येथे गेल्या ७ वर्षांत श्रीमद्भगवद्गीतेसंबंधी करण्यात आलेल्या २ संशोधनांविषयी काही सूत्रे मांडत आहे. एक संशोधन कर्करोग पीडित, तर दुसरे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक वयोगटातील विद्यार्थ्यांचे मानसिक स्वास्थ्य यांच्याशी संबंधित आहे. कोणत्याही समस्येविषयीची स्वतःची समज जेवढी प्रगल्भ असेल, तितका त्यावरील उपायांसंबंधीचा स्वतःचा विचार अधिक प्रभावी आणि प्रामाणिक होऊ शकतो. यांसाठी त्या त्या समस्येची तोंडओळखही करून देण्यात आली आहे.
१ डिसेंबर या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘कर्करोग पीडित रुग्णाच्या मानसिक स्थितीचे साधारण स्वरूप’ वाचले. आज या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहोत.
(उत्तरार्ध)
पूर्वार्ध वाचण्याकरिता येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/982207.html
२. विद्यार्थ्यांच्या मानसिक अस्वास्थ्यावर गीतोपदेशनाचा उपाय
२ अ. समस्येचे गांभीर्य : डिसेंबर २०२४ मध्ये मध्यप्रदेशात इयत्ता १२ वीतील एका विद्यार्थ्याने त्याच्या चुकीबद्दल त्याच्यावर रागावलेल्या प्राचार्यांना गोळी घालून ठार केले. हे एक टोकाचे वाटणारे उदाहरण असले, तरी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक गटातील विद्यार्थ्यांमध्ये तणाव, नशेखोरी, हिंसकपणा, आत्महत्येची प्रवृत्ती इत्यादी वाढलेले आहे. याखेरीज विद्यार्थ्यांच्या आकलन क्षमतेचा दर्जा घसरणे, अभ्यासाची प्रवृत्ती न्यून होणे यांसारख्या गोष्टी तर बर्याच जणांना परिचित आहेत. याचे मुख्य कारण ‘हे विद्यार्थी ज्या प्रकारे मानसिकदृष्ट्या सक्षम असायला हवेत तसे नसतात’, हे आहे. शिक्षणक्षेत्राशी जवळून संबंध असणार्यांना या समस्येची व्याप्ती ठाऊक आहेच; परंतु सामान्यांनाही त्यांच्या पाल्यांना हाताळतांना त्याच्या झळा बसत अहेत.
२ आ. (पाश्चात्त्य) मानसशास्त्र आणि भारतीय मानसशास्त्र म्हणजे काय ?

२ आ १. मानसशास्त्र : आपल्याकडे महाविद्यालयांमध्ये सर्वसाधारणपणे शिकवले जाणारे मानसशास्त्र, तसेच व्यावहारिक जीवनात व्यवसाय म्हणून वापरले जाणारे मानसशास्त्र हे बहुतांश पाश्चात्त्य मानसशास्त्र आहे. त्यातील मूलभूत संकल्पना आणि उपचारपद्धत इत्यादींचा उगम हा पाश्चात्त्य जगतातील विचारांमध्ये झालेला आहे. सकारात्मक मानसविज्ञान त्याचीच एक शाखा असून तिचा वापर उपचार म्हणून वर्ष १९९४ पासून होऊ लागला आहे.
२ आ २. भारतीय मानसशास्त्र : मन, सुख-दुःख, त्याची कारणे इत्यादींचा विचार सनातन धर्मामध्ये सहस्रो वर्षांपासून आहे. ‘श्रीमद्भगवद्गीता’ हा सनातन धर्मातील मानवी जीवनविषयक तत्त्वज्ञान सांगणारा एक प्रातिनिधिक ग्रंथ आहे. सनातन धर्मातील या विचारांना गेल्या काही दशकात ‘भारतीय मानसशास्त्र’ असे म्हटले जात आहे.
२ आ ३. दोन्हींमधील संक्षिप्त भेद : एका पाश्चात्त्य तज्ञाच्या मते ‘भारतीय मानसशास्त्र जीवनातील अनिवार्य अनुकूल आणि प्रतिकूल वळणे यांच्याशी जुळवून कसे घ्यायचे ? तोल कसा सांभाळायचा ? हे शिकवते. पाश्चात्त्य मानसशास्त्र समस्या आणि त्यांवरील उपाय या पद्धतीने विचार करते. येथे स्थूल स्तरावरील तात्कालिक लाभ याला अधिक महत्त्व मिळते.’ दोन्हींची अधिक तुलना मांडणे विस्तारभयास्तव येथे शक्य नाही.
२ इ. पाश्चात्त्य आणि भारतीय मानसशास्त्र यांचा विद्यार्थ्यांवरील परिणाम : देहलीतील राष्ट्रीय राजधानी क्षेत्रामध्ये एक संशोधन प्रकल्प राबवण्यात आला. वर्ष २०१८ मध्ये ‘कॉजेन्ट सायकॉलॉजी’ या संशोधन पत्रिकेत प्रतिभा दाबस आणि आभा सिंग यांनी केलेल्या या संशोधनाची माहिती देण्यात आली आहे.
२ इ १. संशोधन पद्धत : विद्यार्थ्यांमधील शिस्तीचा अभाव आणि नैतिक मूल्यांचा र्हास यांमध्ये शिकवणी वर्गांच्या माध्यमातून होणारे परिवर्तन अभ्यासणे, हा या प्रकल्पाचा मुख्य हेतू होता. या प्रकल्पात ६३० विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यांचे ३ गट (प्रत्येकी २१०) करण्यात आले. आपल्या सोयीसाठी त्यांना आपण ‘अ’, ‘ब’ आणि ‘क’, अशी नावे देऊ. शिकवणी देण्याच्या आधी आणि देऊन झाल्यानंतर विद्यार्थ्यांची प्रमाणित पद्धतीने मानसशास्त्रीय पडताळणी करण्यात आली.
यात विद्यार्थ्यांमध्ये पुढील ३ गुणांची वाढ पडताळण्यात आली.
अ. प्रयत्नांनी ध्येय साध्य होणार, याविषयीचा दृढ विश्वास (hope) : आपण योग्य प्रयत्न केले, तर आपल्याला काही यश मिळेल, असे वाटत नसेल, तर शिक्षण, त्यातील शिस्त यांपेक्षा विद्यार्थ्याला बाकीच्या गोष्टी सोयीच्या वाटू लागतात. मग प्रयत्नांवरील भर न्यून होतो. मनात आणि जीवनात संघर्ष होतो.
आ. सर्वसाधारण सकारात्मकता किंवा आशावाद (optimism) : सगळे नीट होणार आहे. ‘जे चालले आहे त्यातून पुढे चांगले वळण आपल्या वाट्याला येणार आहे’, अशी भावना विद्यार्थ्याला कंटाळवाणे वाटणार्या अभ्यासक्रमातून पुढे जात रहायला आवश्यक ठरते.
इ. परिस्थितीशी जुळवून घेण्याची लवचिकता (resilence) : बरेचसे विद्यार्थी पौगंडावस्थेतील असतात. त्याच्या स्वत:च्या जीवनात, शालेय आणि कौटुंबिक जीवनात इत्यादी काही ना काही घडत असते. यातील बरेचसे अनुभव त्याच्यासाठी नवीन असतात. त्याच्यासाठी परिस्थिती सतत पालटत असते. योग्य आणि अयोग्य काय यांविषयी संभ्रम असतो. तिच्याशी जुळवून घ्यावयाचे, हा विचार विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा असतो.
इ १. ‘अ’ गटातील विद्यार्थ्यांनी सर्वसाधारण नियमित अभ्यास केला.
इ २. ‘ब’ गटातील विद्यार्थ्यांनी सर्वसाधारण नियमित अभ्यास केला. त्यासह त्यांना गीतेवर आधारित शिकवण देण्यात आली.
इ ३. ‘क’ गटातील विद्यार्थ्यांनी सर्वसाधारण नियमित अभ्यास केला. यासह त्यांना सकारात्मक मानसशास्त्र (positive psychology) या पाश्चात्त्य पद्धतीने शिकवण देण्यात आली.
‘ब’ आणि ‘क’ गटासाठीच्या मानसोपचारांच्या शिकवणीसाठी प्रत्येक सप्ताहात २ घंटे देण्यात येऊन असे १२ सप्ताह करण्यात आले. मानसशास्त्रीय पडताळणीतून प्राप्त गुणाकांचे सांख्यिकीय विश्लेषण करण्यात आले. यातून प्रत्येक गुणाच्या संबंधीचे ‘सरासरी वाढ गुणांक’ (Gain score) मिळाले. प्रयत्नांनी ध्येय साध्य होणार, याविषयीचा दृढ विश्वास (hope) आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याचे लवचिकता (resilence) यासंबंधाने ‘अ’ आणि ‘क’ या गटागटाचे सरासरी वाढ गुणांक १ ते ३ यांच्यामध्ये राहिले. ‘ब’ गटाचे सरासरी वाढ गुणांक ६ ते ८ असे राहिले. आशावाद (optimism) या मापदंडाच्या संबंधाने वाढ गुणांक होते ‘अ’ गट ०.५ पेक्षा न्यून, ‘ब’ गट १.७, तर ‘क’ गट १ इतके.
ई. निष्कर्ष : भगवद्गीतेचा वापर केल्याने विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य चांगले होते !
थोडक्यात सांगायचे झाल्यास ‘ब’ गटातील विद्यार्थ्यांमध्ये तीनही मापदंडामध्ये अन्य २ गटांपेक्षा लक्षणीय प्रमाणात अधिक सुधारणा दिसून आली. ‘क’ गटामधील विद्यार्थ्यांमध्ये केवळ आशावाद या गुणांमध्ये लक्षणीय सुधारणा दिसून आली आणि ही जी काही सुधारणा दिसून आली, ती ‘ब’ गटातील विद्यार्थ्यांपेक्षा न्यूनच होती. या निष्कर्षांचे विश्लेषण करतांना संशोधकांनी म्हटले आहे की, ‘ब’ गटात दिसून आलेली सुधारणा यामागे विद्यार्थ्यांना परिचित असणार्या संकल्पनांच्या आधारे झालेले प्रबोधन त्यांच्या प्रत्यक्ष जीवनात लागू करणे अधिक सुलभ असणे, हे कारण असू शकते. ‘सकारात्मक मानसशास्त्र’ या पद्धतीने प्रबोधन करण्यासाठी अधिक वेळ आणि कुशलता आवश्यक आहे. यासाठी भारतीय मानसशास्त्राचा विशेष करून भगवद्गीतेचा वापर भारतीय विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य चांगले होण्यासाठी करण्यात यायला हवा.
३. गीतेचे मानसिक आरोग्याशी संबंधित महत्त्व वेळीच ओळखा !
अ. गीतेकडे केवळ धार्मिक ग्रंथ असे न पहाता सध्याच्या काळात ‘मानवी जीवनाला योग्य वळण देण्याची क्षमता असलेले शास्त्र’, असे पहायला हवे.
आ. गीतेतील विचार समजून घेतले, स्वतःच्या जीवनात यथाशक्ती आचरणात आणले, तर आपल्याला गीतेची शिकवण दुसर्याला कसे समजावायची, हे थोडे समजेल.
इ. भारतासारख्या देशामध्ये प्रत्येकाला मानसोपचाराच्या उत्तम सुविधा मिळणे, हे कठीण आहे. गीता अध्ययन केल्यास स्वतःला, तसेच अन्य गरजवंतांना आपण काही साहाय्य करू शकतो.
ई. ‘मानसिक समस्या झाल्यानंतर गीता वाचावी’, असे नसून त्या होण्याआधी ती अभ्यासली, तर एक ‘प्रतिबंधात्मक उपाय’ म्हणून अभ्यासली, तर अधिक लाभकारी ठरेल.
(समाप्त)
श्री गुरुचरणार्पणमस्तु ।
– आधुनिक वैद्य (डॉ.) दुर्गेश सामंत, एम्.डी. (मेडिसीन), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१८.१०.२०२५)
नियमांचे उल्लंघन करणारे हॉटेल, रेस्टॉरंट आणि ढाबे यांच्या मालकांना सोडणार नाही ! – Tukaram Mundhe
क्रिकेटचा उदो उदो नको !
बलात्कार प्रकरणी पोलीस आणि प्रशासन यांना निर्देश देणारे झारखंड उच्च न्यायालयाचे निकालपत्र !
मनुष्याचे शरीर, चित्त, मन आणि बुद्धी यांच्यावर प्रारब्धाचा असलेला प्रभाव अन् त्यांचा ग्रहांशी असलेला संबंध !
ओस पडत चाललेल्या चर्चचा पंचनामा ?
स्त्रीत्वाचा उत्सव !