विद्यार्थ्यांची शैक्षणिक हानी भरून निघण्यासाठी शाळा लवकर चालू होणे अपेक्षित असतांना प्रशासनाने अशा प्रकारे ढिलाई करणे लज्जास्पद आहे.
प्रशासनाचा भोंगळ कारभार !
कोल्हापूर – शिक्षण विभाग आणि जिल्हा प्रशासन यांच्या निर्णयानुसार जिल्ह्यातील ९ वी ते १२ वी पर्यंतच्या शाळा २३ नोव्हेंबरला चालू झाल्या. यातील १ सहस्र ५४ शाळांपैकी ४०० शाळा चालू झाल्या आहेत. पदवीधर-शिक्षक निवडणुकीमुळे शिक्षकांची अनुपलब्धता, अद्यापही अनेक शिक्षकांची कोरोना पडताळणी न होणे यांसह अन्य काही कारणांमुळे ६५४ शाळा अजूनही बंदच आहेत.
जिल्ह्यातील ४०० शाळांमध्ये २५ सहस्र २५१ विद्यार्थी उपस्थित आहेत. ज्याठिकाणी अडचणी आहेत, तेथील अडचणी दूर करून टप्प्या-टप्प्याने शाळा चालू केल्या जात आहेत. विद्यार्थ्यांची संख्या हळूहळू वाढत आहे. आतापर्यंत ८५ टक्के शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या कोरोना चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. यातील ५८ जणांचा अहवाल कोरोनाबाधित आला आहे. अद्याप काही शिक्षकांचे कोरोना चाचणीचे अहवाल प्रलंबित आहेत. त्यामुळे शाळा चालू करतांना दक्षता घेण्यात येत आहे.