६० लाख टन साखर निर्यातीस अनुमती : यंदाच्या हंगामात साखरेचे दर चांगले

साखर कारखानI

कोल्हापूर – या वर्षीच्या हंगामात देशातून अनुदानासह ६० लाख टन साखर निर्यातीला अनुमती देण्याचा निर्णय १६ डिसेंबर या दिवशी केंद्रशासनाने घेतला. सप्टेंबर २०२१ पर्यंत साखर निर्यात करावी लागणार आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या हंगामात अधिक साखर उत्पादन होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत साखर शिल्लक राहू नये, यांसाठी निर्यात अनुदान योजना शासनाने घोषित करावी, अशी मागणी कारखानदारांकडून सातत्याने होत होती.

निर्यात साखरेवरील अनुदानात मात्र गत वर्षीच्या तुलनेत या वर्षी प्रतिक्विंटल ४०० रुपयांची कपात केली असून गतवर्षी हे अनुदान प्रतिक्विंटल १ सहस्र ४४ रुपये होते. ते या वर्षी ६२६ रुपये केले आहे. गत वर्षी निर्यात साखरेचे थकित ९ सहस्र ४०० कोट रुपयांपैकी ५ सहस्र ३६१ कोटी रुपयांचे अनुदान शासन आठवड्यात देणार आहे. साखर उद्योगाच्या दृष्टीने दोन्ही निर्णय सकारात्मक असल्याने यंदाच्या हंगामात पहिल्यांदाच साखर कारखानदारांमध्ये समाधान आहे. साखर निर्यात केलेल्या कारखान्यांना केंद्राकडून या हंगामात ३ सहस्र ५०० कोटी रुपये अनुदानापोटी मिळणार आहेत. अनुदानात कपात झाली, तरी गतवर्षीच्या तुलनेत यंदा साखरेचे दर चांगले असल्याने साखर निर्यातीस चालना मिळण्याची शक्यता आहे.

केंद्राने घेतलेला हा निर्णय दिलासादायक आहे; पण या वर्षीचा ‘बफर स्टॉक’ आणि साखरेच्या हमी भावातील वाढ ही उद्योजकांची मागणी अजून प्रलंबित आहे. साखरेचा भाव जो प्रतिक्विंटल ३ सहस्र १०० रुपये आहे तो ३ सहस्र ८०० रुपये करावा आणि ‘बफर स्टॉक’ घोषित करावा, अशी मागणी होती. ती मान्य झाल्यास या उद्योगाला आणखी दिलासा मिळेल. – पी.जी. मेढे, साखर उद्योगातील तज्ञ

गत काही दिवसांपासून या निर्णयाची शक्यता होती. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील व्यावसायिकांनी कारखान्यांना मिळणारे अनुदान गृहित धरून कारखान्यांकडून अल्प दराने साखर मागणी केली जात होती. यामुळे कारखान्यांना आंतरराष्ट्रीय बाजारात साखर विक्रीचे आव्हान असणार आहे. – अभिजित घोरपडे, साखर निर्यातदार