मोरजी येथे दुसर्‍या दिवशीही अवैध बांधकामांवर कारवाई

पेडणे, २१ जुलै (वार्ता.) – तेमवाडा, मोरजी येथील समुद्रकिनार्‍यावर किनारपट्टी नियमन क्षेत्राच्या नियमांचे उल्लंघन करून उभारण्यात आलेल्या अवैध बांधकामावर दुसर्‍या दिवशी; म्हणजे २१ जुलै या दिवशी कारवाई करण्यात आली. संबंधित विभागाच्या पथकाने नियमबाह्य बांधकामे पाडण्याची प्रक्रिया चालू ठेवली आहे. कारवाईच्या कालावधीत या परिसरात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आवश्यकतेनुसार पुढील काही दिवस ही मोहीम चालू रहाण्याची शक्यता आहे. सध्या समुद्रकिनारी पर्यावरण संवेदनशील क्षेत्रात अनुमतीविना उभारण्यात आलेल्या अवैध बांधकामांवर कारवाई करण्यात येत आहे. किनारपट्टी नियमन क्षेत्राच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याचा प्रशासनाचा निर्धार स्पष्ट झाला आहे.

संपादकीय भूमिका

  • अनुमतीविना बांधकाम उभे राहीपर्यंत कारवाई न करणार्‍या संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांवरही कारवाई व्हायला हवी.
  • ही अनधिकृत बांधकामे पाडण्यासाठी येणारा खर्च जनतेच्या कराच्या पैशातून म्हणजेच सरकारी तिजोरीतून न करता संबंधित बांधकाम करणारे आणि त्याकडे दुर्लक्ष करणारे प्रशासनातील उत्तरदायी यांच्याकडून वसूल करावा !