घराघरांत रामराज्य आले की, देशात रामराज्याची स्थापना होईल ! – श्रीमद् विद्याधीश तीर्थ श्रीपाद वडेर स्वामीजी

श्रीमद् विद्याधीश तीर्थ श्रीपाद वडेर स्वामीजी यांची सनातन आश्रमाला मंगलमय भेट !

श्रीमद् विद्याधीश तीर्थ श्रीपाद वडेर स्वामीजी यांच्या आगमनप्रसंगी स्वागत करतांना सनातनचे साधक आणि समवेत सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस

रामनाथी (गोवा) – ‘रामरूपी रामरंगी । दर्शनाची हीच संधी । दर्शनाची हीच संधी ॥’ सनातन संस्थेचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराजांच्या या भजनपंक्ती सनातन आश्रमातील सर्व साधकांनी ‘याचि देही याचि डोळा’ अनुभवल्या. गोव्यातील अतीप्राचीन (५५० वर्षे पुरातन) श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठाचे २४ वे पू. पीठाधिपती आणि श्रीरामाचे नि:स्सीम भक्त श्रीमद् विद्याधीश तीर्थ श्रीपाद वडेर स्वामीजी यांचा येथील सनातनच्या आश्रमाला मंगल चरणस्पर्श झाला.

श्रीमद् विद्याधीश तीर्थ श्रीपाद वडेर स्वामीजी यांच्याशी संवाद साधतांना पू. पृथ्वीराज हजारे आणि श्री. चेतन राजहंस

या मंगलप्रसंगी सनातनचे संत पू. पृथ्वीराज हजारे यांनी त्यांचे भावपूर्ण स्वागत केले. पू. स्वामीजींनी आश्रमाद्वारे चालू असलेले धर्मप्रसाराचे कार्य अत्यंत आस्थेने आणि जिज्ञासेने जाणून घेतले. आश्रम पाहिल्यानंतर पू. स्वामीजींनी साधकांना ईशभक्तीचे महत्त्व सांगतांना अनमोल मार्गदर्शन केले. पू. स्वामीजी म्हणाले की, प्रत्येकाच्या घरात रामराज्य स्थापित झाले पाहिजे. असे झाले की, सर्व राज्यांमध्ये आणि संपूर्ण देशात रामराज्याची स्थापना होईल.

सनातन आश्रमाने असा अनुभवला पू. स्वामीजींचा दर्शनसोहळा !

मार्गदर्शन करतांना श्रीमद् विद्याधीश तीर्थ श्रीपाद वडेर स्वामीजी

१. सनातन संस्थेचे व्यवस्थापकीय विश्‍वस्त श्री. वीरेंद्र मराठे यांनी पू. स्वामीजींना श्री रामनाथ देवस्थान येथील त्यांच्या मठामध्ये जाऊन आश्रमभेटीला येण्याची प्रार्थना केली.

२. १७ फेब्रुवारीच्या सायंकाळी मंगलमय वातावरणात पू. स्वामीजी यांचे आश्रमाच्या प्रवेशद्वारावर दुतर्फा उभे असलेल्या साधकांनी स्वागत केले. सनातनचे साधक श्री. गिरिजय प्रभुदेसाई यांनी पू. स्वामीजींचे पाद्यपूजन केले.

३. यानंतर सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस आणि सनातनचे साधक श्री. निषाद देशमुख यांनी पू. स्वामीजींना आश्रमात होत असलेल्या राष्ट्र आणि धर्म प्रसाराच्या कार्याविषयी अवगत केले. पू. स्वामीजींनी सनातन संस्थेच्या प्रसारकार्याचा विषय आत्मीयतेने आणि जिज्ञासेने जाणून घेतला.

श्रीमद् विद्याधीश तीर्थ श्रीपाद वडेर स्वामीजी यांना कला विभागाची माहिती सांगतांना श्री. निषाद देशमुख

४. पू. स्वामीजींनी साधकांना साधनेविषयी अमूल्य मार्गदर्शन केले. त्यांच्या मंगलहस्ते उपस्थित साधकांना प्रसाद दिला. या सोहळ्याला भारताचार्य पू. (प्रा.) सु.ग. शेवडे यांचीही वंदनीय उपस्थिती लाभली.

५. पू. स्वामीजींच्या समवेत श्री रामनाथ देवस्थान समितीचे अध्यक्ष श्री. वल्लभ कुंकळ्ळीकर, समितीचे विधी सल्लागार अधिवक्ता राजेश तळावलीकर, समितीचे सदस्य श्री. संजीव बाले आणि श्री. रुद्र कापडी, तसेच श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठाचे गुरुजी श्री. संतोष आचार्य आणि श्री. वसंत आचार्य उपस्थित होते.

पू. स्वामीजींनी ‘सनातन प्रभात’चे कार्य बारकाव्यांनिशी जाणून घेतले !

श्रीमद् विद्याधीश तीर्थ श्रीपाद वडेर स्वामीजी यांना ‘सनातन प्रभात’चे कार्यालय दाखवतांना श्री. निषाद देशमुख, समवेत श्री. संतोष आचार्य

पू. स्वामीजींनी ‘सनातन प्रभात’ प्रसारमाध्यम समूहाच्या कार्याविषयी सर्व माहिती विस्ताराने आणि जिज्ञासेने जाणून घेतली. ‘सनातन प्रभात’ कोणकोणत्या भाषांत प्रकाशित होते, त्याची छपाई, वितरण, तसेच साधक कशा प्रकारे नि:स्वार्थ रूपाने सेवा करतात आदी गोष्टींविषयी त्यांनी सविस्तरपणे जाणून घेऊन साधकांना आशीर्वाद दिले.

‘सनातन प्रभात’चे समूह संपादक श्री. योगेश जलतारे, तसेच कन्नड ‘सनातन प्रभात’चे उपसंपादक श्री. प्रशांत हरिहर यांच्याशीही पू. स्वामीजींनी संवाद साधला.

भावपूर्ण वातावरणात पार पडला सन्मान सोहळा !

आश्रमदर्शनानंतर स्वामीजींनी साधकांना मार्गदर्शन केले, या वेळी आरंभी पू. स्वामीजींचे गुरु आणि श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठाचे २३ वे पू. पीठाधिपती श्रीमद् विद्याधिराज तीर्थ स्वामीजी यांच्या पादुकांचे सनातनचे साधक दांपत्य डॉ. पांडुरंग मराठे आणि सौ. मंगला पांडुरंग मराठे यांनी वेदमंत्रोच्चारांच्या गजरात धर्मशास्त्रीय पूजन केले.

तसेच श्रीमद् विद्याधीश तीर्थ श्रीपाद वडेर स्वामीजींची पंचारती केली. यानंतर सनातनचे संत पू. पृथ्वीराज हजारे यांनी श्रीमद् विद्याधीश तीर्थ श्रीपाद वडेर स्वामीजींचा भावपूर्ण सन्मान केला. तसेच श्री रामनाथ देवस्थानाच्या सर्व पदाधिकार्‍यांचाही श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन सत्कार केला. पू. स्वामीजींनी या वेळी उपस्थित साधकांना मार्गदर्शन केले, तसेच प्रत्येक साधकाला प्रसाद दिला.

सनातन संस्था समाजात जागृती करण्याचे महत्कार्य करत आहे ! – श्रीमद् विद्याधीश तीर्थ श्रीपाद वडेर स्वामीजींचे आशीर्वचन

मार्गदर्शन करतांना श्रीमद् विद्याधीश तीर्थ श्रीपाद वडेर स्वामीजी

पू. स्वामीजी साधकांना आशीर्वचन देतांना म्हणाले,

१. सनातन संस्था धर्मप्रसारास कटीबद्ध !

सनातन संस्था धर्मप्रसारास कटीबद्ध आहे. यामुळे जीवनात संतुष्टता निर्माण होते. जीवन दोन प्रकारे जगता येते. एक स्वत:ला आनंद देऊन आणि दुसरे इतरांना आनंद देऊन. सनातन धर्म आपल्याला इतरांना आनंद देण्यासाठी प्रयत्नरत असल्याची शिकवण देतो. सनातन संस्थाही समाजात जागृती करण्याचे महत्कार्य करत असून समाजात आनंद निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत आहे.

२. दुसर्‍याला आनंद देण्यासाठी प्रयत्नरत रहा !

‘दुसर्‍याचा विचार कसा करावा ?’, या संदर्भात एका बोधप्रद कथेच्या माध्यमातून पू. स्वामीजींनी विवेचन केले. यातून दुसर्‍याचा विचार आणि दुसर्‍याला आनंद देण्यासाठी आपण प्रयत्नरत असले पाहिजे, असे सांगत स्वत:च्या नावासाठी जगू नका, तर इतरांसाठी जगा, असा संदेशही पू. स्वामीजींनी दिला.

३. भगवद्भक्ताला कुणी त्रास देत नाही !

लौकिकदृष्ट्या जर जिल्हाधिकारी किंवा पोलीस प्रमुख एखाद्याच्या परिचयाचे असतील, तर कुणी त्रास देत नाही. तद्वतच जर साधक भगवंताची भक्ती करत असेल, तर कुणी अशा साधकाला त्रास द्यायला जात नाही. जर साधकाला त्रास दिला आणि त्याने भगवंताला प्रार्थना केली की, ‘माझे रक्षण कर’, तर भगवंत त्याचे रक्षण करतांना त्याचे अहित करणार्‍याला शासन करतो. त्यामुळेच भगवद्भक्ताला कुणी त्रास देत नाही.

अन्य एका कथेचे सुंदर विवेचन करत पू. स्वामीजींनी ‘साधकांनी भगवंताची भक्ती वाढवली, तर भगवंत आपले रक्षण करतो’, असे साधकांच्या मनावर बिंबवले.

४. साधकांनो, भगवंताच्या चरणांप्रती आसक्ती वाढवा !

साधकांनी सतत ईश्‍वराच्या जवळ रहाण्याचा प्रयत्न करावा. भगवंताच्या चरणांप्रती आसक्ती वाढवा. भगवंताप्रती मनोभाव जागृत झाला की, जीवनातील अडचणी सुटतात. तसेच यामुळे अन्यांची आपल्याप्रतीची सकारात्मकताही वाढते. साधकांवर भगवंताचा कृपाशीर्वाद सतत राहो. त्यांचे कष्ट दूर होवो, अशी श्रीराम आणि श्री वीरविठ्ठल यांच्या चरणी प्रार्थना करतो.

क्षणचित्रे

१. श्रीमद् विद्याधीश तीर्थ श्रीपाद वडेर स्वामीजींचे आश्रमात आगमन होण्याआधी आश्रमाच्या ध्वनीक्षेपक यंत्रणेवर प्रभु श्रीरामावर आधारित भजने लावण्यात आली होती. त्यामुळे संपूर्ण आश्रम परिसर राममय झाला होता.

२. पू. स्वामीजींचे भावपूर्ण स्वागत करणारा स्वागत फलक सर्वांचे लक्ष वेधून घेत होता.

३. आश्रमात रांगोळ्या काढून सुशोभीकरण करण्यात आले होते.

श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठाला नुकतीच ५५० वर्षे पूर्ण !

श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठाला नुकतीच ५५० वर्षे पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने २८ नोव्हेंबर २०२५ या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते मठाच्या परिसरातील श्रीरामाच्या ७७ फूट उंच कांस्य धातूच्या भव्य मूर्तीचे अनावरण करण्यात आले होते. या कार्यक्रमाला गोवा, महाराष्ट्र, कर्नाटक, तसेच अन्य ठिकाणांहून सहस्रावधी भक्त उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते मठाच्या परिसरात अनावरण करण्यात आलेली श्रीरामाची ७७ फूट उंच कांस्य धातूची भव्य मूर्ती !

इथे वाचा सविस्तर वृत्त

Goa PM Modi : विकसित भारतासाठी अध्यात्म, राष्ट्रसेवा आणि विकास यांचा समन्वय आवश्यक !