल्यामुळे केंद्र सरकारने हा प्रकल्प या ठिकाणी करण्याचा निर्णय घेतला होता; मात्र गेले काही दिवस हा प्रकल्प आडाळीऐवजी लातूर येथे नेण्याचा काही नेत्यांकडून प्रयत्न चालू होता. त्याला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, तसेच दोडामार्ग तालुक्यातील लोकांनी विरोध दर्शवत हा प्रकल्प आडाळीतच व्हावा, अशी मागणी केली होती. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी या प्रकल्पाला हिरवा कंदील दिला असल्याचे खासदार राऊत यांनी सांगितले.