‘लाडकी बहीण योजने’तील ९२ लाख चुकीच्या लाभार्थ्यांना वगळले !

मुंबई – ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’तील ३ सहस्र ५४२ कोटी रुपयांच्या खर्चासंदर्भात ‘कॅग’ने ताशेरे ओढले आहेत. ‘लाडकी बहीण योजनेतून ९२ लाख चुकीच्या लाभार्थ्यांना वगळण्यात आले आहे. (चुकीच्या लाभार्थ्यांकडून सव्याज पैसे वसूल करणार का ? एवढे लाभार्थी झालेच कसे ? हे प्रशासनाचे अपयश नाही का ? – संपादक)

६० लाख महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया केलेली नाही. आयकर विभागाने दिलेल्या महिलांची संख्या ५ लाख आहे. घरातल्यांचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा अधिक असलेल्या महिलांची संख्या १४ ते १५ लाख आहे. वाहन नावावर असलेल्या महिलांची संख्या ५ लाख आहे, साडेचार लाख महिलांचे वय ६५ पेक्षा अधिक आहे, अशी माहिती महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. ‘ई-केवायसी करणार्‍या महिलांना लाभ मिळत नाही, अशा काही तक्रारी किंवा निवेदने िमळाली होती, त्याची पडताळणी चालू आहे’, असेही तटकरे यांनी सांगितले. या योजनेत २ कोटी ६३ लाख महिलांची मूळ नोंदणी करण्यात आली होती.

पुरुषांकडून पैसे वसूल करणार ! – आदिती तटकरे

ज्या पुरुषांनी महिला म्हणून लाडकी बहीण योजनेचा अपलाभ घेतला आहे, त्या पुरुषांकडून योजनेचे सर्व पैसे वसूल करण्यात येणार असल्याचे महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.