१ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक असलेला प्रकल्प प्रस्तावित

देवगड – तालुक्यातील मुणगे गावात ‘नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पाेरेशन’चा (‘एन्.टी.पी.सी.’चा) भव्य अणूऊर्जा प्रकल्प प्रस्तावित आहे. या प्रकल्पासाठी १ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक राज्य सरकारने केली आहे. नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत ग्रामस्थांनी या प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शवून प्रकल्पाच्या विरोधात ठरावही घेतला आहे.
मुणगे गाव आणि आसपासच्या परिसरात भूमीची मोजणी अन् आरेखनाचे काम चालू झाल्याचे आढळून आल्यानंतर ग्रामस्थांनी विरोधाची भूमिका तीव्र केली आहे. त्या अनुषंगाने ग्रामसभा घेण्यात आली होती.
हा प्रकल्प केवळ मुणगे गावासाठीच नव्हे, तर संपूर्ण देवगड तालुक्यासह जिल्ह्याच्या पर्यावरणासाठी अत्यंत घातक आहे. या प्रकल्पामुळे सिंधुदुर्ग हे राज्याचे ऊर्जा केंद्र बनणार असले, तरी या प्रदूषणकारी प्रकल्पामुळे मुणगे गावाची, तसेच देवगड तालुक्यासह जिल्ह्याचीही मोठी हानी होणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाला स्थानिकांसह कोकणवासियांनी तीव्र विरोध दर्शवला आहे.
‘स्थानिकांना विश्वासात न घेता हा प्रकल्प राज्य सरकार लादत असून हा प्रकल्प त्वरित रहित करावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल’, अशी चेतावणी ग्रामस्थांनी दिली आहे. या दृष्टीने देवगड तालुक्यातील सर्व गावांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे.
खासदार नारायण राणे यांची विरोधकांना तंबी

रत्नागिरी – माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी २५ जूनला रत्नागिरी येथे पत्रकार परिषदेत बोलतांना अणूऊर्जा प्रकल्पाचे समर्थन करतांना सांगितले की, ‘कोकणात अथवा राजापूर येथे अणूऊर्जा प्रकल्प आला, तर आम्ही त्याचे नक्कीच स्वागत करू; मात्र विरोध करणार्यांनी धाडस असेल, तर समोर येऊन आंदोलन करावे, मग मी काय करतो ते बघा.’
खासदार राणे यांची हुकूमशाही चालू देणार नाही ! – परशुराम उपरकर, माजी आमदार
खासदार नारायण राणे यांनी अणूऊर्जा प्रकल्पाविषयी केलेल्या वक्तव्यावर माजी आमदार परशुराम उपरकर यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत तीव्र टीका केली आहे. ते म्हणाले, ‘‘या अणूऊर्जा प्रकल्पामुळे स्थानिकांची घरे, बागायती, उपजीविकेची साधने बाधित होणार आहेत. संपूर्ण देवगड तालुक्यालाही त्याचे परिणाम भोगावे लागणार आहेत. त्यामुळे ग्रामस्थांनी या प्रकल्पाला विरोध चालू केला आहे. त्यामुळे राणे यांची हुकूमशाही आम्ही येथे चालू देणार नाही. अणूऊर्जा प्रकल्पाच्या विरोधातील आंदोलनात सक्रीय सहभाग घेणार आहोत.’’
देवगडमध्ये पर्यावरणाला हानी पोचेल, असा कोणताही प्रकल्प येणार नाही ! – पालकमंत्री नितेश राणे

देवगड – देवगडमध्ये पर्यावरणाला हानी पोचेल, असा कोणताही प्रकल्प येऊ दिला जाणार नाही. देवगडच्या हिताला बाधा पोचेल अशी कोणतीही भूमिका आम्ही घेणार नाही. भविष्यात कोणताही प्रकल्प प्रस्तावित असेल, तर सर्वांना विश्वासात घेऊन त्याची सविस्तर माहिती दिली जाईल. स्थानिक नागरिकांना जे योग्य वाटेल आणि देवगडच्या हिताचे जे असेल, तीच आमची भूमिका असेल. सामाजिक माध्यमातून (सोशल मिडियातून) विशेषतः व्हॉट्सॲपवर, खोटे आणि दिशाभूल करणारे संदेश पसरवून नागरिकांची माथी भडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे. ‘ज्यांच्या मनात कोणतीही शंका असेल, त्यांनी थेट सरकार म्हणून माझ्याशी किंवा जिल्हाधिकार्यांशी प्रशासन म्हणून संपर्क साधावा. अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पालकमंत्री नितेश राणे यांनी २६ जून या दिवशी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केले.
ढवळी परिसरात बिबट्याचे आक्रमण
मळेवाड येथे बिबट्याच्या आक्रमणात वासराचा मृत्यू
गोव्यातील ५६ गावांच्या शहरीकरणाच्या अधिसूचनेला विरोध
अत्याचार केल्याप्रकरणी धर्मांधाला सश्रम कारावास आणि दंड !
आषाढी वारीसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज
पक्षातील एकही खासदार फुटणार नसल्याचा शरद पवार यांना विश्वास !