Chhattisgarh Mandir Mahasangh : मंदिरांचे रक्षण आणि सुव्यवस्था यांसाठी ‘मंदिर महासंघ छत्तीसगड’ची स्थापना

मंदिर महासंघाचा छत्तीसगड राज्यात कार्यविस्तार

डावीकडून श्री. परवेश तिवारी, पू. नीलकंठ त्रिपाठी महाराज, सर्वश्री मदनमोहन उपाध्याय, सुनील घनवट, आशीष परिदा आणि श्री. हेमंत कानस्कर

रायपूर (छत्तीसगड) – महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आदी राज्यांत मंदिरांचे प्रभावी संघटन उभे केल्यानंतर आता छत्तीसगड राज्यातही मंदिर महासंघाची स्थापना करण्यात आली आहे. वैशाख शुक्ल तृतीया, म्हणजे अक्षय तृतीया या पवित्र मुहूर्तावर १९ एप्रिल २०२६ या दिवशी मंदिर महासंघाची औपचारिक स्थापना करण्यात येणार आहे.

मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक श्री. सुनील घनवट यांच्या उपस्थितीत ८० हून अधिक मंदिर विश्वस्त, पुजारी आणि अर्चक (देवतेची शास्त्रशुद्ध, आगमशास्त्रनुसार नियमित सेवा करणारी व्यक्ती) यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मंदिर महासंघ छत्तीसगडच्या रायपूर जिल्हा संयोजकपदी श्री. मदनमोहन उपाध्याय आणि सहसंयोजकपदी श्री. परवेश तिवारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही माहिती रायपूर प्रेस क्लबमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत श्री. सुनील घनवट आणि श्री. मदनमोहन उपाध्याय यांनी दिली. या पत्रकार परिषदेत सहसंयोजक श्री. परवेश तिवारी, हिंदु जनजागृती समितीचे श्री. कमल बिस्वाल, श्री. हेमंत कानस्कर, श्री. आशीष परिदा, तसेच नीलकंठेश्वर महादेव मंदिराचे पू. नीलकंठ त्रिपाठी महाराज उपस्थित होते.

संपूर्ण राज्यात मंदिरांना जोडण्याचा उपक्रम

श्री. मदनमोहन उपाध्याय यांनी सांगितले की, छत्तीसगडमध्ये मंदिरांचे संघटन बळकट करण्यासाठी स्थानिक पातळीवर काम चालू झाले आहे. याअंतर्गत संपूर्ण राज्यात व्यापक संपर्क मोहीम राबवून मंदिरांचे विश्वस्त आणि पुजारी यांच्या भेटी घेतल्या जात आहेत. या मोहिमेला अधिक गती देण्यासाठी जून महिन्यात भव्य मंदिर न्यास परिषद आयोजित करण्यात येणार असून राज्यातील सर्व मंदिरांना एकत्र जोडून त्यांच्या रक्षणासाठी प्रयत्न केले जातील. मंदिर महासंघाने राज्यातील सर्व मंदिर प्रतिनिधींना या धर्मकार्यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

मठ आणि मंदिर यांच्या संरक्षणासाठी महत्त्वाचे पाऊल

पू. नीलकंठ त्रिपाठी महाराज यांनी नमूद केले की, महाराष्ट्रात ज्या प्रकारे मंदिर महासंघाद्वारे मठ, मंदिरे आणि परंपरा यांचे संरक्षण करण्यासाठी प्रभावी संघटन उभे राहिले आहे, त्याचप्रमाणे छत्तीसगडमध्येही हे कार्य चालू झाले आहे. मंदिर महासंघ छत्तीसगड राज्यातील मठ आणि मंदिर यांच्या सुरक्षेसाठी, तसेच मंदिरांना सनातन धर्माच्या प्रसाराचे केंद्र बनवण्यासाठी कार्य करणार असून संत समाजाचा या उपक्रमाला पूर्ण पाठिंबा राहील.

महासंघाचे उद्दिष्ट आणि मागण्या

१. मंदिर महासंघाच्या उद्दिष्टांनुसार सरकारी नियंत्रणाखालील मंदिरांना मुक्त करून ते भक्तांच्या नियंत्रणात देणे, मंदिरांचा पावित्र्य राखण्यासाठी वस्त्रसंहिता लागू करणे आणि मंदिर संस्कृतीवर होणार्‍या आघातांना घटनात्मक मार्गाने उत्तर देणे यासाठी कार्य केले जाईल.

२. मंदिरे आणि मठ यांच्या भूमीवर झालेले अतिक्रमण मुक्त करण्यासाठी कठोर ‘अँटी लँड ग्रॅबिंग’ कायदा लागू करण्याची, वक्फ बोर्डाने अवैधपणे कह्यात घेतलेल्या मंदिरांची भूमी मुक्त करण्याची आणि भक्तांनी दान दिलेल्या भूमीवरील मुद्रांक शुल्क पूर्णपणे रहित करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

३. राज्यात मंदिरांचे विश्वस्त आणि पुजारी यांच्यासाठी विशेष प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करून मंदिर व्यवस्थापन आणि धार्मिक विधी शास्त्रानुसार पार पाडले जातील, यासाठी मंदिर महासंघ छत्तीसगड पुढील काळात कार्य करणार आहे.