वाखरी पालखी तळ, भक्तीसागर येथे स्वच्छता मोहीम चालू ! – महेश रोकडे, मुख्याधिकारी, पंढरपूर

आषाढी यात्रेसाठी नगरपालिका प्रशासनाची सिद्धता

स्वच्छता करण्यात आलेला वाखरी तळ, तसेच रंगवण्यात आलेली झाडे

पंढरपूर – जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या विविध पालख्यांचे प्रस्थान पंढरपूरच्या दिशेने चालू आहे. लाखोंच्या संख्येने भाविक पालखी सोहळ्यात सहभागी झाले आहेत. या भाविकांना चांगल्या सेवा सुविधा देण्यासाठी नगरपालिकेने वाखरी पालखी तळ, भक्तीसागर ६५ एकरांत स्वच्छता मोहीम राबवली. पंढरपूर परिसरात अत्यावश्यक सेवासुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. पंढरपूर नगरपालिका प्रशासन आषाढी यात्रेसाठी सज्ज झाले असल्याची माहिती मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी दिली.

आषाढी यात्रा एकादशीचा मुख्य सोहळा २५ जुलै या दिवशी साजरा होत आहे. या यात्रेकरिता १८ ते २० लाख भाविक येण्याचा प्रशासनाचा अंदाज आहे. त्यानुसार प्रशासनाने नियोजन करून सिद्धता चालू केली आहे. अतिक्रमणे काढत भाविकांना वाट मोकळी करून देण्यात आली आहे. पाणीपुरवठा, वीज, आरोग्य सुविधा देण्यात येत आहे. वाखरी पालखीतळ येथे सर्वच मानाच्या पालख्यांचा मुक्काम असतो. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी असते. भाविकांना कोणताही त्रास होणार नाही, याची दक्षता नगरपालिकेने घेतली आहे. पाळखीतळ परिसरातील गवत, दगड काढण्यात आले असून संपूर्ण मैदान स्वच्छ करण्यात येत आहे, तसेच मुरूमीकरण करून सपाटीकरणाची कामे चालू आहेत. परिसरातील झाडांना रंग देण्याचे चालू आहे. दगड -गोटे उचलण्यात आले आहेत, अनावश्यक झाडाच्या फांद्या छाटून घेण्यात आल्या आहेत. भक्तीसागर येथे यंत्राच्या साहाय्याने परिसरातील स्वच्छता करण्यात येत आहे. कायमस्वरूपी शौचालय दुरुस्ती, तसेच अन्य सर्वच कामे युद्धपातळीवर चालू आहेत.