समान नागरी कायदा, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी यांसारखे विषय ऐरणीवर येण्याचे सूतोवाच ! पुन्हा एकदा मोठे जनआंदोलन पेटण्याचीही शक्यता !
नवी देहली – गुरु आणि शनि हे दोन मोठे ग्रह सध्या मकर राशीमध्ये एकत्र आहेत. ५९ वर्षांनंतर ते मकर राशीमध्ये एकत्र आले आहेेत. सामान्यतः २० वर्षांनंतर दोन ग्रह एका राशीमध्ये एकत्र येत असतात. आकाशामध्ये १६ डिसेंबर ते २५ डिसेंबर या काळात हे दोन्ही ग्रह अत्यंत जवळ दिसणार आहेत. वर्ष १२२६ मध्ये अशी घटना घडली होती. आता ८०० वर्षांनंतर यांची युती दिसणार आहे. २१ डिसेंबरला हे दोन्ही ग्रह एकमेकांच्या अत्यंत जवळ असणार आहेत. राजा विक्रमादित्य यांचे राजज्योतिषी वराहमिहिरद्वारा रचित ‘बृहत् संहिते’नुसार या युतीमुळे मोठ्या प्रमाणात वातावरणात पालट होण्यासह मोठ्या औद्योगिक घराण्यांमध्ये आणि राजकीय पक्ष अन् संघटना यांमध्ये फूट पडू शकते, असे वृत्त ‘नवभारत टाइम्स’ने दिले आहे.
भारतावरही याचा परिणाम होणार आहे. यामुळे आगामी कालावधीत समान नागरी कायदा, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी आणि नागरिकत्व सुधारणा कायदा यांसारखे विषय पुन्हा ऐरणीवर येऊ शकतात. यामुळे पुन्हा एकदा मोठे जनआंदोलन पेटू शकते.
या वृत्तात पुढे म्हटले आहे की,
१. डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात आणि जानेवारी मासामध्ये हिवाळ्यातील थंडीचा आतापर्यंतचा विक्रम मोडून निघण्याची शक्यता आहे. उत्तर-पश्चिम भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि इराण येथे थंडीची मोठी लाट येऊ शकते.
२. या युतीमुळे युरोपमध्ये मंदीचा प्रभाव वाढणार असून जागतिक स्तरावर हा प्रभाव रहाणार आहे. याचा भारतावर पुढील ५ मास प्रभाव राहील.
३. या युतीचा पाकिस्तानवर अधिक प्रभाव राहील. आगामी कालावधीत सत्ता परिवर्तनासह तेथे मोठे जनआंदोलन होऊ शकते.