मंगल भवन अमंगल हारी…

संपादकीय

२१ दिवस घरी बसून काय करायचे?, हा प्रश्‍न सर्वांसमोर असतांना कोणी भल्या माणसाने ‘रामायण’ आणि ‘महाभारत’ या मालिका दाखवण्याची शासनाकडे विनंती केली अन् ती मान्यही झाली. सध्याच्या काळात देशासमोर असलेल्या सर्व समस्यांचे सर्वांगसुंदर समाधान ‘रामायण’ आणि ‘महाभारत’ या धर्मग्रंथांत आहे. त्यामुळेच आताच्या संकटकाळात या मालिका घरोघरी पोचणार आहेत, याचा आनंद आहे ! एक काळ असा होता की, ‘मंगल भवन अमंगल हारी’ या ओळी लागल्या की, सर्वजण दूरचित्रवाणीकडे धाव घेत असत. आता जसे देशभरात दळणवळण बंदीमुळे सर्व रस्त्यांवर शुकशुकाट असतो, तसेच वातावरण त्या एक घंट्यात होत असे. त्यामुळेच आज जेव्हा या मालिकांचा पहिला भाग प्रदर्शित झाला, तेव्हा देशभरात दळणवळण बंदीमुळे आलेल्या निरुत्साहाच्या वातावरणात जरा उत्साह भरला. सध्या आपले प्राधान्य कोरोनाविरुद्धचा लढा हे असले, तरी करण्यासाठी इतरही बरेच आहे. त्या सर्वांची जाणीव सार्‍या देशाला रामायण-महाभारताच्या आणि त्यासह प्राचीन भारताच्या शिकवणीतून होईल.

जनतेची हतबलता !

फार दूर नको, गेल्या महिन्याभरातील सामाजिक वातावरण पहाता देश सावरण्यासाठी आता जे काही प्रयत्न चालू आहेत, त्यापेक्षा निराळे काहीतरी होणे आवश्यक आहे, हे दिसतच होते. जगभर थैमान घातलेला कोरोना भारतात पोचल्यानंतर, जरा विलंबाने का होईना भारत शासनाने अनेक उपाययोजना करून कोरोनाला थोपवून धरण्याचा प्रयत्न केला आहे. कोरोनाच्याच पार्श्‍वभूमीवर उद्भवलेल्या काही समस्यांचा मागोवा घेतांना प्राचीन भारतीय पद्धतींचे पुनरुज्जीवन आवश्यक असल्याचे दिसून आले. हस्तांदोलन टाळून नमस्कार करण्याच्या पद्धतीचा, तर ब्रिटनच्या प्रिन्स चार्लस् यांनीही स्वीकार केल्याचे दिसून आले. भारतियांचे सोवळे, त्यामुळे पाळली जाणारी स्वच्छता आदी गोष्टींविषयी बरीच चर्चा झाली. एक गोष्ट मात्र आतापर्यंत दुर्लक्षित राहिली आहे. त्याच समस्येने कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रसारही होत आहे, ते म्हणजे लोक करत असलेला प्रवास ! २२ मार्च या ‘जनता कर्फ्यू’च्या आधी २ दिवस लोक मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडले. प्रशासन प्रवास टाळण्याच्या, सामाजिक अंतर राखण्याच्या सूचना देत असूनही रेल्वे स्थानक, बस स्थानके यांवर गर्दीचे लोट दिसून येत होते. बर्‍याच शहरांतील लोकांनी गावाकडे जाण्यासाठी प्रवास करण्याचा धोका पत्करला. याच २ दिवसांत कोरोनाचे रुग्णही वाढले. ‘जनता कर्फ्यू’नंतर दळणवळण बंदीचा कालावधी वाढल्यानंतर त्याही काळात लोकांनी प्रवास केला. ज्यांचे हातावर पोट आहे, ते २१ दिवस काम बंद असतांना शहरात काय खाणार होते ? रोजगारासाठी जे खेडेगावांतून मुंबई, पुणे, बेंगळुरू, गुडगाव अशा शहरांच्या ठिकाणी आले आहेत, त्यांनी रोजगार बंद झाल्यानंतर गावी जाण्यासाठी एकच झुंबड केली. शहरांत असलेल्या शिक्षणाच्या सुविधांमुळे गावाकडून आलेल्या विद्यार्थ्यांचे प्रमाणही आपल्याकडे लक्षणीय आहे. महाविद्यालय, होस्टेल, खानावळ आदी सर्व बंद झाल्यावर या मंडळींच्या रहाण्याची आणि खाण्यापिण्याची सोय कोण करणार होते ? त्यांना प्रवास करून गाव गाठणे भागच पडले. वाहतुकीची साधने बंद झाल्यावर काही मजूर शेकडो किलोमीटर चालत गावाच्या दिशेने प्रवास करत आहेत. प्रशासन आणि जनता दोघेही अगतिक आहेत. ‘प्रवास करू नका’, असे सांगणे, हे प्रशासनाचे कर्तव्य आहे, तर ‘कोरोनाची लागण होण्यापूर्वी भूकबळीने जीवनयात्रा संपू नये’, यासाठी धडपड करणे, ही जनतेची हतबलता आहे. त्यांच्या गावात चांगले शिक्षण नाही, रोजगाराच्या संधी नाहीत, ही त्यांची चूक नाही !

रामायण अनुसरा !

भारतीय स्वातंत्र्यानंतर ब्रिटिशांनी उद्ध्वस्त केलेल्या येथील यंत्रणांचे पुनरुज्जीवनच झाले नाही. पाश्‍चात्त्यांच्या पद्धतीने येथे उद्योग-व्यवसाय उभारले गेले. अर्थव्यवस्था, शिक्षणव्यवस्था असे सगळेच शहरकेंद्रित झाले. शेतीवर भारताची अर्थव्यवस्था अवलंबून असली, तरी त्याच्या विकासासाठी आणि अडचणी सोडवण्यासाठी काही व्यवस्थाच न केल्यामुळे सर्वांचाच शहरांतील नोकर्‍यांकडे कल वाढला आहे. असे असल्यामुळे गावाकडे घर आणि कुटुंबातील दोघे-चौघे शहरात अशी स्थिती सर्वत्र निर्माण झाली आहे. काँग्रेसचे युवराज राहुल गांधी जेव्हा मोदी सरकार करत असलेल्या उपाययोजनांवर टीका करतात, तेव्हा त्यांनी उत्तर द्यायला हवे की, ग्रामीण भागांतील अर्थकारण स्वतंत्र आणि भक्कम होण्यासाठी गेल्या ७० वर्षांत त्यांच्या पक्षाने काय केले ? भारतीय इतिहासाचे अवलोकन करता ग्रामीण भाग आताएवढा दुर्लक्षित कधीच नव्हता. प्रत्येक गावाची स्वतंत्र अर्थव्यवस्था होती. रोटी-बेटी व्यवहारही पंचक्रोशीतच चालत. आता तशी स्थिती राहिली नाही. शहरांच्या विकासाला विरोध नाही; मात्र पाश्‍चात्त्यांचे पाहून केवळ औद्योगिक क्षेत्राला प्रोत्साहन आणि शेती, ग्रामीण भागातील कच्च्या मालावर प्रक्रिया करणारे लघुउद्योग, कुटीरोद्योग यांना दुय्यम प्राधान्य अशा राजकारणात ग्रामीण अर्थव्यवस्था भरडली गेली. मजूर, ग्रामीण कुटुंबे, विद्यार्थी यांच्यावर या दळणवळण बंदीच्या काळात ज्या अडचणी ओढवल्या, हे गेल्या ७० वर्षांतील आपले अपयश आहे. आधीच संकटात असलेल्या आपल्या अर्थव्यवस्थेला कोरोनामुळे मोठा धक्का बसला आहे. या धक्क्यातून सावरतांना ग्रामीण क्षेत्र स्वयंपूर्ण कसे होईल, याकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. रामायणकाळात वर्णन केलेला काळ जितका रम्य होता, तितके रम्य आणि समृद्ध वातावरण आताही निर्माण होणे शक्य आहे. समस्येचे मूळ शोधून दिशाबद्ध पावले उचलल्यास याही स्थितीतून आपण नक्की बाहेर पडू ! ‘रामायण’ आणि ‘महाभारत’ यांचे या काळातील महत्त्व त्यासाठीच आहे ! त्यांचे अनुसरण केल्यास आताच्या काळातील सर्व सदोष यंत्रणांमध्ये प्राण भरणे शक्य आहे !