… हे ‘भूषणा’वह नाही !

संपादकीय 

२८ मार्च या दिवशी अधिवक्ता प्रशांत भूषण यांनी ट्वीट करत म्हटले होते, ‘कोट्यवधी लोक उपाशी आहेत, रस्त्यावर आहेत; मात्र केंद्र सरकारचे मंत्री रामायण आणि महाभारत नावाचे अफू स्वतः खात आहेत आणि लोकांनाही तेच खाऊ घालत आहेत.’ या विरोधात माजी सैनिक जयदेव जोशी यांनी गुजरातच्या राजकोट येथील भक्तीनगर पोलीस ठाण्यात तक्रार केल्यावर गुन्हा नोंदवण्यात आला होता. या प्रकरणी प्रशांत भूषण यांना अटक करण्यास सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. प्रशांत भूषण यांनी याविषयी कार्ल मार्क्स यांचा संदर्भ देत ‘त्यांचेच विधान मी सांगितले आहे’, अशी मखलाशी केली आहे. प्रशांत भूषण यांनी ज्या मार्क्स यांचा संदर्भ दिला आहे, त्यांच्या साम्यवादाने कोट्यवधी निरपराध्यांचा बळी घेतला आहे. समानता प्रस्थापित करण्याच्या नावाखाली साम्यवाद्यांचे हात लोकांच्या रक्ताने माखले आहेत. मार्क्सवाद अथवा साम्यवाद हा धर्म, संस्कृती, देवता यांच्याविषयी लोकांच्या मनात तिटकारा निर्माण करणारा आहे, हे प्रशांत भूषण यांना नक्कीच ठाऊक आहे.

प्रेरणादायी रामायण आणि महाभारत

रामायण आणि महाभारत हा हिंदूंचा चैतन्यदायी आणि गौरवशाली इतिहास आहे. धर्माच्या सर्व मर्यादांचे पालन करून आणि सर्वोच्च त्यागाचा आदर्श रामायण देते, तर धर्म आणि नीती यांची कोणत्याही परिस्थितीत तडजोड न करता भगवंताचे साहाय्य लाभल्यास अधर्मींच्या विरोधात विजयश्री खेचून आणता येते, हे महाभारत शिकवते. चक्रवर्ती सम्राट असलेल्या प्रभु श्रीरामचंद्राने वडिलांचे आज्ञापालन म्हणून वनवासी जीवन पत्करले. हाताशी सैन्य आणि सैन्य सामुग्री नसतांना वानरांना शक्ती देऊन आणि समुद्र उल्लंघून रावण अन् राक्षस यांचा संहार केला. रामराज्याची स्थापना केली आणि केवळ प्रजेतील परिटाने शंका घेतल्यावर सीतेचा त्याग केला. साम्यवाद्यांपैकी कोणात असे वागण्याचे धारिष्ट्य आहे का ? उलट ‘मानवी रक्तपिपासू’ असेच विशेषण साम्यवाद्यांना लावावे लागेल.

साम्यवाद मुळातच अनैसर्गिक गोष्ट असल्याने तो निसर्गनियमाच्या विरुद्ध असणार हे ओघाने आलेच. निसर्गात विविधता आहे. वृक्ष, वनस्पती, प्राणी, फुले, फळे या सर्वांमध्ये विविधता आहे, तर मानवी जीवनात हीच विविधता वेगळ्या स्वरूपात आहे, हे साम्यवादी मान्य करत नाही. प्रत्येकाचे गुण-दोष, आवडी-निवडी, प्रारब्ध हे सर्व वेगळेच आहे. मानवी जीवन भाव-भावनांनी भरलेले आहे. या भाव-भावनांना योग्य दिशा देत त्याद्वारे मानवी जीवन एक वेगळ्या आयामावर, उंचीवर नेण्यास हिंदु धर्म शिकवतो. षड्रिपूंवर नियंत्रण मिळवणे, षड्रिपूंचे निर्मूलन करणे, चुकांवर प्रायश्‍चित्त घेणे, शिक्षा घेणे अशा पद्धतीने हिंदु धर्म मानवी मनाला दिशा देत विधात्याच्या अस्तित्वाची अनुभूती देऊन जीवनात आनंद, शांती आणि समाधान मिळवून देतो. बाह्य गोष्टींपेक्षा आंतरिक सौंदर्य वर्धिष्णू करण्यावर हिंदु धर्म भर देतो. अशाने व्यक्ती आध्यात्मिकदृष्ट्या प्रगत होत जाते आणि स्वत: आनंदी होऊन समष्टीला आनंद प्रदान करते. विश्‍वमन आणि विश्‍वबुद्धी यांच्याशी तादाम्य पाऊन व्यक्ती ईश्‍वरस्वरूप बनून आयुष्याचे सोने करते. साम्यवाद्यांच्या चेल्यांनी हिंदु धर्मातील दोन प्रेरणादायी इतिहासांवर शिंतोडे उडवणे हे कावळ्याने कोकिळेला ‘तुझा आवाज खराब आहे’, असे सांगण्यासारखे आहे.

साम्यवादाचा अस्त

दुसर्‍या महायुद्धानंतर साम्यवाद जगभर पसरला; मात्र ९० च्या दशकांत त्याला ओहोटी लागण्यास प्रारंभ झाला. साम्यवाद कार्यरत असलेल्या रशियाची अनेक शकले झाली. कांगो, केनिया, युगोस्लाव्हिया आणि अन्य देशांतून साम्यवाद नामशेष झाला. आता केवळ चीनमध्येच तो काही प्रमाणात शेष आहे. चीन धाकदपटशाच्या जोरावर तेथील जनभावना दाबत आहे. तिआनमेन चौकात साम्यवादी राजवटीविरुद्ध चिनी तरुणांनी आंदोलन केल्यावर चीनने तरुणांच्या अंगावर अक्षरश: रणगाडे घालून अत्यंत क्रूरतेने आंदोलन चिरडले होते. क्रूरता, कपटीपणा आणि धूर्तता चीनमधील साम्यवाद्यांच्या नसानसांत एवढी भिनली आहे की, तेथील जनतेशी त्यांना काही देणेघेणे नाही. लोकभावना कितीही दाबली, तरी ती एक दिवस उफाळून येणार. ‘जे स्वप्न म्हणजे वास्तवच नाही, ते वास्तवात आणण्याचा प्रयत्न म्हणजे साम्यवाद’, असे साम्यवादाविषयी म्हणावे लागेल. धर्माला अफूची गोळी म्हणायचे आणि केरळात धर्मांधांचे लांगूलचालन करायचे, त्यांच्यावर सोयीसवलतींचा वर्षाव करायचा, त्याच ठिकाणी हिंदु धर्मियांची गळचेपी करायची. हा साम्यवाद का ? बंगालमध्येही साम्यवादी राजवटीत हिंदूंना किती विरोध झाला, आनंद संप्रदायाला संपवण्याचा कसा प्रयत्न झाला, ते सर्वश्रुत आहेच.

शास्त्रशुद्ध आणि स्वयंभू असलेल्या हिंदु धर्माला साम्यवादी नावे ठेवतात आणि अतार्किक साध्य करण्यासाठी धडपडतात. साम्यवाद्यांनी भारतातील इतिहासाची मोडतोड केली आणि पुस्तकांना ‘हिरवा’ अन् ‘लाल’ रंग फासून तो विद्यार्थ्यांच्या माथी मारला. परिणामी विद्यार्थी निपजले ते येथील संस्कृतीची अवहेलना करणारे, निर्भत्सना करणारे. हिंदूंच्या प्रत्येक धर्मसुसंगत आचरणाला नावे ठेवणारे आणि पाश्‍चात्त्यांचे बूट चाटणारे ! हे झाले साम्यवाद्यांचे !

प्रशांत भूषण यांचे स्वत:चे व्यक्तिमत्त्व तरी कुठे चांगले आहे ? मोदी शासनाने घेतलेल्या प्रत्येक राष्ट्रहितैषी निर्णयांवर भूषण यांनी टोकाची विरोधी भूमिका घेतली आहे. जम्मू-काश्मीर येथील जनतेला स्वयंनिर्णयाचा अधिकार देण्याची त्यांची मागणी ही त्यांच्यातील राष्ट्रघातकी वृत्ती दर्शवते. भारतावर आक्रमण करणारा आतंकवादी कसाबला ‘फाशी देऊ नये’, असे मत प्रशांत भूषण यांनी मांडले होते. भारत अशांत कसा होईल, हे पहात मोदींना दूषणे देण्यात त्यांची कारकीर्द जात आहे. म्हणून सांगावेसे वाटते की, साम्यवादी आणि त्यांच्या बगलबच्च्यांनी हिंदूद्वेष थांबवावा. अन्यथा ‘दुसरे महाभारत अटळ आहे’, असे जनतेला वाटते.