आषाढी वारीसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज

प्रशासनाकडून प्रत्येक १० दिंड्यांसाठी एक ‘आरोग्यदूत’ आणि ५ कि.मी. वर ‘आपला दवाखाना’ सुविधा !

पुणे – आषाढी पालखी सोहळ्यातील लाखो वारकर्‍यांच्या आरोग्यासाठी आरोग्य विभागाने कंबर कसली असून विविध मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. वारी मार्गक्रमण करत असतांना प्रत्येक १० दिंड्यांमागे स्वतःच्या दुचाकीसह एक ‘आरोग्यदूत’ तैनात असेल, तसेच पालखी मार्गावर प्रत्येक ५ कि.मी.वर ‘आपला दवाखाना’ कार्यान्वित केला जाणार आहे, अशी माहिती आरोग्य संचालक (प्राथमिक) डॉ. विजय कंदेवाड यांनी दिली. पालखी मुक्कामाच्या ठिकाणी ५ खाटांचे ‘अतिदक्षता विभाग’ (आयसीयू) सज्ज ठेवण्यात येणार असून सर्पदंश, श्वानदंश यांवरील औषधसाठा उपलब्ध केला जाईल.

वारीतील अन्य आरोग्य सिद्धता !

१. रुग्णांना तातडीने हालवण्यासाठी १०८ आणि १०२ क्रमांकाच्या रुग्णवाहिका सक्रीय.

२. वारीसाठी खासगी रुग्णालयामध्ये १० टक्के खाटा आरक्षित ठेवण्याचे आवाहन.

३. पालखी मार्गावरील हॉटेलची पडताळणी, क्लोरीनद्वारे पाण्याचे शुद्धीकरण करण्यात येईल. नियम मोडणार्‍या हॉटेल्सचे परवाने रहित करण्याची शिफारस केली जाईल.