विशेष संपादकीय : …अंततः कलंक पुसला ! 

मालेगाव बॉम्बस्फोटतील सर्व आरोपी निर्दोष मुक्त

१४ आरोपींना गोवलेल्या, ७ आरोपींवर खटला चाललेल्या, ३ अन्वेषण यंत्रणांनी अन्वेषण केलेल्या, १७ वर्षे चाललेल्या, ३ आरोपपत्रे प्रविष्ट झालेल्या, ५ ‘बेंच’नी काम केलेल्या, १ सहस्रांहून अधिक पानांचे निकालपत्र असलेल्या ‘मालेगाव बाँबस्फोट २००८’ प्रकरणाचा ऐतिहासिक निकाल ३१ जुलैला अंतिमतः लागला. ‘आरोपींनी षड्यंत्राद्वारे मालेगाव बाँबस्फोट घडवून आणला’, अशी छातीठोक बतावणी करणार्‍या अन्वेषण यंत्रणांच्याच षड्यंत्राचे वाभाडे राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या विशेष न्यायालयाने खटल्याचा निकाल देतांना काढले. त्यामुळे ‘भगव्या आतंकवादा’चे खोटे कथानक निर्माण आणि सिद्ध करणार्‍यांचे स्वप्न पार धुळीला मिळाले आहे. हिंदुद्वेष्टे काँग्रेस नेते आणि यंत्रणा यांनी हिंदूंच्या पवित्र ‘भगव्या’च्या नावाला ‘आतंकवाद’ हा शब्द जोडून, समस्त हिंदूंचा मानभंग करून, त्यांना लावलेला कलंक आज अंतिमतः पुसला गेला. मांसाचे तुकडे भरवणे, अश्लाघ्य शिव्या देणे, अश्लील चित्रपट दाखवणे, प्रचंड मारहाण, आरोपींसह त्यांच्या कुटुंबियांना मानसिक त्रास देणे, खोटे साक्षी-पुरावे निर्माण करणे आदी करून पोलीस यंत्रणा आणि त्यांचे कर्तेकरविते नेते यांनी मिळून हिंदूंना ‘आतंकवादी’ ठरवण्याचे प्रचंड मोठे षड्यंत्र रचले होते. हिंदूंविरुद्ध हे सर्व भयंकर कुभांड रचले गेल्याचे न्यायालयात सिद्ध झाल्याने आता त्यांनाच शिक्षा द्यायला हवी’, असे कुणा राष्ट्रभक्ताच्या मनात आले, तर नवल नाही. असे नेते आणि अशी व्यवस्था पुन्हा कुणा राष्ट्रभक्ताच्या वाट्याला येऊ नये, यासाठीच हिंदु राष्ट्र हवे !

वर्ष २००९ च्या लोकसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून आणि अल्पसंख्यांकांचे तुष्टीकरण यांसाठी वर्ष २००८ च्या मालेगाव बाँबस्फोट प्रकरणात कल्पनातीत असे खोटे पुरावे तत्कालीन आतंकवादी पथकाने गोळा करून त्यांच्या काँग्रेसी आणि ‘घड्याळी’ नेत्यांना खुश केले; परंतु ते सर्व खोटे निघाल्याने ‘युएपीए’त (बेकायदेशीर देशद्रोही कारवायांना रोखणारा कायदा) अडकवू शकत नसल्याचा निर्वाळा विशेष न्यायालयाने दिला. यापूर्वीच न्यायालयाने ‘मकोका’ (संघटित गुन्हेगारी रोखणारा कायदा) ही लावू शकत नसल्याचे सांगितले होते. अन्वेषण यंत्रणांसाठी या मान खाली घालायला लावणार्‍या गोष्टी आहेत. आताही निकाल लागल्यावर प्रसारमाध्यमांनी सातत्याने ‘पुरावे नसल्याने निर्दाेष मुक्तता’, असे मथळे चालवून हे वृत्त दिले. तांत्रिकदृष्ट्या ते खरे असले, तरी खरेतर ‘खोटे पुरावे सादर केल्याने’, असे म्हणणे योग्य झाले असते. काही वाहिन्यांनी तत्परतेने मुसलमानांच्या प्रतिक्रिया घेऊन वृत्तात कुठेतरी ‘समतोल’ साधण्याचा केविलवाणा प्रयत्न चालू केला. कित्येक वर्षे ‘हिंदु आतंकवाद आहेच’, हे चित्र निर्माण करणार्‍या माध्यमांना त्याविषयी भाष्य करावेसे वाटले नाही.

धादांत खोटे पुरावे देणार्‍या हिंदुद्वेषी यंत्रणा ! 

खोट्या पुराव्यांच्या मालिकांचे पितळ उघडे करत विशेष न्यायालयाने आतंकवादविरोधी पथकावर प्रचंड रोष व्यक्त केला. ११ क्रमांकाचे कथित आरोपी समीर कुळकर्णी यांनीही ५ राज्यांतील आतंकवादविरोधी पथकाने त्यांना मारहाण केल्याचे सांगितले होते. १-२ नव्हे, तर सर्वच पुरावे धादांत खोटे असल्याचे न्यायालयाने सांगणे, हे तत्कालीन आतंकवादविरोधी पथकांची यंत्रणा शासनकर्त्यांनी किती हिंदुद्वेषी करून ठेवली होती, हेच सिद्ध करते. साध्वी प्रज्ञासिंह यांच्या मोटारसायकलची सत्यता, विविध ठिकाणच्या बैठकीत कट रचला गेल्याचा आरोप यांसह कर्नल पुरोहितांनी ‘आर्.डी.एक्स.’ आणणे, अभिनव भारत संस्थेचा पैसा या बाँबस्फोटासाठी वापरणे, याविषयी कुठलेच पुरावे सत्य नसल्याचे न्यायालयाने सांगितले. इतकेच नव्हे, तर यंत्रणेने स्वतःच एक कथित आरोपी चतुर्वेदी यांच्या घरी ‘आर्.डी.एक्स.’ ठेवल्याचेही सांगितले. साक्षीदारांना कसे धमकावण्यात आले ?, हेही सांगितले. केवळ ‘भगवा आतंकवाद’ सिद्ध करण्यासाठी यंत्रणेने आरोपपत्रामध्ये हे सर्व पुरावे असल्याचे लिहिणे यावरून शासनकर्त्यांसह यंत्रणा हिंदुद्वेषाने किती पोखरल्या होत्या, हे सिद्ध झाले. अशा हिंदुद्वेष्ट्या अधिकार्‍यांना स्थान देणार्‍या यंत्रणा हिंदूबहुल भारतात असणे, हे लज्जास्पद आहे. साध्वींना अतोनात छळणार्‍या हेमंत करकरे यांच्यासारख्या आतंकवादविरोधी पथकाच्या अधिकार्‍याचा अंत कसा झाला ? हे सार्‍या जगाने पाहिले. मुंबई सत्र न्यायालयाच्या राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या विशेष न्यायालयाने स्वतः ‘खोटे पुरावे देऊन आरोपींना अडकवण्याचे षड्यंत्र रचले गेल्या’चे सांगितल्याने आज जाेगेश्वरी येथील उद्यानाला दिलेले ‘करकरे’ यांचे नाव काढायचे का ? असा प्रश्न निर्माण होतो.

अद्याप अनेक प्रश्न अनुत्तरित !

कथित आरोपी समीर कुळकर्णी यांचे अपहरण करणार्‍यांना ‘इंडिया बुल्स’चे विमान ज्यांनी दिले, ज्यांनी ते वापरले, त्यांना काय शिक्षा होणार ? फॉरेन्सिक प्रयोगशाळेच्या लोकांनी पोलिसांना घटनास्थळाचे पुरावे गोळा करण्यास सांगितले, त्याविषयीची चौकशी होणार का ? मूळ प्रथमदर्शनी अहवालही ज्या खटल्यात झाला नाही आणि आरोपींनी गुन्हा केला नाही, हे ठाऊक असूनही त्यांनी हिंदूंचे नेतृत्व करणार्‍यांची नावे घेण्यासाठी मारहाण केली, त्या पोलिसांवर गुन्हे कोण नोंद करणार ? घायाळांची १०१ खोटी प्रमाणपत्रे करण्याविषयी चौकशीचे आदेश या वेळी न्यायालयाने दिले; परंतु ती सिद्ध करण्याचे आदेश कुणी दिले ? सुशीलकुमार शिंदे यांनी पक्षाने (‘हायकमांड’ने) ‘भगवा आतंकवाद’ हा शब्द वापरण्यास सांगितल्याचे वक्तव्य केल्याचे वर्ष २०२४ मध्ये मान्य केले होते. ‘हिंदु आतंकवादा’चा बागुलबुवा निर्माण करणे याचाच दुसरा अर्थ ‘आतंकवाद्यांना पोसणे’ आहे; पण स्वस्वार्थापुढे काँग्रेसला देशहित कधी कळेल, याची अपेक्षाच करू शकत नाही. अशा आतंकवाद्यांना साहाय्य करणार्‍या काँग्रेसवर आता बंदी का आणू नये ? यांसारखे असंख्य प्रश्न अजून अनुत्तरित आहेत. त्याची उत्तरे हिंदूंना हवी आहेत.

हानी कशी भरून निघणार ?

कुणी कल्पनाही करू शकत नाही, असे भगव्या आतंकवादाचे सुनियोजित षड्यंत्र भारतातील अन्वेषण यंत्रणांकडून अदृश्य राजकीय ‘हात’ आणि ‘घड्याळ’ असलेल्या नेत्यांनी राबवून घेतले. आज अनेक अंगांनी आणि अर्थाने त्याचा फुगा फुटला असला, तरी हिंदुत्वनिष्ठ तरुणांच्या जीवनातील १७ मौलिक वर्षे त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना सोसावा लागणारा प्रचंड शारीरिक, मानसिक, आर्थिक, कौटुंबिक, सामाजिक त्रास हा शब्दातीत आहे. या प्रकरणातील आरोपी हे अब्जावधी हिंदूंचे प्रतिनिधी आहेत. शहरी नक्षलवादी विचारसरणीच्या शासनकर्त्यांनी ‘आतंकवाद’ या संकल्पनेला हाताशी धरून त्यांच्या अत्यंत क्रूर मानसिकतेच्या अधिकार्‍यांकरवी हिंदूंवर केवळ घोर अत्याचारच केले नाहीत, तर संपूर्ण हिंदु धर्म, संस्कृती, परंपरा आणि नागरिक यांचा ‘न भूतो न भविष्यती’, असा तेजोभंग केला आहे. लक्षावधी वर्षांच्या सहिष्णु संस्कृतीला आतंकवादी ठरवून केवळ अवमानच केला नाही, तर संपूर्ण जगात हिंदु समाजाची प्रतिष्ठा धुळीस मिळवली. ‘बीबीसी’सारख्या आणि भारतातील अपवाद वगळता यच्चयावत् प्रसारमाध्यमांनी ‘मिडिया ट्रायल’ चालवून हिंदूंचा आत्मसन्मान धुळीस मिळवला. नेते, प्रशासन, पोलीस, कथित विचारवंत आणि माध्यमे यांची हिंदुद्वेषी ‘इकोसिस्टम’ (एकमेकांना साहाय्य करणारी यंत्रणा) अनेक वर्षांपूर्वीपासून चालत होती, हे पुन्हा पुन्हा अशा उदाहरणांतून सिद्ध होते. कुठल्याही राष्ट्राभिमानी आणि धर्माभिमानी हिंदूने हे कधीही विसरू नये. जोपर्यंत हे सर्व करणार्‍यांना कठोरात कठोर शिक्षा होत नाही, हिंदु धर्म आणि धर्मीय यांना उद्ध्वस्त करायला निघालेले आसुरी आतंकवादी अन् साम्यवादी नक्षली प्रवृत्तीचे लोक धुळीला मिळत नाहीत, तोर्पंत राष्ट्रभक्तांच्या लढ्याचे हे वर्तुळ पूर्ण होणार नाही. हिंदूंच्या संयमाची परीक्षाच न्याययंत्रणा घेते आणि हिंदू संयमी असल्यामुळेच न्याययंत्रणेवर विश्वास ठेवतात; परंतु जेव्हा नेत्यांपासून पोलीस यंत्रणेपर्यंत सर्व व्यवस्थाच हिंदुविरोधी असल्याचे अशा प्रकरणांमुळे पुन्हा एकदा अधोरेखित होते, तेव्हा हे सर्व पालटण्यासाठी हिंदु राष्ट्राचीच आवश्यकता आहे, असे हिंदूंना ठामपणे म्हणावे लागते. हा निकाल देण्यासाठी मुंबई बाँबस्फोटातील धर्मांध आरोपींनाही सरकारने मोकळे सोडले कि काय ? अशी शंका यायला आताही वाव निर्माण झाला. दोन्ही अन्वेषणांतील अधिकारी समान होते. ‘सरकार कुणाचेही असू दे व्यवस्था साम्यवादी आहे’, ही स्थिती ‘सरकारही (हिंदु) धर्मनिष्ठ आणि व्यवस्थाही धर्मनिष्ठ आहे’, असे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत, म्हणजे हिंदु राष्ट्र स्थापन होईपर्यंत हिंदूंचा हा लढा चालूच राहील !

हिंदूंना आतंकवादी ठरवून त्यांच्यावर अत्याचार करणारे आणि संपूर्ण जगात हिंदु समाजाची प्रतिष्ठा धुळीस मिळवणारे यांना शिक्षा कधी ?