नवी देहली – पाकिस्तानमध्ये कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून आतापर्यंत १ सहस्र जणांना त्याची लागण झाली आहे, तर ७ जणांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर तेथील दैनिक ‘द डॉन’ने माहिती विश्लेषक ओसामा रिझवी आणि अहसान जाहिद यांनी माहिती विश्लेषक टॉमस प्यूओ यांच्या साहाय्याने एक अहवाल सिद्ध केला आहे. त्यानुसार पाकिस्तानने कोरोनाला आळा न घातल्यास जूनपर्यंत कोरोनाबाधितांची संख्या २ कोटींपर्यंत पोचेल.
या वृत्तात असेही म्हणण्यात आले आहे की,
१. या संकटापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी पाकिस्तानला कठोर निर्णय घ्यावे लागणार आहेत; पण यासाठी सरकारची इच्छाशक्ती आणि जनतेचेही सहकार्य तेवढेच आवश्यक आहे.
२. कोरोनाचा सामना करण्यासाठी पाकिस्तानकडे आवश्यक उपायांची कमतरता आहे. तेथील कर्मचार्यांकडे आवश्यक ती उपकरणेही नाहीत. एवढेच नाही, तर विमानतळावरील कर्मचार्यांजवळ मास्क आणि वैद्यकीय हँडग्लोज हेही नाहीत. पाकिस्तानात रुग्णालये, कोरोना चाचणी (टेस्टिंग) किट, आधुनिक वैद्य आणि औषधे यांची कमतरता आहे. तसेच ‘कोरोना जागतिक महामारी’ घोषित होईपर्यंत पाकिस्तान सरकार ढिम्म होते. (पाकची विदारक स्थिती ! याविषयी भारतातील पाकप्रेमी काही बोलतील का ? पाक सरकारला काही सांगतील का ? या विदारक स्थितीवरून तरी भारतातील पाकप्रेमी नागरिकांचे डोळे उघडणार कि ते अजूनही पाकचे गुणगान करत बसणार ? – संपादक)
पाकमध्ये १ लाख १३ सहस्र कोटी रुपयांचे आर्थिक पॅकेज घोषित
इस्लामाबाद – कोरोनाच्या महामारीपासून वाचण्यासाठी पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी १.१३ ट्रिलियन रुपयांचे (१ लाख १३ सहस्र कोटी रुपयांचे) आर्थिक पॅकेज घोषित केले आहे. त्यांनी कोरोनाविरुद्ध लढा आणि अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी या निधीची घोषणा केली आहे.