Rashtra Rakshana Sene Urges : मैसुरू दसरा महोत्सवाच्या उद्घाटनाचे सरकारचे निमंत्रण तुम्ही स्वतःहून नाकारा !

कर्नाटकातील ‘राष्ट्र रक्षण सेने’ने बानू मुश्ताक यांना घरी जाऊन केले आवाहन

बानू मुश्ताक यांना निवेदन देतांना ‘राष्ट्र रक्षण सेने’चे कार्यकर्ते

हासन / बेंगळुरू (कर्नाटक) – मैसुरू दसरा महोत्सवाच्या उद्घाटनासाठी बुकर पुरस्कार विजेत्या आणि धर्मांध मुसलमान लेखिका बानू मुश्ताक यांना राज्य सरकारकडून निमंत्रण देण्यात आले आहे. यास हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी तीव्र विरोध दर्शवला आहे.

‘राष्ट्र रक्षण सेने’च्या हिंदुत्वनिष्ठांनी बानू मुश्ताक यांना दसरा उद्घाटनाचे निमंत्रण नाकारण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी ३ सप्टेंबरच्या सकाळी हासनमधील बानू मुश्ताक यांच्या घरी जाऊन एका निवेदनाद्वारे त्यांनाच विनंती केली की, ‘तुम्ही श्री भुवनेश्वरी देवीच्या विरोधात बोलला आहात. दसरा हा राष्ट्रीय उत्सव असला, तरी तो आमच्या हिंदूंचा सण आहे. त्यामुळे ज्यांना आमची संस्कृती मान्य नाही, त्यांनी दसरा उत्सवातून माघार घ्यावी. तुम्ही कन्नड साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा होऊ शकता; परंतु दसरा उद्घाटनाच्या कार्यक्रमातून तुम्ही स्वतःहून माघार घ्यावी, ही विनंती.’

यानंतर ३ सप्टेंबरच्या सायंकाळी हासन जिल्हा प्रशासनाने बानू मुश्ताक यांच्या घरी भेट देऊन त्यांना सरकारच्या वतीने उत्सवाच्या उद्घाटनाचे अधिकृत निमंत्रण दिले.

‘मी हिंदु धर्मानुसार देवीचे पूजन करीन !’ – बानू मुश्ताक यांचे आश्वासन

यासंदर्भात ‘सनातन प्रभात’ने ‘राष्ट्र रक्षण सेने’चे अध्यक्ष सुरेश गौडा यांच्याशी संवाद साधला. या वेळी ते म्हणाले की, आम्ही १ सप्टेंबरला या प्रकरणी पत्रकार परिषद घेऊन बानू मुश्ताक यांना जाहीर आवाहन केले की, त्यांनी या महोत्सवाचे निमंत्रण स्वीकारू नये. त्यानंतर ३ सप्टेंबरच्या सकाळी त्यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली. त्यांना आमची भूमिका समजावून सांगितली. त्यावर त्यांनी ‘मी हिंदु धर्मानुसार पूजन करीन’, असे आश्वासन दिले.

याआधी ‘हिंदु राष्ट्र समन्वय समिती’ने ‘सरकारने त्यांना आमंत्रित करण्याच्या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी मागणी एका निवेदनाच्या माध्यमातून केली आहे. येथील जिल्हाधिकार्‍यांना याविषयीचे निवेदन सादर करण्यात आले.


हिंदु-मुसलमान यांच्यात संघर्ष निर्माण करण्यासाठी काँग्रेसचे नीच राजकारण ! – मुसलमान नेते सादिक पाशा

मुसलमान नेते सादिक पाशा आणि बानू मुश्ताक

या प्रकरणी बेंगळुरू येथील ‘सद्भावना यूथ सोशल वेल्फेअर असोसिएशन’ या मुसलमानांच्या सामाजिक संघटनेचे अध्यक्ष सादिक पाशा यांच्याशी ‘सनातन प्रभात’ने संपर्क साधला. या वेळी पाशा म्हणाले की, बानू मुश्ताक प्रकरणावर काँग्रेस धर्माचे राजकारण खेळत आहे. हे अत्यंत अयोग्य आहे. काँग्रेसला या प्रकरणातून मुसलमानांना खुश करायचे आहे. तथापि जर बानू मुश्ताक यांनी हिंदु परंपरांनुसार मैसुरू दसरा उत्सवात देवीचे पूजन केले, तर त्यातून केवळ हिंदूंच्याच नाही, तर मुसलमानांच्याही धार्मिक भावना दुखावल्या जातील.

पाशा पुढे म्हणाले की, एकमेकांच्या धर्मांचा आदर झाला पाहिजे; परंतु मुद्दामहून दुसर्‍या धर्माच्या उपासनेच्या ठिकाणी कशाला जावे ? काँग्रेस सरकार मुसलमानांच्या गंभीर प्रश्नांकडे दुर्लक्ष करून हिंदू-मुसलमान यांच्यात शत्रुत्व निर्माण करत आहे. अशा प्रकारे धर्माचे राजकारण होता कामा नये.


बानू मुश्ताक यांचा संधीसाधूपणा ! – हिंदु जनजागृती समिती

श्री. मोहन गौडा

यासंदर्भात हिंदु जनजागृती समितीचे कर्नाटक राज्य प्रवक्ते श्री. मोहन गौडा ‘सनातन प्रभात’ला म्हणाले की, बानू मुश्ताक यांनी ‘हिंदु धर्मानुसार देवीचे पूजन करण्याची सिद्धता दाखवली’, हे चांगले आहे. असे असले, तरी ‘कर्नाटक साहित्य संमेलना’त त्यांनी कन्नड भाषेची नाडदेवता (६ कोटी हिंदूंची देवता) असलेल्या कन्नड श्री भुवनेश्वरीमातेचा अवमान केला होता. तसेच हिंदूंच्या दत्तपीठात मुसलमानांना प्रवेशाची अनुमती देण्याची हिंदुविरोधी मागणीही केली होती. त्यावर त्यांचे मत काय आहे ? त्या या प्रकरणांत हिंदूंची जाहीर क्षमायाचना करणार का ? जर त्या तसे करणार नसतील, तर यातून बानू मुश्ताक यांचा संधीसाधूपणा दिसून येईल. आमच्या धार्मिक भावनांना दुखावण्याचे हे षड्यंत्र आहे. मैसुरू दसरा महोत्सवाच्या सहस्रावधी वर्षांपासून चालत आलेल्या परंपरेचे उद्घाटन हिंदु धर्मानुसार प्रत्यक्ष आचरण करणार्‍यांनीच केले पाहिजे.

संपादकीय भूमिका

  • हिंदूंच्या सणाचे उद्घाटन जाणूनबुजून एका हिंदुद्वेषी मुसलमान महिलेच्या हस्ते करू पहाणार्‍या काँग्रेस सरकारचा हिंदुद्वेष जाणा ! काँग्रेस सरकारने कधी कुठल्या मुसलमानांच्या धार्मिक उत्सवाचे उद्घाटन हिंदूंच्या हस्ते केले आहे का ?
  • एरव्ही मुसलनानांच्या धार्मिक भावनांचा प्रश्न असता, तर संबंधितांना भेटून त्यांना विनंती करण्याऐवजी संबंधितांच्या ‘सर तन से जुदा’च्या (शिरच्छेदाच्या) घोषणा देणारी हिंसाचारी आंदोलने झाली असती. आता या घटनेतून तरी हिंदु असहिष्णु नाहीत, तर ‘अतीसहिष्णु’ आहेत, हे लक्षात घ्या !