बस नाम रहेगा अल्लाह का ?

‘सीजेपी’च्या (कॉकरोज जनता पक्षाच्या) आंदोलनात लडाखमधील सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला पाठिंबा द्यायला आलेल्या नंदिता नारायण यांनी ‘बस नाम रहेगा अल्लाह का…’ या ओळी मुद्दाम आणि जाणीवपूर्वक म्हटल्या. त्यांनी नंदिता राशिद अन्सारी हे पूर्ण नाव सांगून त्या ओळींचा अर्थ सांगितला असता, तर कदाचित् कुणीच त्याकडे लक्षही दिले नसते. त्यांनी ‘बस नाम रहेगा अल्लाह का’ म्हणणे यावर आक्षेप अजिबात नाही. त्या जो त्याचा अर्थ सांगत आहेत आणि स्वत:च्या सांगण्याचे समर्थन करत आहेत, ते केवळ चुकीचेच आहे, असे नव्हे, तर घातकही आहे.

१. पाकिस्तानी कवी फैज अहमद फैज यांची कविता हुकूमशहांच्या विरोधात आणि साम्यवाद्यांना आवडणारी

फैज अहमद फैज या पाकिस्तानी कवीची ‘लाज़िम है कि हम भी देखेंगे’, या नज्म (कविता)मधील ती ओळ आहे. साम्यवाद्यांची ही अतिशय आवडती कविता आहे आणि जिथे त्यांची सत्ता नाही, तिथे ही कविता ते म्हणतातच. नंदिता यांनी खास करून ही ओळ म्हणण्यामागेही ‘या ओळीचा सर्वांत अधिक त्रास उजव्या विचारसरणीच्या लोकांना होतो’, हेच कारण आहे. त्यांनी त्यानंतर जो अर्थ सांगितला आहे; ना त्याचा काही संबंध वेदान्ंत तत्त्वज्ञानाशी आहे, ना ‘अहं ब्रह्मास्मि’ (मीच ब्रह्म आहे) याच्याशी. आधीच्या कडव्यातील ओळी फार महत्त्वाच्या आहेत –

‘जब अर्ज़-ए-ख़ुदा के काबे से सब बुत उठवाए जाएँगे’

(अल्लाहची भूमी असलेल्या काबामधून जेव्हा सर्व मूर्ती काढून टाकल्या जातील) ‘अर्ज़-ए-ख़ुदा’ म्हणजे अल्लाहची भूमी, जमीन, काबा हा प्रदेश. बुत म्हणजे मूर्ती.

श्री. प्रसन्न शिवराम बर्वे

यात साम्यवादी असे सांगतात की, फैज अहमद फैज हे स्वतः ‘कम्युनिस्ट’ (नास्तिक / साम्यवादी) विचारसरणीचे कवी होते. त्यांनी ही ‘नज्म’ पाकिस्तानचे हुकूमशहा जनरल झिया-उल-हक यांच्या विरोधात लिहिली होती. जगात कुणीही मुसलमान कितीही साम्यवादी असला, तरी तो कधीच अल्ला आणि इस्लाम यांच्या विरुद्ध लिहीत नाही. साम्यवादी सांगतात तोच अर्थ जरी धरला, तरी फैज झिया-उल-हकला मूर्तीपूजक म्हणत आहे. दोघांचेही सुन्नी मुसलमान असणे आड येत नाही. अल्लापेक्षा स्वत:ला मोठा समजणारा म्हणून तो झिया-उल-हकवर टीका करत आहे. त्याचे राज्य जाऊन लोकशाही यावी, असे म्हणत नाही. ‘मूर्तीपूजक (मुसलमान असूनही) असलेल्या झिया-उल-हकची सत्ता जाऊन अल्लाशी प्रामाणिक असलेल्या लोकांची (अहल-ए-सफा) सत्ता येईल’, असे पुढे फैज म्हणतो. हे ‘अहल-ए-सफा’, ‘असहब-ए-सुफ़्फ़ा’ यावरून आलेले आहे. ‘असहब’ म्हणजे अनुयायी, साथीदार अन् मित्र आणि ‘सुफ़्फ़ा’ म्हणजे चबुतरा किंवा ओटा. मदिनेतील मशिदीच्या (मस्जिद-ए-नबवी) मागील बाजूस प्रेषित महंमद यांनी गरीब, निर्वासित आणि घरदार नसलेल्या अनुयायांसाठी एक सावलीचा ओटा (सुफ़्फ़ा) बनवला होता. तिथे राहून जे लोक केवळ कुराण शिकायचे आणि अहोरात्र प्रार्थना करायचे, त्यांना ‘असहब-ए-सुफ़्फ़ा’ म्हणतात. त्यावरूनच कदाचित् ‘सुफी’ हा शब्द आला असावा. ‘अशा लोकांची सत्ता येईल आणि मूर्तीपूजक असलेल्या झिया-उल-हक यांची सत्ता जाईल’, असा त्याचा अर्थ आहे.

२. साम्यवाद्यांची सत्ता असलेल्या ठिकाणी त्यांनी ‘नाम रहेगा अल्लाह का’ न म्हणणे

‘झिया-उल-हक हा हुकूमशहा होता. त्यामुळे त्याविरुद्ध लिहिलेली ही कविता आहे’, असे सांगितले जाते. साम्यवादी जेव्हा सत्तेत नसतात, तेव्हा ते सत्तेत असलेल्यांना ‘हुकूमशहा’, ‘नाझी’, ‘हिटलर’, ‘फॅसिस्ट’, अशी बिरुदे लावतात. साम्यवाद्यांची सत्ता जिथे असते, तेथील हुकूमशहांविरुद्ध एक अक्षर ते काढत नाहीत. तिथे ‘नाम रहेगा अल्लाह का’ म्हणत नाहीत. फैज यांनी झिया-उल-हक यांच्याविरुद्ध लिहिले; पण तेच काम रशियात स्टॅलिन करत होता, त्याविरुद्ध एक शब्द लिहिला नाही. त्यामुळे जुलमी हुकूमशाही जाऊन लोकांचे राज्य येऊ दे, अशी भावना त्यामागे अजिबातच नाही आणि तसा त्याचा मूळ संदर्भही नाही.

३. इस्लाम आणि हिंदु यांच्यातील द्वैत अन् अद्वैत यांमधील भेद

दुसरा एक तर्क हे साम्यवादी देतात. त्याचा संदर्भ याच कवितेतील दुसर्‍या कडव्यात आहे.

‘उठ्ठेगा अनल-हक़ का नारा जो मैं भी हूँ और तुम भी हो’

अनल-हक़ हा शब्द अना(मी) + अल् (तो) + हक़ (अल्ला किंवा सत्य) मिळून ‘अनल-हक़’ हा शब्द बनतो; पण इस्लाम ‘मी अल्ला’ हा विचार मानतच नाही. अगदी सुफीही ‘सर्व काही देव आहे’, असे म्हणत नाहीत. उलट ते ‘केवळ एका अल्लाचेच अस्तित्व खरे आहे’, असे म्हणतात (‘वह्दत-उल-वुजूद’). आपल्याकडेही अनेक विचारवंतांचा हाच घोळ आहे. ‘सगळे देव सारखे आहेत’, असे ख्रिश्चॅनिटी आणि इस्लाम यांचे म्हणणे आहे, असे ते सांगतात. ख्रिश्चॅनिटी आणि इस्लाम असे कधीच म्हणत नाही. ते म्हणतात ‘देव येकूच. राम कृष्ण आहाय पोळोय ते देव न्हूय, ते सोंत’(देव एकच आहे. राम, कृष्ण वगैरे देव नव्हे, ते संत).

अ. ‘सगळे देव सारखे’ आणि ‘देव एकच आहे’ यांत जो भेद आहे, तोच ‘अनल-हक़’ आणि ‘अहं ब्रह्मास्मि’ यांमध्ये आहे. ‘अहं ब्रह्मास्मि’ याचा अर्थ ‘मीच ब्रह्म आहे’, असा होतो. हे सत्य जाणण्यासाठी कोणत्याही विश्वासाची किंवा देवावर श्रद्धा ठेवण्याची आवश्यकता नसते. माझ्यातील जाणीव आणि संपूर्ण विश्वात भरून राहिलेली जाणीव (शुद्ध चैतन्य) एकच आहे, वेगळी नाही. अनल-हक़ची भाषा करणारा सूफीवादी स्वतःला अल्ला मानत नाही. एक अद्वैत विचार आहे, तर दुसरा विचार द्वैत आहे. दोन्ही वेगळे आहेत.

आ. दुसरे महत्त्वाचे सूत्र : अल्ला म्हणजे देव; पण ब्रह्म म्हणजे देव नाही. जेव्हा इस्लाम ‘एकच अल्ला आहे, त्याखेरीज अन्य कुणीच नाही’, असे म्हणतो, तेव्हा तो वेदांती किंवा हिंदु ज्याला ‘ब्रह्म’ म्हणतात, त्याविषयी बोलत नाही, तर तो देवाविषयी बोलतो. आपल्याकडे देव आणि धर्म वेगवेगळे आहेत. आपल्याकडे देव, देव करणारा अधार्मिक असू शकतो आणि देवालाही न मानणारा धार्मिक असू शकतो. अल्ला आणि कुराण यांना न मानणारा मुसलमान असू शकेल का ?

४. साम्यवाद्यांचा दुटप्पीपणा आणि त्यांच्यापासून सावध रहाणेच आवश्यक !

साम्यवादी विचारवंत दोन्ही गोष्टी एकच म्हणतात; पण त्या तशा नाहीत. त्यातील मूलभूत भेद ओळखून त्यांच्यापासून सावध रहाणे आवश्यक आहे. साम्यवादी हे साम्यवादीच असतात, ते कधीही ‘प्राणीप्रेमी’, ‘पर्यावरणप्रेमी’, ‘मानवतावादी’, ‘लोकशाहीवादी’, ‘सत्तेविरुद्ध निर्भीडपणे आवाज उठवणारे’, ‘विज्ञाननिष्ठ’ आणि ‘नास्तिक’ वगैरे नसतात. असलेच तर जिथे सत्ता नाही, तिथेच असतात. साम्यवादी विचारवंत जेव्हा लोकशाही देशात किंवा इतर राजवटींमध्ये असतात, तेव्हा ते ‘अभिव्यक्तीस्वातंत्र्य’, ‘लोकशाही’, आणि ‘मानवी हक्क’ यांचे सर्वांत मोठे कैवारी बनतात. स्वतःची सत्ता आल्यानंतर ते सर्वांत आधी याच स्वातंत्र्याचा गळा घोटतात. जिथे गळा कापला जाण्याची शक्यता असते, तिथे तो काढत नाहीत आणि जिथे तशी शक्यता अजिबातच नसते, तिथे ‘नाम रहेगा अल्लाह का’ जोरजोरात म्हणतात !

– श्री. प्रसन्न शिवराम बर्वे, पणजी, गोवा.

(साभार : ‘प्रसन्नवदने’ ब्लॉग)