वैध ‘प्रिस्क्रिप्शन’विना गर्भपाताच्या गोळ्यांची खरेदी-विक्री करू नका !

सिंधुदुर्ग जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांचे आवाहन

प्रतिकात्मक चित्र

सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का.) – जिल्ह्यामध्ये गर्भपातासाठी वापरल्या जाणार्‍या गोळ्यांची विक्री जर नोंदणीकृत वैद्यकीय तज्ञांच्या वैध ‘प्रिस्क्रिप्शन’विना (वैद्यांनी लिहून दिलेल्या औषधांच्या चिठ्ठीविना) होत असेल, तर ही गंभीर गोष्ट आहे. यामुळे महिलांच्या आरोग्यास गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी अशा गोळ्यांची खरेदी किंवा वापर स्वतःच्या मनाने अथवा वैध ‘प्रिस्क्रिप्शन’विना करू नये, तसेच सार्वजनिक आरोग्य विभागाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील सर्व औषधविक्री परवानाधारकांनी गर्भपाताच्या गोळ्यांची विक्री केवळ वैध वैद्यकीय प्रिस्क्रिप्शनवरच करावी. प्रिस्क्रिप्शनविना किंवा नियमबाह्य पद्धतीने अशा औषधांची विक्री करणार्‍या औषध विक्रेत्यांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी चेतावणी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली आहे.

गर्भपातासाठी वापरल्या जाणार्‍या औषधांचा वापर केवळ नोंदणीकृत वैद्यकीय तज्ञांच्या सल्ल्यानुसार आणि त्यांच्या वैध ‘प्रिस्क्रिप्शन’वरच करणे कायदेशीर अन् सुरक्षित आहे. ‘प्रिस्क्रिप्शन’विना अशा औषधांचा वापर केल्यास अतिरक्तस्त्राव, अपूर्ण गर्भपात, गंभीर संसर्ग, भविष्यातील प्रजननक्षमतेवर परिणाम, तसेच महिलेच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो, असे डॉ. पाटील यांनी म्हटले आहे.