Goa PM Modi : विकसित भारतासाठी अध्यात्म, राष्ट्रसेवा आणि विकास यांचा समन्वय आवश्यक !

  • पर्तगाळी मठाच्या ५५० व्या वर्षपूर्ती सोहळ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन

  • श्रीरामाच्या ७७ फूट उंच कांस्य धातूच्या मूर्तीचे अनावरण

पर्तगाळी मठाच्या ५५० व्या वर्षपूर्ती सोहळ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, श्रीमद् विद्याधीश तीर्थ श्रीपाद वडेर स्वामीजी, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि इतर मान्यवर

काणकोण (गोवा), २८ नोव्हेंबर (वार्ता.) : गोव्यातील मंदिरे, संस्कृती आणि भाषा यांवर अनेकदा आक्रमणे झाली, तरीही या संकटांना सामोरे जात गोमंतकियांनी मूळ संस्कृती टिकवून ठेवली आहे.

श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठ हा ऊर्जेचा स्रोत असून त्याने लोकांना एकत्र आणण्याचे काम केले आहे.

या मठाने आध्यात्मिक परंपरा टिकवून ठेवत समाजाला विनम्रता, सेवा आणि संस्कार यांद्वारे जोडून ठेवले आहे. मठाने प्रत्येक समाजघटकाला आश्रय दिला आहे.

गोव्यावर जेव्हा कठीण काळ आला, तेव्हा मठाने लोकांना साहाय्य केले. गोवा ही आध्यात्मिक शक्ती आहे आणि भारताची दक्षिण काशी आहे. ‘विकसित भारत २०४७’चे स्वप्न साकार करण्यासाठी अध्यात्म, राष्ट्रसेवा आणि विकास या तिन्ही गोष्टींचा समन्वय असणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

तत्पूर्वी श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठाच्या ५५० व्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्रीरामाच्या ७७ फूट उंच कांस्य धातूच्या भव्य मूर्तीचे अनावरण करण्यात आले. या सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अध्यात्म, इतिहास, संस्कृती आणि विकास यांविषयी मत व्यक्त केले. या सोहळ्यात व्यासपिठावर श्रीमद् विद्याधीश तीर्थ श्रीपाद वडेर स्वामीजी, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू, केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत, क्रीडामंत्री रमेश तवडकर, मठाच्या केंद्रीय समितीचे अध्यक्ष श्रीनिवास धेंपो आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमात स्वागत मठाचे अध्यक्ष श्रीनिवास धेंपो यांनी केले. कार्यक्रमाच्या पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मठात जाऊन देवदर्शन केले. मठाच्या ५५० व्या वर्षपूर्तीनिमित्त २७ नोव्हेंबर ते ७ डिसेंबर या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या मठाच्या परिसराचे पूर्णपणे नूतनीकरण करण्यात आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले,

‘‘पालटलेल्या परिस्थितीत पर्तगाळी मठाने सेवाकार्य चालू ठेवतांना त्याची दिशा पालटलेली नाही. याउलट मठाने लोकांना योग्य दिशा देण्याचे कार्य केले. गोव्याची भूमी ही माझ्या जीवनात कलाटणी आणणारी भूमी ठरली आहे. गोव्याच्या भूमीने मला या पदापर्यंत पोचवले. गोव्याने दरडोई उत्पन्न, पर्यटन क्षेत्र आणि पायाभूत विकास यांमध्ये प्रगती साधली आहे. गोव्याच्या पवित्र भूमीला शतकांची आध्यात्मिक परंपरा लाभली आहे. विकसित भारताचा मार्ग एकतेतून जातो. पर्यटनाचा प्रमुख भाग असलेल्या गोवा राज्याची आणि आध्यात्मिक कार्य करणार्‍या श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी ‘विकसित भारत २०४७’च्या ध्येयात महत्त्वाची भूमिका रहाणार आहे.’’

मठाने आध्यात्मिक परंपरेचा वारसा चालवला ! – मुख्यमंत्री प्रमोद सावंत

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, ‘‘श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठाने ५५० वर्षे हिंदु धर्मासाठी कार्य केले आहे. यापूर्वी गोव्यावर अनेकांनी राज्य केले. यातील काही जणांनी येथील संस्कृती आणि मंदिरे नष्ट करण्याचा प्रयत्न केला, तरीही आपली संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज यांद्वारे मठाने धर्मरक्षणाचे कार्य केले आहे. मठाने आध्यात्मिक परंपरेचा वारसा चालवलेला आहे.

५५० कोटी श्रीरामनामजप करणार्‍या भक्तांचे मी आभार मानतो. दक्षिण अयोध्या असलेला पर्तगाळी मठ आज अभिनंदनास पात्र आहे. मठ संस्कृती, भजन संस्कृती, वारीची परंपरा असलेला गोवा एक आध्यात्मिक केंद्र असल्याचे दर्शवतो. गोव्याचा आध्यात्मिक आणि धार्मिक वारसा पुढे नेण्याचे कार्य गोवा सरकार करत आहे. गोवा ही परशुरामभूमी आहे. नार्वे, डिचोली येथील छत्रपती शिवाजी महाराज यांनी बांधलेल्या श्री सप्तकोटेश्वर मंदिराचा गोवा सरकारने जीर्णाेद्वार केला आहे.

पोर्तुगिजांनी गोव्यातील १ सहस्राहून अधिक मंदिरे नष्ट केली. या मंदिरांच्या पुनर्बांधणीसंबंधी एक प्रतिकृती म्हणून गोवा सरकार दिवाडी बेटावर ‘कोटीतीर्थ कॉरिडोअर’ बांधणार आहे. ‘विकसित गोवा २०३७’ हे साध्य करण्यासाठी साधनसुविधा आणि मनुष्य यांचा विकास करण्यात येत आहे. याबरोबरच गोव्याचा आध्यात्मिक विकास होऊ लागला आहे. यापुढे श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठ गोव्यातील पर्यटनाचे एक महत्त्वाचे केंद्र बनणार आहे.’’

या सोहळ्याला गोव्यासह, कर्नाटक, महराष्ट्र आणि इतर राज्यांतून भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. गोवा पोलिसांनी सुरक्षेसाठी सुमारे १ सहस्र पोलीस नेमले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ‘धर्मपुत्र’ ! – श्रीमद् विद्याधीश तीर्थ श्रीपाद वडेर स्वामीजी

याप्रसंगी श्रीमद् विद्याधीश तीर्थ श्रीपाद वडेर स्वामीजी म्हणाले, ‘‘देशाचे पंतप्रधान आणि स्वत:ला ‘प्रधान सेवक’ असे संबोधणारे नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमुळे आजचा दिवस हा मठाच्या इतिहासामध्ये सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी चातुर्मास व्रताचे एकभुक्त राहून पालन करतात आणि नवरात्रामध्ये उपवासही करतात. ही एक उल्लेखनीय गोष्ट आहे. पंतप्रधानांनी अयोध्येत रामल्लाच्या मंदिराची उभारणी केली आणि दक्षिण अयोध्येत (पर्तगाळी मठ येथे) प्रभु श्रीरामाच्या प्रतिमेचे अनावरण केले. त्यांचे कार्य हे भगवान श्रीकृष्णाप्रमाणेच आहे आणि यासाठी ते खर्‍या अर्थाने ‘धर्मपुत्र’ आहेत.’’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मठाच्या ५५० व्या वर्धापनदिनानिमित्त ५५० रुपयांच्या नाण्याचे लोकार्पण करण्यात आले. या नाण्याचे वजन ३५ ग्रॅम आहे आणि त्यामध्ये ५० टक्के चांदी, ४० टक्के तांबे, ५ टक्के जस्त आणि ५ टक्के निकेल या धातूंचा समावेश आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मठ अनुयायांकडे पुढील ९ संकल्पांचा केला आग्रह

जलसंरक्षण, पर्यावरणाचे रक्षण, स्वच्छता मोहिमेला नित्यसवयीचा भाग बनवणे, स्वदेशीचा अंगीकार करणे (व्होकल फॉर लोकल), देश दर्शन करणे (देशाचे विविध प्रांत पहाणे), नैसर्गिक शेतीवर भर देणे, कृणधान्याचा वापर करणे, जेवणात तेलाचा वापर १० टक्क्यांनी घटवणे, आरोग्यदायी जीवनशैलीचा अंगीकार करणे, योग साधना आणि खेळ यांचा अंगीकार करणे अन् कोणत्याही मार्गाने गरिबांची सेवा करणे. पर्तगाळी मठाच्या ५५० व्या वर्षपूर्ती सोहळ्याच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते टपाल तिकिटाचे अनावरण करण्यात आले.