‘छत्तीसगड येथील ‘पंडवानी’ (टीप) या लोककलेला जागतिक पातळीवर अजरामर करणार्या ज्येष्ठ लोककलाकार पद्मविभूषण डॉ. तीजनबाई यांचे ५ जुलै २०२६ या दिवशी दुःखद निधन झाले. वर्ष २०१९ मध्ये महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संगीत समन्वयक सुश्री तेजल पात्रीकर (आताची आध्यात्मिक पातळी ६० टक्के) यांनी त्यांची भेट घेतली होती. त्या वेळी लक्षात आलेली ‘कै. तीजनबाई यांची गुणवैशिष्ट्ये आणि त्यांचा कलेप्रती असलेला समर्पणभाव’ यांविषयी पुढे दिले आहे.
(टीप : ‘पंडवानी’ ही छत्तीसगडमधील एक पारंपरिक लोककला आहे. ‘पंडवानी’ म्हणजे पांडवांच्या कथा ! पंडवानीत महाभारतातील विविध कथांची ‘गायन, वादन, अभिनय आणि नृत्य’ या माध्यमातून एकल (एकपात्री प्रयोग) प्रस्तुती केली जाते.)

१. ‘पंडवानी’ या लोककलेचे पुनरुज्जीवन करणार्या पहिल्या महिला लोककलाकार कै. तीजनबाई !
तीजनबाई यांचा जन्म वर्ष १९५६ मध्ये छत्तीसगड येथील दुर्ग जिल्ह्यात गनियारी गावात झाला. त्या आदिवासी समाजातील असल्याने त्या काळात महिलांनी ‘पंडवानी’चे कथागायन करणे वर्ज्य होते. अशा परिस्थितीत तीजनबाई यांनी अनेक कठीण प्रसंगांना तोंड देऊन जिद्दीने त्यांच्या आजोबांकडून ‘पंडवानी’ ही लोककला शिकून घेतली. त्यांनी वयाच्या अवघ्या १३ व्या वर्षी पहिल्यांदा रंगमंचावरून ‘पंडवानी’ ही कला सादर केली. त्यानंतर त्यांनी अविरतपणे या कलेचे अनेक मंचांवरून सादरीकरण केले. त्यांनी भारतासह विदेशांतही ‘पंडवानी’ कलेच्या माध्यमातून अत्यंत प्रभावीपणे, कथाकथन शैलीतून आणि भावपूर्ण अभिनयातून महाभारतातील पात्रे जिवंत केली आणि जनसामान्यांना प्रभावित केले. ‘पंडवानी’ या कलेचे पुनरुज्जीवन करणार्या त्या पहिल्या महिला लोककलाकार ठरल्या.
२. ‘पंडवानी’ या लोककलेच्या प्रती दृढ निष्ठा आणि ती कला आत्मसात करण्यासाठी वयाच्या १३ व्या वर्षापासून केलेला अपार संघर्ष !

तीजनबाई लहान असतांना त्यांचे आजोबा त्यांच्या घरी ‘पंडवानी’ लोककलेचे गायन करायचे. त्यांच्या गायनाने तीजनबाई या कलेकडे आकर्षित झाल्या. त्या ७ दिवस लपूनछपून आजोबांचे हे गायन ऐकत होत्या. एक दिवस त्यांच्या आजोबांची दृष्टी त्यांच्यावर पडली. तेव्हा त्यांनी तीजनबाई यांना ‘इथे का उभी आहेस? ’, असे विचारल्यावर त्यांनी आजोबांना ‘‘ही गीते मला आवडतात’’, असे सांगून त्यांच्याकडे ही कला शिकण्याविषयी विचारले. त्या वेळी त्यांच्या आजोबांना अतिशय आनंद झाला आणि त्यांनी तीजनबाई यांना ही कला शिकवायला आरंभ केला. त्या काळी ‘स्त्रियांनी ‘पंडवानी’ गायन करणे’, हे चुकीचे आहे’, असे मानले जात होते. त्यामुळे त्यांच्या समाजातील लोकांनी तीजनबाई यांना अतिशय त्रास दिला. तीजनबाई यांच्या आईनेही त्यांना पुष्कळ विरोध केला. ‘त्या ही कला शिकत आहेत’, या कारणास्तव त्यांच्या आईने त्यांना मारहाण करून घरातून बाहेर काढले. त्यांना अनेक दिवस उपाशी रहावे लागले. ‘‘अशा कठीण स्थितीतही ही कला सादर करण्यासाठी देवच मला बळ देत होता’’, असे कै. तीजनबाई यांनी सांगितले. त्यांची ‘पंडवानी’ या कलेप्रतीची दृढ निष्ठा आणि प्रेम पुढील पिढ्यांना पुष्कळ प्रेरणादायी ठरले. ‘कलेत स्वतःला झोकून देऊन प्रयत्नरत रहाणे’, हे कै. तीजनबाई यांचे वैशिष्ट्य लक्षात आले.
३. अनेक नामवंत पुरस्कारांनी सन्मानित असूनही आणि अनेक विदेश दौरे करूनही अत्यंत साधे जीवन जगणार्या कै. तीजनबाई !
कै. तीजनबाई यांच्या ‘पंडवानी’ या कलेचे कार्यक्रम भारतासह अनेक देशांत मोठ्या प्रमाणात झाले आहेत. त्यानी सादर केलेल्या कलेला लोकांचा प्रतिसादही भरभरून लाभला. त्यांना ‘पद्मश्री’, ‘पद्मभूषण’ आणि ‘पद्मविभूषण’ या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले, तरीही त्यांच्या रहाणीमानात काही पालट झाला नाही. त्यांची रहाणी अतिशय साधी होती.

४. कोणतेही शालेय शिक्षण नसतांना, केवळ कला उपासनेमुळे विद्यावाचस्पती (डॉक्टरेट) ही पदवी मिळणे
कै. तीजनबाई यांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांना ‘अटल बिहारी वाजपेयी विश्वविद्यालय, बिलासपूर’च्या वतीने ‘विद्यावाचस्पती’ (डॉक्टरेट) या पदवीने सन्मानित करण्यात आले होते. त्यांचे शालेय शिक्षण झालेले नसतांनाही त्यांनी केलेल्या कलेच्या उपासनेमुळे त्यांना ही पदवी प्राप्त झाली होती. कै. तीजनबाई यांच्या जीवनातून ‘कलेवरील निष्ठा मनुष्याला कोणत्या स्थितीपर्यंत नेऊ शकते !’, हे लक्षात येते.
‘पंडवानी’ या कलेप्रती असलेला समर्पण भाव आणि ईश्वरावरील दृढ श्रद्धा’ या गुणांमुळे ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठलेल्या पद्मविभूषण कै. डॉ. तीजनबाई !

‘अनेक कठीण प्रसंगांना सामोरे जाऊन कलेप्रतीचा समर्पणभाव जोपासणार्या आणि ईश्वरावर दृढ श्रद्धा ठेवून ‘पंडवानी’ या लोककलेच्या सादरीकरणातून साधनारत राहून समष्टी कार्य करणार्या पद्मविभूषण कै. डॉ. तीजनबाई यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली आहे. ‘लोककलेतूनही साधना कशी करता येते !’ याचा आदर्शच कै. डॉ. तीजनबाई यांनी समाजासमोर ठेवला आहे.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले (१५.७.२०२६)
५. कै. तीजनबाई यांच्या कलेतील समरसतेमुळे कलाकार आणि प्रेक्षक यांच्यात भाषेचे बंधन न रहाणे
त्या जगभरात कुठेही गेल्या, तरीही त्या ‘छत्तीसगढी’ या त्यांच्या मातृभाषेतच ‘पंडवानी’ या कलेचे सादरीकरण करत असत. त्या ‘पंडवानी’ या कलेशी पूर्ण समरस झालेल्या होत्या. त्यामुळेच त्यांच्याकडून महाभारतातील भूमिका हुबेहुब वठवल्या जात असत. त्यांच्या सादरीकरणाच्या शैलीतून, भावातून, अभिनयातून त्यांची कला प्रेक्षकांपर्यंत पोचत असे. त्यामुळेच त्या म्हणाल्या होत्या, ‘‘मला विदेशात ही कला सादर करतांनाही कधीच भाषेचे बंधन जाणवले नाही.’’
‘पंडवानी’ ही लोककला सादर करतांना प्रेक्षकांना खिळवून ठेवणार्या पद्मविभूषण ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. डॉ. तीजनबाई !
‘मी मुंबई विद्यापिठात लोककलेचे प्रशिक्षण घेत असतांना माझा आदरणीय कै. तीजनबाई यांच्याशी संपर्क आला. त्या पुष्कळ प्रेमळ आणि मनमिळावू स्वभावाच्या होत्या. त्यांची कला प्रत्यक्ष पहाण्याचे भाग्य मला लाभले. ‘महाभारतातील कोणतीही कथा एकट्याने सादर करणे’, हेच एक मोठे आव्हान आहे; मात्र कै. तीजनबाई एकट्याने सर्व भूमिका अशा हुबेहुब वठवत असत की, प्रेक्षक खिळून रहात असत.

१. कै. तीजनबाईंच्या पेशीपेशीत ‘पंडवानी’ ही कला भिनली असणे
‘पंडवानी’ या कलेच्या सादरीकरणात रंगमंचावर पुढे एक प्रमुख कलाकार असतो आणि त्याला साथ करणारे अन्य कलाकार वाद्यवृंदासह मागे बसलेले असतात. हे ‘एकल’ (एकपात्री प्रयोग) सादरीकरण असते. त्यामुळे संपूर्ण प्रयोग यशस्वीरित्या सादर करण्याचे सर्वांत अधिक दायित्व मुख्य कलाकाराचे असते. कै. तीजनबाईंच्या जणू पेशीपेशीत ही कला भिनली होती.
२. कै. तीजनबाई ‘कापालिक शैलीत’ गात असतांना त्यांचा अभिनय प्रेक्षकांना त्या पात्रावर विश्वास ठेवायला भाग पाडत असणे
कै. तीजनबाई ‘कापालिक शैली’ (उभे राहून, तंबोरा वाजवत नृत्य आणि अभिनय यांच्या सहित कला सादर करण्याची शैली) च्या ‘पंडवानी’ कलाकार होत्या. त्या ‘कापालिक शैलीत’ गातांना तंबोर्याला कधी अर्जुनाचे धनुष्य, तर कधी भीमाची गदा बनवत आणि त्यांच्याकडून हे पुष्कळ सहजतेने घडत असे. ‘अभिनयातील ‘टू मेक बिलिव्ह’ (विश्वास ठेवायला लावणे) या तंत्रात लोककलाकार कसे निष्णात असतात !’, हे मला कै. तीजनबाईंनी केलेल्या सादरीकरणातून अनुभवता आणि शिकता आले.

३. कै. तीजनबाईंना रंगमंचावर कला सादर करतांना पहाणे, म्हणजे जणू नवरसांची उधळणच अनुभवणे
महाभारतातील ‘भीम’ हा छत्तीसगढी ‘पंडवानी’ या लोककलेचा नायक आहे. भीमाची भूमिका सादर करतांना कै. तीजनबाईंचे बाईपण कधीच आड आले नाही, उदा. कीचकवध करणारा भीम रंगवतांना तीजनबाईंच्या ठिकाणी तो संतापलेला, महाकाय, शक्तीशाली कीचकावर गदेचा प्रहार करणारा भीमच दिसत असे. त्या वेळी प्रेक्षकांच्या अंगावर शहारे येत असत. कै. तीजनबाईंना रंगमचावर पहाणे, म्हणजे जणू नवरसांची उधळणच अनुभवणे होते, हेच खरे !
मी ही सूत्रे लिहीत असतांना माझी पुष्कळ भावजागृती होत होती. ‘गुरुदेवा (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले), आपणच आम्हा साधकांना कला आणि कलाकार यांच्याकडे पहाण्याची दैवी दृष्टी दिली. आपणच हे सर्व लिहून घेतले’, त्याबद्दल मी आपल्या कोमल चरणी भावपूर्ण कृतज्ञता व्यक्त करते.’
– सौ. शुभांगी शेळके, एम्.ए. नाट्यशास्त्र, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (११.७.२०२६)
६. कै. तीजनबाई यांची भगवंतावरील दृढ श्रद्धा आणि भक्ती !
कै. तीजनबाई म्हणतात, ‘‘ईश्वराची आराधना केल्याविना कलाकार कलेच्या क्षेत्रात पुढे जाऊ शकत नाही. प्रेक्षक हे भगवंतस्वरूप आहेत. माझ्यात प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याचे सामर्थ्य नाही, ते भगवंताकडे आहे.’’ त्यांनी सांगितले, ‘‘भगवंतच मला पंडवानी कलेविषयी ‘हे तुला करायचे आहे’, असे सर्व चित्ररूपाने दाखवत असे.’’ एकदा त्यांना स्वप्नात एका बालकाच्या रूपात देवतेचे दर्शनही झालेले होते. यातून त्यांची भगवंतावर असलेली दृढ श्रद्धा आणि भक्तीभाव लक्षात येतो.
| 🪕Pandwani की महान गायिका Teejan Bai की Ansuni Gatha | Chhattisgarh Famous Personalities See Positive
(सौजन्य : See Positive) |
त्या म्हणाल्या होत्या, ‘‘मला ही कला सादर करत असतांना देवाची शक्ती अनुभवता येते. मी शाळेत जाऊन शिक्षण घेतले नाही; मात्र मला ईश्वराने जो कलारूपी प्रसाद दिला आहे, तोच घेऊन मी पुढे चालत राहिले. प्रत्येक वेळी रंगमंचावर जाण्यापूर्वी मी भगवंताला प्रार्थना करते, ‘माझ्याकडे शक्ती नाही. मी जे काही करायला जाणार आहे, ते तुम्हीच जाणता. तुम्हीच करून घ्या.’ मी प्रार्थनेविना काही करू शकत नाही. ‘भगवंतच मला शक्ती देत आहे आणि कार्यक्रम करून घेत आहे’, असेच मी अनुभवले.’’
कै. तीजनबाई यांनी ‘पंडवानी’ या लोककलेच्या माध्यमातून समाजात ईश्वरभक्तीचा प्रसार करण्याचे समष्टी सेवाकार्यच निरपेक्षपणे केले. हेच त्यांच्या जीवन प्रवासातून लक्षात येते. अशा कला उपासक जिवाच्या चरणी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली !’
– सुश्री तेजल पात्रीकर (आध्यात्मिक पातळी ६० टक्के), संगीत समन्वयक, संगीत विशारद, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (११.७.२०२६)
संस्कृत भाषेचे अनन्यसाधारण महत्त्व !
‘काशीविश्वनाथ सुसज्ज महामार्गा’च्या विकासाआड येणारी याचिका उत्तरप्रदेश उच्च न्यायालयाकडून असंमत !
कल्पनेद्वारे नकारात्मकतेला सकारात्मकतेमध्ये पालटणे !
व्याज ‘हराम’; पण लाभ हलाल ?
वारकरी संप्रदायातील घुसखोर ओळखा !
‘इंडो-पॅसिफिक’ क्षेत्र : २१व्या शतकातील जागतिक समृद्धी आणि सुरक्षा यांची चावी !