स्त्री तिच्यातील चैतन्य आणि भक्ती यांद्वारे घराचे मंदिर बनवते ! – श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, सनातन संस्था

रायपूर (छत्तीसगड) येथील शदाणी दरबारात नारीशक्ती संमेलनाचे आयोजन

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ

रायपूर (छत्तीसगड) – आपल्या सनातन संस्कृतीत स्त्रीला ‘गृहलक्ष्मी’ आणि ‘शक्ती’चे स्वरूप मानले गेले आहे. स्त्रीधर्माचा अर्थ केवळ घरकाम करणे, असा मर्यादित नाही, तर आपले आचरण, त्याग आणि संस्कार यांनी संपूर्ण कुटुंबाला धर्माच्या मार्गावर चालायला शिकवणे, हा आहे. कुटुंबसंस्थेचा पाया स्त्रीच असते. एक पुरुष घर बांधतो; पण एक स्त्री तिच्यातील चैतन्य आणि भक्ती यांद्वारे त्या घराचे ‘मंदिर’ बनवते, असे मार्गदर्शन सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी केले. शदाणी दरबारच्या पंचमपीठाधीश्वर पूज्य माता साहिब हासी देवीजी यांच्या द्वीशताब्दी (२०० व्या) जयंतीनिमित्त येथील शदाणी आश्रमात ‘नारीशक्ती संमेलना’चे विशेष आयोजन करण्यात आले होते. या संमेलनात श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

रायपूर येथील शदाणी आश्रमात पार पडलेल्या या नारीशक्ती संमेलनाला शदाणी दरबारचे पू. डॉ. युधिष्ठिरलाल महाराज आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या दुसर्‍या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचीही वंदनीय उपस्थिती लाभली. या संमेलनाला सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस, हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांच्यासह ७०० हून जण उपस्थित होते.

स्त्रियांनी भक्तीच्या माध्यमातून स्वतःतील दुर्गातत्त्व जागृत करावे ! – श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ, सनातन संस्था

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ

या वेळी मार्गदर्शन करतांना श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ म्हणाल्या, ‘‘स्त्रियांनी स्वत:वरील अत्याचार थांबवण्यासाठी आणि स्वतःचे रक्षण करण्यासाठी केवळ कायद्यावर अवलंबून राहू नये. महिलांनी साधना आणि अखंड नामजप केला पाहिजे. या भक्तीच्या माध्यमातून स्वतःमधील ‘दुर्गातत्त्व’ जागृत करून आसुरी शक्तींचा नाश करण्यासाठी आणि ‘हिंदु राष्ट्रा’ची स्थापना करण्यासाठी महिलांनी सज्ज झाले पाहिजे.’’

या संमेलनात सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनीही उपस्थितांशी संवाद साधला. त्यांनी सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा परिचय करून दिला, तसेच सनातन संस्थेद्वारे देशभरात चालवल्या जाणार्‍या विविध धर्मकार्याविषयी सविस्तर माहिती दिली.

या संमेलनाचे सविस्तर वृत्त वाचा लवकरच !