
पणजी, २६ जून (वार्ता.) – गोवा राज्यातील ५६ गावांना नियोजन आणि विकास प्राधिकरणाच्या कक्षेत आणण्याच्या प्रस्तावित शहरीकरण अधिसूचनेला काँग्रेसने विरोध केला असून ही अधिसूचना तात्काळ मागे न घेतल्यास राज्यव्यापी आंदोलन छेडण्याची चेतावणी विरोधी पक्ष काँग्रेसने दिली आहे. या विषयी काँग्रेस हाऊसमध्ये २६ जून या दिवशी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे प्रवक्ते अमित पाटकर म्हणाले, ‘‘सरकारच्या या निर्णयामुळे राज्याचा पर्यावरणीय समतोल, सांस्कृतिक वारसा आणि ग्रामीण ओळख धोक्यात येईल.’’ या वेळी काँग्रेसचे नेते समीर वळवईकर, जॉन नाझारेथ, तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते. अमित पाटकर यांनी ग्रामपंचायतीमध्ये लेखी हरकती प्रविष्ट करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, ‘‘लोकशाही मार्गाने आपला आवाज उठवण्याची हीच योग्य वेळ आहे. प्रत्येक गावकर्याने पुढे येऊन आपल्या गावाच्या अस्तित्वासाठी लढा द्यावा. काँग्रेसच्या सर्व गट समित्या गावागावांत जाऊन या विषयावर जनजागृती करणार आहेत.’’
सरकार शहरीकरण प्रस्तावाचा फेरआढावा घेणार ! – बाबूश मोन्सेरात, महसूलमंत्री
याविषयी महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात म्हणाले, ‘‘सरकार शहरीकरण प्रस्तावाचा फेरआढावा घेणार आहे. यापूर्वी शहरीकरणाविषयी अधिसूचना प्रसिद्ध झालेल्या पंचायतींची पुन्हा मते जाणून घेतली जाणार आहेत. त्यानंतरच शहरीकरण प्रस्तावावर अंतिम निर्णय घेणार आहे.’’
पंचायत संचालनालयाच्या परिपत्रकानंतर विरोधाला प्रारंभ
५६ गावांचा शहरी क्षेत्रात समावेश करण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन आहे. यासंबंधीची अधिसूचना वर्ष २०२० मध्ये प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर आता पंचायत संचालनालयाने यासंबंधी परिपत्रक काढल्यानंतर याला विविध स्तरांवर विरोध चालू झाला आहे.
चिंबलचा शहरी क्षेत्रात समावेश करण्यास ग्रामस्थांचा विरोध
पणजी – चिंबल ग्रामस्थांनीही चिंबलचा शहरी क्षेत्रात समावेश करण्यास विरोध दर्शवला आहे. चिंबलचा शहरी क्षेत्रात समावेश केल्यास गृहनिर्माण आणि ‘मेगा’ प्रकल्प (मोठे गृहनिर्माण प्रकल्प) यांना चालना मिळणार असल्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. ग्रामस्थांनी चिंबलचा शहरी क्षेत्रात समावेश करण्याच्या प्रस्तावाच्या विरोधात ग्रामपंचायतीला निवेदन दिले आहे.
आमदार क्रूझ सिल्वा आणि आमदार विजय सरदेसाई यांचा विरोध
‘आप’चे वेळ्ळी मतदारसंघाचे आमदार क्रूझ सिल्वा यांनी चिंचिणी आणि सां जुझे दी आरियाल (नेसाय) या गावांचा शहरी क्षेत्रात समावेश करण्यास विरोध दर्शवला आहे. यासंबंधीचे पत्र आमदार क्रूझ सिल्वा यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना पाठवले आहे. ‘गोवा फॉरवर्ड’चे आमदार विजय सरदेसाई यांनी शहरीकरणाचा प्रस्ताव आणि त्यासंबंधीची अधिसूचना सरकारने मागे घेण्याची मागणी केली आहे. हा विषय विधानसभेत मांडण्याची मागणी आमदार विजय सरदेसाई यांनी केली आहे.
ढवळी परिसरात बिबट्याचे आक्रमण
मळेवाड येथे बिबट्याच्या आक्रमणात वासराचा मृत्यू
अत्याचार केल्याप्रकरणी धर्मांधाला सश्रम कारावास आणि दंड !
आषाढी वारीसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज
पक्षातील एकही खासदार फुटणार नसल्याचा शरद पवार यांना विश्वास !
राजर्षी छत्रपती श्री शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त हिंदुत्वनिष्ठांकडून अभिवादन !