महाराष्ट्र लोक आयुक्त कार्यालयात १४३ पदांच्या सुधारित आकृतीबंधाला मान्यता !

मुंबई, २१ जुलै (वार्ता.) – अनेक वर्षांपासून प्रलंबित महाराष्ट्र लोक आयुक्त कार्यालयात १४३ पदांच्या सुधारित आकृतीबंधाला २१ जुलै या दिवशी राज्याच्या मंत्रीमंडळाने मान्यता दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली.

यापूर्वी लोक आयुक्त आणि उपलोक आयुक्त या दोन्ही कार्यालयांमध्ये ८७ पदांना मान्यता होती. केंद्रशासनाच्या धर्तीवर वर्ष २०२३ मध्ये महाराष्ट्र लोक आयुक्त अधिनियम लागू करण्यात आला आहे. या अधिनियमानुसार लोकआयुक्त संस्थेतील सदस्यांमध्ये वाढ करण्याचा, तसेच अधिकारक्षेत्र वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये ५६ पदे वाढवण्यात आली आहेत. यामध्ये नियमित ३१, बाह्ययंत्रणेद्वारे २३, आणि माहिती तंत्रज्ञान कर्मचारी २ अशी पदांची संख्या आहे.

अन्य महत्त्वाचे निर्णय !

१. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलासाठी पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील मौजे सदुंबरे येथे ३ हेक्टर भूमी देण्याला मंत्रीमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

२. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांचा प्रसार, सामाजिक प्रबोधन यांसह व्यसनमुक्ती, राष्ट्रभक्ती यांसाठी कार्यरत नागपूरमधील मोझरी येथील अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवामंडळ या सार्वजनिक धर्मादाय संस्थेला शासनाकडून १८ सहस्र ३४० चौरस फूट जागा वर्ष १९५४ मध्ये भाडेतत्त्वावर देण्यात आली होती. संस्थेच्या लोकहितकारी कार्यास्तव भाडेपट्ट्याच्या नूतनीकरणावरील मुद्रांक शुल्क रहित करण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला.

३. नागपूरच्या काटोल येथे शासकीय उद्यानविद्या महाविद्यालय : अकोला जिल्ह्यातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापिठाशी संलग्न नागपूर जिल्ह्यातील काटोल येथे शासकीय उद्यानविद्या महाविद्यालय स्थापन करण्यास मंत्रीमंडळाने मान्यता दिली.