भगवद्गीता : केवळ धार्मिक ग्रंथ नव्हे, तर वैज्ञानिक दृष्टीकोनातून उत्तम मानसिक आरोग्य देणारा ग्रंथ !

येथे गेल्या ७ वर्षांत श्रीमद्भगवद्गीतेसंबंधी करण्यात आलेल्या २ संशोधनांविषयी काही सूत्रे मांडत आहे. एक संशोधन कर्करोग पीडित, तर दुसरे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक वयोगटातील विद्यार्थ्यांशी मानसिक स्वास्थ्य यांच्याशी संबंधित आहे.

कोणत्याही समस्येविषयीची स्वतःची समज जेवढी प्रगल्भ असेल, तितका त्यावरील उपायांसंबंधीचा स्वतःचा विचार अधिक प्रभावी आणि प्रामाणिक होऊ शकतो. यांसाठी त्या त्या समस्येची तोंडओळखही करून देण्यात आली आहे.                  

(पूर्वार्ध)

१. कर्करोग पीडित रुग्णाच्या मानसिक स्थितीचे साधारण स्वरूप

कर्करोग झाल्यास पीडित आणि त्यांचे कुटुंबीय यांना होणारा तणाव अन् अन्य एखादा सर्वसाधारण आजार झाल्यास वाटणारा तणाव यांत अंतर आहे. कर्करोगामध्ये हा तणाव वाढून व्यक्ती मनोविकारांचा रुग्णही बनू शकतो. याचे कारण, म्हणजे कर्करोगासाठी उपचारांसाठीचा दीर्घकालावधी, त्यासाठी येणारा व्यय; उपचारांचे काही दुष्परिणाम, उपचार कितपत यशस्वी होतील, यासंबंधी खात्री नसणे, सामान्यांमध्ये असणारी त्यासंबंधीची भयाची भावना इत्यादी.

कर्करोग पीडितांमध्ये अस्वस्थता, उदासीनता, भीती, काळजी वाटणे, झोप न लागणे, हतबल वाटणे, अशा विविध प्रकारच्या मानसिक समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे कर्करोगासंबंधाने करण्यात येणार्‍या वैद्यकीय उपचारांमध्ये अशा रुग्णांचा सकारात्मक सहभाग अल्प होऊ शकतो, तसेच कुटुंबियांनाही त्यांना सांभाळतांना अडचणी येऊ शकतात.

लेखकाचे मनोगत

विद्यमान काळातील समस्यांना कसे सामोरे जायचे याविषयीचा मार्गदर्शक ग्रंथ ‘भगवद्गीता’

‘धर्म अणि अध्यात्म या विषयांचा विज्ञानाशी काही संबंध नाही. विज्ञानवाद्यांनी त्याकडे पहायलाही नको’, अशी अनेकांची समजूत असते. सामान्य माणसे मात्र त्यांचा जीवनात लाभ घेत असतात. त्यामुळे धर्म आणि अध्यात्म यांचे सामान्यांकडून सांगितले जाणारे जीवनोपयोगी पैलू विज्ञानाच्या दृष्टीने पारखण्याचा प्रयत्न होत असतो.

डॉ. दुर्गेश सामंत

पाश्चात्त्य मंडळी ज्याप्रकारे आपल्या धर्माचा किंवा तत्त्वज्ञानाचा वैज्ञानिक अभ्यास करायचा प्रयत्न करतात, तेवढ्या प्रमाणात हिंदु धर्म त्यातही त्यातील तत्त्वज्ञानाविषयीचा विज्ञानाच्या दृष्टीने अभ्यास करण्याची प्रवृती आपल्याकडे अल्प आहे. अलीकडे यांत थोडा थोडा पालट होत आहे. अर्थात् बहुतांश वेळा इंग्रजी भाषा हे संशोधनाचे माध्यम असल्याने, तसेच संशोधन करणार्‍यांचा जनसामान्यांशी संपर्क नसल्याने संशोधनातून स्पष्ट झालेल्या धर्म, अध्यात्म यांचे जीवनोपयोगी पैलू सामान्यांच्या समोर येत नाहीत. मराठी म्हणा किंवा भारतीय भाषांमध्ये व्यवहार न करणार्‍यांना तर यांची गंधवार्ता नसते. दुसर्‍या बाजूला भारतीय भाषा पुष्ट होण्यासाठी विविध विषयांची माहिती त्या त्या भाषांमध्ये येणे आवश्यक आहे. मराठीचा त्याला अपवाद नाही.

चांगले वैद्यकीय शिक्षण प्राप्त आहे अधिक धर्म, अध्यात्म, मानसशास्त्र आदींचा अभ्यास करण्याची आवडही आहे, अशी पाश्वर्भूमी असलेल्याने इंग्रजी भाषेत होणारे धर्म आणि अध्यात्म यांविषयीचे जीवनोपयोगी संशोधन मराठी भाषेत मांडण्याचा प्रयत्न करायला हवा. पत्रकारितेच्या जगतामध्ये इंग्रजीमध्ये होत असलेल्या संशोधनाविषयी काही छापून आलेच, तर ते बर्‍याचदा अन्य चटकदार विषयांसंबंधी असते. भगवद्गीतेची उपयुक्तता धार्मिक पोथी यांपेक्षा पुष्कळ अधिक असून तिच्या माध्यमातून विद्यमान काळातील समस्यांना सामोरे जायला काही वाट नक्कीच सापडू शकते. नेमक्या याच सर्व मनोभूमिकेतून या लेखातील लिखाण आहे. ‘भगवद्गीता’, म्हणजे केवळ एक धार्मिक गोष्ट, बौद्धिक विरंगुळा, अस्मिता रक्षण इत्यादी प्रकारे न पहाता त्याहीपेक्षा पुष्कळ अधिक काही माणसाला मिळू शकेल’, असा ग्रंथ म्हणून पहायला हवे. यासह भगवद्गीता हा या भूमीचा नव्हे, जगाचा ठेवा आहे. त्याचे पठणच नव्हे, तर अध्ययन, तिच्यात दिलेल्या सूत्रांचा नित्य जीवनात वापर यांतून हा ठेवा अधिक समृद्ध बनणार आहे. या सर्व दृष्टीने हा लेखन प्रयत्न. येथे एक महत्त्वाचे सूत्र असे की, भगवद्गीतेची महानता स्वयंसिद्ध आहे. अशा प्रकारचे संशोधन ती परत अधोरेखित करतात इतकेच.’

– आधुनिक वैद्य (डॉ.) दुर्गेश सामंत

१ अ. नेपाळमधील संशोधन : नेपाळमधील ‘बीपी कोईराला मेमोरियल कर्करोग रुग्णालया’त डॉ. पांडे आणि त्यांचे सहकारी यांनी कर्करोगाच्या रुग्णांवरील उपायांशी संबंधित संशोधन ‘क्वांटम जर्नल ऑफ मेडिकल अँड हेल्थ सायन्सेस’च्या मार्च २०२१ मधील पत्रिकेत प्रसिद्ध झाले.

१ अ १. संशोधनाची पद्धत : संशोधकांनी विशिष्ट प्रमाणित पद्धत वापरून कर्करोगग्रस्त रुग्णांमधून आणि त्यामुळे मनोविकारग्रस्त झालेले रुग्ण निवडले. यातील बहुतांशी रुग्णांचा आजार कर्करोगाच्या दुसर्‍या किंवा तिसर्‍या टप्प्यातील होता (पहिला टप्पा, म्हणजे अगदी प्रारंभीचा टप्पा जेथे तो रोग अतिशय मर्यादित भागापुरता सीमित असतो. बहुतांश वेळा येथे कर्करोग काही चाचणीत दिसून येतो. पुढच्या टप्प्यांत तो पसरलेला असतो आणि बर्‍याचदा त्याची लक्षणे सहज लक्षात येतील, अशी असतात. पुढचा टप्पा म्हणजे मृत्यू जवळ आलेला असणे). बहुतेकांना ‘रेडिओथेरपी’ (किरणोपचार) आणि ‘केमोथेरपी’ (रसायनोपचार) हे उपचार चालू होते. या रुग्णांचे शास्त्रीय पद्धतीने (प्रत्येक गटात १०० रुग्ण) ३ गट करण्यात आले. या गटांना आपण आपल्या सोयीसाठी ‘अ’, ‘ब’ आणि ‘क’ अशी नावे देऊ.

‘अ’ गटातील रुग्णांना नेहमीचे वैद्यकीय उपचार देण्यात आले. ‘ब’ गटातील रुग्णांना वैद्यकीय उपचारांसह भजन आणि कीर्तन ऐकवण्यात आले. ‘क’ गटातील रुग्णांना वैद्यकीय उपचारांसह ‘भगवद्गीते’च्या आधारे मानसोपचार करण्यात आले. भजन, कीर्तन आणि भगवद्गीता यांच्या आधारे मानसोपचार हे उपचार त्या त्या गटाला प्रतिदिन ३० ते ४५ मिनिटे, असे सलग ६ दिवस करण्यात आले. ७ व्या दिवशी त्यांच्यामधील परिवर्तन अभ्यासण्यासाठी या तीनही गटातील रुग्णांची फेरमानसिक पडताळणी करण्यात आली.

१ अ २. संशोधनाचे निष्कर्ष : ‘अ’ गटातील रुग्णांच्या मानसिक स्थितीमध्ये १ टक्का सुधारणा झालेली आढळली. ‘ब’ गटातील रुग्णांच्या मानसिक स्थितीमध्ये झालेली सुधारणा १४ टक्के होती, तर ‘क’ गटातील रुग्णांच्या मानसिक स्थितीमध्ये झालेली सुधारणा ४१ टक्के आढळली. हे निष्कर्ष स्वत:च बोलके आहेत.

१ अ ३. संशोधनातील निष्कर्षांच्या आधारे प्रत्यक्ष उपयोगासंबंधी काही सूत्रे

१. कर्करोग या शारीरिक व्याधीवर उपचार करतांना रुग्णाची मानसिक स्थिती पहावी आणि त्यासंबंधानेही आवश्यक ते उपचार अवश्य करावेत.

२. येथे भजन, कीर्तन आणि गीता यांवर आधारित मानसोपचार हे धार्मिकता वाढवणारे प्रयत्न नसून कर्करोगाच्या निमित्ताने उद्भवलेल्या मनोविकारांवरील उपचार आहेत, हे लक्षात घ्यावे.

(क्रमशः उद्याच्या दैनिकात)

– आधुनिक वैद्य (डॉ.) दुर्गेश सामंत, एम्.डी. (मेडिसीन), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१८.१०.२०२५)

या लेखाचा उत्तरार्ध वाचण्याकरिता येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/982571.html

संपादकीय भूमिका

भगवद्गीतेची उपयुक्तता धार्मिकतेसह तिच्या माध्यमातून विद्यमान समस्यांना सामोरे जायला वाट दाखवणारी आहे !