‘श्री परशुराम गोमंतक सेने’ची आल्तिनो, पणजी येथे निदर्शनाद्वारे मागणी
पणजी, २२ नोव्हेंबर (वार्ता.) – कॅसिनोमुळे पणजी शहरातील कोरोना महामारीचे संकट आणखी गंभीर होण्याची भीती आहे. या पार्श्वभूमीवर मांडवीतील तरंगते कॅसिनो चालू करण्यासाठी दिलेली अनुज्ञप्ती त्वरित मागे घेण्याच्या मागणीला अनुसरून ‘श्री परशुराम गोमंतक सेने’ने आल्तिनो, पणजी येथील मुख्यमंत्री निवासस्थानासमोर २१ नोव्हेंबरला निदर्शने केली.
याप्रसंगी ‘श्री परशुराम गोमंतक सेने’चे शैलेंद्र वेलींगकर म्हणाले, ‘‘येत्या १५ दिवसांत शासनाने तरंगते कॅसिनो बंद न केल्यास कॅसिनोंच्या कार्यालयांसमोर तीव्र निदर्शने करण्यात येतील. प्रसंगी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यासाठी ‘श्री परशुराम गोमंतक सेना’ उत्तरदारी नसेल. कॅसिनो ही गोव्याची संस्कृती नाही.’’ या मागणीचे एक निवेदन ‘श्री परशुराम गोमंतक सेना’ मुख्यमंत्र्यांना देणार होती; मात्र त्यांना मुख्यमंत्री कार्यालयाने अनुमती दिली नाही. यामुळे मुख्यमंत्री कॅसिनोचे दलाल झाल्याचा आरोप या वेळी करण्यात आला. निदर्शनाच्या ठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त होता.