महाराष्ट्रातील भक्ती परंपरेचे केंद्रस्थान, म्हणजे पंढरपूरचा पांडुरंग ! हा पांडुरंग, म्हणजे केवळ पाषाणाची मूर्ती नाही, तर साक्षात् परब्रह्म आहे. त्याची प्रचीती शतकानुशतके अनेकांनी घेतली असल्यामुळेच ऊन-पावसाची तमा न बाळगता आजही विठुरायाच्या दर्शनाच्या ओढीने लक्षावधी वारकरी पंढरपूरची वाट धरतात; पण ज्या मूर्तीच्या चरणांवर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर, जगद्गुरु संत तुकाराम महाराज, संत नामदेव यांच्यासह अनेक थोर संतांनी मस्तक टेकवले, त्या मूर्तीचे संवर्धन करण्याच्या नावाखाली आज धर्मशास्त्रातील जाणकार आणि धर्माचार्य यांचे मत विचारात न घेता मूर्तीवर पुन्हा एकदा रासायनिक लेपन करण्याचा अट्टहास केला जात आहे. श्री विठ्ठलाची मूर्ती ही काही केवळ पाषाणाची शोभेची मूर्ती नाही, तर साक्षात् अविनाशी चैतन्यमूर्ती आहे. त्यामुळे मूर्ती संवर्धनाच्या विषयाकडे पाश्चात्त्य दृष्टीतून नाही, तर भक्तीमय दृष्टीने पहायला हवे. हा रसायनाचा नाही, तर भक्तीरसाचा विषय आहे. पुरातत्व विभाग आणि प्रशासन याची नोंद घेणार का, हा खरा प्रश्न आहे.

१. ‘आगम’ ग्रंथांमध्ये दिलेल्या पद्धतीनुसार मूर्तीसंवर्धन का केले जात नाही ?
दक्षिण भारतामध्ये कर्मकांड अधिक प्रमाणात प्रचलित आहे. तेथे काटेकोरपणे ते सांभाळले आणि पाळले जाते. आपल्याकडील ‘आगम’ ग्रंथांमध्ये मूर्तीसंवर्धनाचे विधी आणि त्याविषयीचा सविस्तर तपशील दिला आहे. त्यानुसार शास्त्रोक्त विधी करून दक्षिण भारतातील मूर्तींचे संवर्धन केले जाऊ शकते, तर महाराष्ट्रात का नाही, हा प्रश्न आहे.
दक्षिण भारतात शास्त्रोक्त पद्धतीने मूर्तीचे संवर्धन होऊ शकते, तर महाराष्ट्रात का नाही ?

तिरुपति बालाजी मंदिरामध्ये प्रत्येक १२ वर्षांनी ‘अष्टबंध संप्रोक्षणम्’ हा विधी केला जातो :‘अष्टबंध संप्रोक्षणम्’ विधी –
|
अ. तिरुपति बालाजी मंदिरामध्ये किंवा तमिळनाडूतील प्राचीन चोलकालीन मंदिरामध्ये साधारण प्रत्येक १२ वर्षांनी ‘अष्टबंध संप्रोक्षणम्’ हा विधी केला जातो.
आ. केरळ आणि तमिळनाडू येथील अनेक मंदिरांमध्ये काळ्या पाषाणाच्या मूर्तींच्या संवर्धनासाठी ‘तैलाकाप्पू’ (तेल अभंग) ही प्रक्रिया केली जाते.
इ. कांचीपूरम् येथील एकांबरेश्वर मंदिरातील मुख्य शिवलिंग हे पंचभूतांपैकी ‘पृथ्वी’ तत्त्वाचे प्रतिनिधित्व करते. आख्यायिकेनुसार हे लिंग साक्षात् माता पार्वतीने वाळूपासून बनवले होते. लिंगाचे वाळूचे कण घट्ट एकत्र बांधलेले रहावेत, यासाठी त्यावर नियमितपणे ‘पुनुगु’ (एक नैसर्गिक सुगंधी अर्क) आणि चमेली यांच्या तेलाचा लेप लावला जातो. अशी पारंपरिक संवर्धनपद्धत शतकानुशतके अवलंबली जात असल्याचे मंदिरपरंपरेत मानले जाते.
ई. श्रीरंगम् (तिरुचिरापल्ली) येथील भगवान विष्णूची (रंगनाथाची) महाकाय शेषशायी मूर्ती ही ग्रॅनाईट दगडाची नसून ती ‘सुधाई’पासून बनलेली आहे. सुधाई म्हणजे चुनखडी, नैसर्गिक डिंक, औषधी वनस्पती, लाकडाचा भुसा आदींचे मिश्रण. मूर्तीची संरचना टिकून रहावी आणि हवामानातील आर्द्रतेपासून तिचे संरक्षण व्हावे, यासाठी वर्षातून दोनदा (विशेषतः ज्येष्ठ मासात) ‘तैलाकाप्पू’ विधी केला जातो. यात कापूर, चंदन आणि विशिष्ट औषधी वनस्पती यांपासून सिद्ध केलेले कोमट तेल संपूर्ण मूर्तीला लावले जाते. यामुळे मूर्तीच्या पृष्ठभागाचे संरक्षण होते, आर्द्रता आणि झीज यांचा परिणाम न्यून होतो अन् मूर्तीचे दीर्घकालीन संवर्धन साधले जाते. अशा स्वरूपाची कुठली प्रक्रिया विठ्ठलमूर्तीच्या संदर्भात राबवली जाऊ शकत नाही का ?
२. रासायनिक प्रक्रियेचा अट्टहास का ?
श्री विठ्ठलाच्या मूर्तीची झीज होत असल्यामुळे ती थांबवण्यासाठी म्हणून रासायनिक लेपन प्रक्रियेचा आग्रह धरला जात आहे. यापूर्वी जवळपास ४ वेळा अशा प्रकारे रासायनिक लेपन प्रक्रिया केली गेली होती. शेवटची प्रक्रिया वर्ष २०२० मध्ये ‘कोरोना’ महामारीच्या काळात केली गेली. त्या वेळी हे लेपन पुढे ८-१० वर्षे टिकेल, असे दावे करण्यात आले होते; पण त्या काळात दर्शन बंद असूनसुद्धा अवघ्या ६ वर्षांत पुन्हा एकदा संवर्धन प्रक्रियेची आवश्यकता निर्माण झाली. याचा सरळ अर्थ ‘ही प्रक्रिया सदोष आहे; किंबहुना पांडुरंगाला मान्य नसावी’, असा नाही का ? यामुळे या प्रक्रियेची परिणामकारकता, तिची दीर्घकालीन उपयुक्तता आणि पर्यायी शास्त्रोक्त उपाय यांवर नव्याने विचार करण्याची आवश्यकता निर्माण होते.

३. धर्मपरंपरेचा अभ्यास नसतांना त्याच्याशी संबंधित निर्णय घेण्याचा अधिकार कुणी दिला ?
हा प्रश्न आज भाविकांनी विचारला पाहिजे. साध्या व्यवहारातही ‘स्वतःचा ज्या विषयाचा अभ्यास नाही, त्याविषयी निर्णय घेऊ नये’, हा दंडक पाळला जातो. कुणी डॉक्टरांकडे वकिली ‘केस’ घेऊन गेले, तर ते डॉक्टर त्याला अधिवक्त्याकडे पाठवतील. कुणी अधिवक्त्याकडे इमारत बांधायची आहे म्हणून गेले, तर ते त्याला अभियंत्याकडे पाठवतील. मग धार्मिक क्षेत्रातील निर्णयाच्या संदर्भात पुरातत्व विभाग किंवा प्रशासन धार्मिक अधिकारी व्यक्तींचे मार्गदर्शन का घेत नाही, हा प्रश्न आहे. त्यामुळे ‘पुरातत्व विभाग आणि प्रशासन यांनी आखलेली ही रासायनिक संवर्धन प्रक्रिया किमान स्थगित करून त्यांनी मूर्तीशास्त्रज्ञ, आगमविद्वान, धर्माचार्य आणि संवर्धनतज्ञ यांचे मार्गदर्शन घेऊन पुढील निर्णय घ्यावा’, अशीच भाविकांची अपेक्षा आहे.
४. वादाचे मूळ मंदिराच्या सरकारीकरणात !
या सगळ्या मनमानी कारभाराला मंदिरांचे झालेले सरकारीकरण, हेही महत्त्वाचे कारण आहे. सरकारीकरणामुळेच प्रशासनात धर्मशास्त्राचे अज्ञान असलेले लोक आले आणि त्यांच्या मनमानीतूनच हा रासायनिक लेपनाचा घाट घातला जात आहे. याच सरकारीकरणाचा परिणाम म्हणून देवस्थान समितीची शेकडो एकर भूमी गायब होण्यासह त्यात भ्रष्टाचार झाल्याचे समोर आले होते. सरकार अनेक विभागांचे खासगीकरण करत असतांना ‘केवळ मंदिरांचेच सरकारीकरण का ?’, हा रास्त प्रश्न विचारत भाविकांकडून गेली काही वर्षे मंदिरांच्या सरकारीकरणाच्या विरोधात चळवळ राबवली जात आहे; पण अद्यापही मंदिरांच्या सरकारीकरणाचे पाऊल मागे घेतलेले नाही. देवळात पुजारी कोण असावेत ?, देवावर अभिषेक किती वेळा करावा ?, कुठले मंत्र म्हणावेत, हे प्रशासन कसे ठरवणार ? पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराचे सरकारीकरण झाल्यानंतर जे पुजारी नेमले गेले, त्यांना देवीचे अलंकार कसे घालायचे, हेही ठाऊक नव्हते. रुक्मिणीमातेच्या हातात घालायचे अलंकार ते गळ्यात घालत होते, कपाळावरील कुंकू नखाने खरवडून काढत होते, असा अनुभव सुप्रसिद्ध भागवताचार्यांनी सांगितला होता. हे जर मंदिर सरकारीकरणाचे फळ असेल, तर सरकारीकरणामुळे मंदिराचे सुव्यवस्थापन होत नाही, तर मंदिर संस्कृतीचा र्हास होत आहे आणि म्हणूनच भाविकांनी ‘मंदिरांचे सरकारीकरण रहित करून ती भक्तांच्या स्वाधीन करा’, ही मागणी लावून धरली पाहिजे.

५. बा विठ्ठला, सद्बुद्धी दे !
पांडुरंग हा भक्तांच्या हाकेला धावून जाणारा आहे. त्यामुळे श्रद्धाळू भाविकांच्या वतीने विठ्ठलालाच साकडे आहे, ‘हे पांडुरंगा, तू २८ युगे भक्तांसाठी विटेवर उभा आहेस. तुझ्या मूर्तीसंवर्धनाच्या नावाखाली चालू असलेला हा सर्व सावळागोंधळ तू पहातच आहेस. बा विठ्ठला, आता तूच सर्वांना सद्बुद्धी दे. हिंदु धर्माविषयी जागृती आणि श्रद्धा अधिक दृढ होऊ दे अन् भागवत धर्माची पताका सर्वत्र फडकू दे, हीच तुझ्या चरणी प्रार्थना !’
जय जय रामकृष्ण हरि ।
– श्री. सुनील घनवट, राष्ट्रीय संघटक, मंदिर महासंघ. (१९.६.२०२६)
परस्परावलंबनाचा बोध देणारा ‘योग’ !
राष्ट्रभक्त शास्त्रज्ञ !
ज्येष्ठ मासातील महत्त्वाची व्रते !
स्वातंत्र्यवीर सावरकर यांची रणनीती आणि नेताजी सुभाषबाबूंशी झालेली भेट
पंढरपूर विकासासाठी ३ सहस्र ९९३ कोटी रुपयांच्या महाआराखड्यास प्रशासकीय मान्यता !
कचरा प्रक्रिया सक्तीविरोधात ‘हाऊसिंग सोसायटी फेडरेशन’ आक्रमक