नाशिकला ‘गोमाता संवाद यात्रे’चे स्वागत !

नाशिक – पशूसंवर्धन विभाग आणि महाराष्ट्र गो सेवा आयोगाच्या वतीने ‘राज्यमाता गोसंवाद यात्रा’ काढण्यात आली. २५ जून या दिवशी नाशिक शहरात नागरिकांनी यात्रेचे स्वागत केले. दुपारनंतर गोमाता संवाद यात्रा ठाणे जिल्ह्याकडे रवाना झाली. या यात्रेचा नागपूर येथे समारोप होणार आहे. या वेळी मान्यवरांच्या हस्ते गोशाळा चालकांचा सत्कार करण्यात आला.

या वेळी आमदार श्री. बनकर म्हणाले की, ‘गोमाता संवाद यात्रा उपक्रम’ अतिशय चांगला आहे. गोशाळासाठी राज्य शासन साहाय्य करीत आहे. गोशाळेच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातील. आयोगाचे अध्यक्ष श्री. मुंदडा म्हणाले की, गोमाता संवर्धन ही लोकचळवळ करावयची आहे. गायींचा सांभाळ करणे शक्य नसेल, तर अशा गायी गोशाळेला द्याव्यात. त्याचा योग्य तो मोबदला शेतकर्‍यांना देण्यात येईल. सहआयुक्त डॉ. नरवाडे म्हणाले की, गोशाळेच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून देशी जातीच्या गायींचे संवर्धन केले जात आहे. आयोगाचे सचिव डॉ. पाटील म्हणाले की, गोशाळांसाठी शासनाच्या विविध योजना आहेत. या योजनांचा लाभ घेत गोशाळा यांनी सक्षम व्हावे.