Article 370 Black Day : नॅशनल कॉन्फरन्स, पीडीपी आणि काँग्रेस यांनी ५ ऑगस्टला पाळला ‘काळा दिवस’ !

५ ऑगस्ट २०१९ या दिवशी रहित झाले होते कलम ३७० !

श्रीनगर – ५ ऑगस्टला कलम ३७० रहित होऊन ६ वर्षे पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने काश्मीरमधील धर्मांध मुसलमान नेत्यांकडून जुनाच राग आळवला जात आहे. सत्ताधारी नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष आणि ३ वेळा मुख्यमंत्री राहिलेले फारुख अब्दुल्ला यांनी ६ वर्षांपूर्वी घेतलेल्या निर्णयाला ‘एकतर्फी’ आणि ‘घटनाबाह्य कृती’ संबोधले. ते म्हणाले की, आमच्या पक्षाचा या निर्णयाला आजही तीव्र विरोध असून जम्मू-काश्मीरच्या लोकांना ते अजूनही अस्वीकारार्ह आहे.

‘पीडीपी’च्या (‘पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी’च्या) प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी ‘एक्स’ वर पोस्ट केले की, ५ ऑगस्ट हा केवळ जम्मू-काश्मीरसाठीच नाही, तर संपूर्ण देशासाठी काळा दिवस आहे. या दिवशी परकीय हातांनी नव्हे, तर अंतर्गत शक्तींनी क्रूर बहुमताने राज्यघटना उलथवली. जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा रहित करणे, हा शेवट नव्हता, तर तो घटनात्मक मूल्यांवर व्यापक आक्रमणाचा आरंभ होता. (मेहबूबा यांच्या या जावईशोधासाठी त्यांना पुरस्कारच दिला पाहिजे ! – संपादक)

मेहबूबा पुढे म्हणाल्या की, जम्मू-काश्मीरला प्रयोगशाळेत रूपांतरित केले गेले, तेथील लोकांना अधिकारांपासून वंचित केले गेले, त्यांची भूमी हिरावून घेतली गेली, त्यांची लोकसंख्येला लक्ष्य केले गेले. (असे होते, तर वर्ष २०१९ च्या आधी गेली अनेक दशके जम्मू-काश्मीरमध्ये कोणताच विकास का झाला नाही, यावर मेहबूबा यांनी आधी भाष्य केले पाहिजे ! – संपादक) ज्याला अनेकांनी स्थानिक समस्या म्हणून पाहिले, ते सर्वांसाठी एक इशारा होता.

काँग्रेसने हा दिवस प्रदेशातील सर्व २० जिल्ह्यांमध्ये ‘काळा दिवस’ म्हणून पाळला !

जम्मू-काश्मीर काँग्रेसचे प्रमुख तारिक हमीद कर्रा यांनी म्हटले की, राज्याच्या पुनर्स्थापनेसाठी आंदोलन तीव्र करण्यासाठी पक्ष ५ ऑगस्ट हा प्रदेशातील सर्व २० जिल्ह्यांमध्ये ‘काळा दिवस’ म्हणून पाळेल.

आम आदमी पक्षाचे आमदार मेहराज मलिक यांनीही ‘जम्मू-काश्मीरच्या इतिहासातील सर्वांत काळा दिवस’ म्हणून ५ ऑगस्ट २०१९ या दिवसाचे वर्णन केले. (जो पक्ष आता इतिहासजमा होण्याच्या मार्गावर आहे, त्याचाही स्वत:चे अस्तित्व दाखवण्यासाठी केलेला हा प्रयत्न ! – संपादक)

‘पीपल्स कॉन्फरन्स’चे अध्यक्ष आणि माजी मंत्री सज्जाद गनी लोन म्हणाले की, ५ ऑगस्ट हा दिवस नेहमीच ‘लोकशाहीला कमकुवत करण्याची क्रूर आठवण आणि निवडक समूहाल लक्ष्य करण्यासाठीचे घृणास्पद उदाहरण म्हणून लक्षात राहील.’


काय झाले होते ५ ऑगस्ट २०१९ या दिवशी ?

या दिवशी केंद्रशासनाने जम्मू-काश्मीरच्या रहिवाशांना विशेष दर्जा आणि विशेषाधिकार देणारे कलम ३७० अन् ३५ अ रहित केले होते. त्या वेळी पूर्वीच्या जम्मू आणि काश्मीर राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन करण्यात आले – जम्मू आणि काश्मीर (विधिमंडळासह) आणि लडाख (विधिमंडळाखेरीज).

संपादकीय भूमिका

गेली अनेक दशके मुसलमानांचे लांगूलचालन करण्यात घालवलेल्या या पक्षांनी ५ ऑगस्ट काळा दिवस म्हणून साजरा करणे, ही आता केवळ एक औपचारिकताच राहिली आहे, हे त्या पक्षांनाही ठाऊक आहे. यापेक्षा दुसरा विनोद तो कोणता ?