|

नवी देहली – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांच्यासारखा सार्वजनिकरित्या परराष्ट्र धोरण राबवणारा अमेरिकी राष्ट्राध्यक्ष मी कधीही पाहिला नाही. हा पालट केवळ भारतापुरता मर्यादित नाही. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची जगाशी व्यवहार करण्याची, अगदी त्यांच्या स्वतःच्या देशाशीही व्यवहार करण्याची पद्धत ही पारंपरिक रुढीवादी पद्धतीपेक्षा एकदम वेगळी आहे. हा मोठा पालट आहे. केवळ व्यापारासाठी आयात शुल्क लादणे सामान्य आहे, परंतु व्यापारनिहाय सूत्रांवरून शुल्क लादणे योग्य नाही, असा घणाघात भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी केला. ट्रम्प यांनी भारतावर ५० टक्के आयात कर लादल्यावरून परराष्ट्रमंत्र्यांनी थेट ट्रम्प यांना सुनावले आहे. ते एका कार्यक्रमात बोलत होते. भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेल आयात करत असल्याने रशियाला युक्रेनच्या विरोधात युद्ध करण्यासाठी निधी प्राप्त होत असल्याचा पोकळ आरोप करत ट्रम्प यांनी भारतावर ५० टक्के कर लादला आहे.
🇮🇳 EAM Dr. S. Jaishankar pulls up U.S. President Trump:
👉 Tariffs for reasons other than trade are unacceptable
👉 India has never accepted mediation on Pakistan issues
👉 Strong remarks on China & Russia too#Geopoliticspic.twitter.com/IEWcL2SIPn
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) August 23, 2025
परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी मांडलेली महत्त्वपूर्ण सूत्रे . . .
१. पाकवरून डॉ. जयशंकर यांचे ट्रम्प यांना प्रत्युत्तर !
भारताने पाकच्या संदर्भात कधीही कुणाचीही मध्यस्थी स्वीकारलेली नाही. पाकसमवेतच्या मध्यस्थीविषयी भारताची भूमिका नेहमीच स्पष्ट राहिली आहे आणि तशीच राहील. वर्ष १९७० पासून आतापर्यंत ५० वर्षांत आम्ही कधीही कुणाचीच मध्यस्थी स्वीकारली नाही. डॉ. जयशंकर यांचे हे वक्तव्य ट्रम्प यांच्या वारंवार केलेल्या दाव्यावर आहे. ट्रम्प अनेक वेळा म्हणत आले आहेत की, त्यांनीच ‘ऑपरेशन सिंदूर’च्या वेळी भारत-पाक यांच्यात युद्धबंदी घडवून आणली.
२. शेतकरी आणि छोटे व्यापारी यांच्या हिताचे रक्षण आमचे प्राधान्य !
जेव्हा व्यापाराचा आणि शेतकर्यांच्या हिताचा प्रश्न येतो, तेव्हा आम्ही आमच्या धोरणात्मक स्वायत्ततेचा पुरस्कार करतो. ती राखण्यासाठी आम्हाला जे काही करायचे आहे, ते आम्ही करू. आमचे सरकार शेतकरी आणि छोटे व्यापारी यांच्या हितांच्या रक्षणासाठी कटीबद्ध आहे. आम्ही यावर पुष्कळ ठाम आहोत. यावर कोणतीही तडजोड केली जाणार नाही.
३. भारत करत असलेल्या व्यापारावर ठाम !
जे लोक व्यापाराचे समर्थन करणार्या अमेरिकेसाठी कार्य करतात, ते दुसर्या लोकांनी (देशांनी) व्यापार करण्यावरून आरोप करत आहेत, हे पुष्कळ हास्यास्पद आहे. जर भारताचे तेल अथवा शुद्ध उत्पादने विकत घेण्याची कुणाला समस्या असेल, तर त्यांनी ते विकत घेऊ नये. कुणी आपणास हे विकत घेण्यासाठी बळजोरी करत नाही. युरोप विकत घेते, अमेरिका विकत घेते, परंतु आपणास हे आवडत नसेल, तर विकत घेऊ नये.
४. भारताला रशियाला अधिक बाजारपेठ उपलब्ध करून द्यायची आहे !
व्लादिमिर पुतिन यांच्याशी झालेल्या भेटीसंदर्भात परराष्ट्रमंत्री म्हणाले की, रशियन लोकांसमवेत वार्षिक शिखर वार्ताची आमची परंपरा आहे. वर्षाच्या शेवटी ही शिखर परिषद आयोजित करत आहोत. अशा प्रकारे संबंध वाढतात. माझे बोलणे सैनिकी सूत्रांना सोडून अन्य सूत्रांवर आहे. संरक्षणमंत्री सैनिकी सूत्रांवर बोलतात. आम्हाला रशियाला अधिक बाजारपेठ उपलब्ध करून द्यायची आहे.
५. रशिया-युक्रेन संघर्ष शक्य तितक्या लवकर संपला पाहिजे !
अलास्काहून परतल्यानंतर तेथे घडलेल्या घटनांविषयी पुतिन यांनी त्यांचे विचार मांडले. आमच्या भूमिकेविषयी आम्ही आरंभीपासूनच स्पष्ट आहोत की, आम्हाला रशिया-युक्रेन संघर्ष लवकरात लवकर संपावा, असे वाटते. कोणताही संघर्ष सोडवणे, हे संबंधित पक्षांचे काम आहे, असे आम्हाला वाटते. हा पालट घडवून आणू शकणार्या कोणत्याही प्रयत्नांना आम्ही पाठिंबा देतो.
६. अमेरिकेमुळे चीनशी संबंध अधिक घट्ट झाले आहेत, असे नाही !
भारत-चीन संबंधांविषयी परराष्ट्रमंत्री म्हणाले की, अमेरिकेत काही घडले असेल, तर लगेचच चीनमध्येही काहीतरी घडले आहे, असे नाही. वेगवेगळ्या समस्यांसाठी वेगवेगळी वेळापत्रके असतात. मला वाटते की, सर्व काही एकत्र करून विशिष्ट परिस्थितीला एकत्रित प्रतिसाद देण्याचा प्रयत्न करणे, ही एक चूक आहे. आज निश्चितच एक जागतिक परिस्थिती आहे. मला तुम्हाला हे समजावून सांगायचे आहे की, ही एक उत्क्रांती आहे. त्या नात्याला एक प्रवाह आहे, पण हे नाते इतके खोलवर करू नका. हे वास्तव नाही.
७. आत्मनिर्भरतेवर जोर देण्यामागील कारण केले स्पष्ट !
अलीकडच्या अनुभवाने आपल्याला कोणत्याही एका देशाच्या कोणत्याही एका पुरवठा साखळीवर किंवा स्त्रोतावर अधिक अवलंबून राहू नये, हे शिकवले आहे. कोणत्याही एका बाजारपेठेवर अवलंबून राहू नका. हे अवलंबन स्त्रोतापासून उत्पादनापर्यंतच नाही, तर उत्पादनापासून बाजारपेठेपर्यंतही आहे. याचा अर्थ तुम्ही विविधता आणता. सरकारचा एक निरंतर संदेश आहे की, आपण घरीच अधिक काम केले पाहिजे. हे कठीण आहे, तसेच गुंतागुंतीचेही आहे. यासाठी एका वेगळ्या प्रकारच्या प्रयत्नांची आवश्यकता आहे. यामुळेच आत्मनिर्भरतेवर जोर दिला जात आहे.
देहलीतील आंदोलनाच्या माध्यमातून अराजकता पसरवण्याचा प्रयत्न ! – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
‘वन्दे मातरम्’ गीताचा धगधगता इतिहास आता नाशिकमध्ये !
Delhi Congress Protest : पंतप्रधान मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर काँग्रेसचे आंदोलन
Farmers’ March Postponed : पंजाबच्या शेतकर्यांचा देहलीमध्ये काढण्यात येणारा मोर्चा पुढे ढकलला
Nepal New Coin : नेपाळने १ रुपयाच्या नव्या नाण्यावरून लिम्पियाधुरा, लिपुलेख आणि कालापाणी दाखवलेला नकाशा हटवला
Mohammed Zubair AltNews : (म्हणे) ‘कॉकरोच जनता पक्षा’च्या आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीत पोलीस घायाळ झाले नाहीत !