आषाढी वारीसाठी पंढरपूर येथे जाण्यासाठी पुणे विभागातून ३५० अधिकच्या गाड्या !

  • २१ ते २६ जुलैपर्यंत ही विशेष सेवा चालू

  • एस्.टी. विभागाच्या सर्व सवलती योजना लागू

पुणे – आषाढी वारीनिमित्त पंढरपूर येथे श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी जाणार्‍या वारकर्‍यांना ‘महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळा’च्या पुणे विभागाकडून ३५० अधिकच्या गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवासी आणि वारकरी यांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन विभागीय आयुक्त कमलेश धनराळे यांनी केले.

विशेष बससेवा २१ ते २६ जुलै या कालावधीत अहोरात्र चालवण्यात येणार आहे. मुख्य स्वारगेट बसस्थानकासह पुणे जिल्ह्यातील विविध प्रमुख तालुका बसस्थानकांतून या बसगाड्या सोडण्याचे नियोजन केले आहे.

आषाढी वारीसाठी आरामदायी ‘जिजाऊ’ आणि ‘परिवर्तन’ प्रकारातील बसगाड्या पाठवण्याचा निर्णय घेतला. यामुळे लांब पल्ल्याचा हा प्रवास वारकर्‍यांना सुसह्य होईल. ज्येष्ठ नागरिकांसाठीची सवलत, महिला सन्मान योजना आणि विद्यार्थ्यांसाठीच्या प्रवासी सवलती या गाड्यांना पूर्णपणे लागू असतील, असे प्रशासनाने स्पष्ट केले.