१ ऑगस्टपासून ‘म्हाजी बस योजना’ संपूर्ण गोव्यात लागू होणार

पणजी – गोवा सरकारची ‘म्हाजी बस योजना’ (माझी बस योजना) १ ऑगस्ट २०२६ पासून राज्यभर लागू करण्यात येणार असल्याची घोषणा परिवहन संचालनालयाने एका सार्वजनिक सूचनेद्वारे केली आहे. या योजनेत सहभागी होऊ इच्छिणार्‍या सर्व खासगी बसमालकांनी निर्धारित अर्जासह आवश्यक कागदपत्रे संबंधित साहाय्यक परिवहन संचालकांकडे सादर करावी आणि योजना चालू होण्यापूर्वी नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. ‘म्हाजी बस योजना’ याद्वारे खासगी बसचालकांना अनुदान देऊन त्यांच्या बसचे आधुनिकीकरण करणे, तसेच प्रवाशांसाठी नियमित, वेळेवर, अधिक सुरक्षित, विश्‍वासार्ह आणि दर्जेदार सार्वजनिक वाहतूक उपलब्ध करून देण्याचा सरकारचा उद्देश आहे.